नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवाद खालच्या पातळीवर राजकारण किंवा दडपशाही गुंडगिरी नव्हती . मात्र आता तालुक्याला या सर्व गोष्टींची कीड लागली असुन याचा पहिला बळी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता हे ठरले आहे. त्यांच्यावर गांजा बाळगल्या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ नांदगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने नांदगाव पोलिस ठाण्यात गर्दी केली. काल २५ जुन रोजी मनमाड व नांदगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा केली. याला मनमाड , नांदगाव मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुळात गुप्ता यांना संपूर्ण तालुका ओळखतो संतोष गुप्ता असे कृत्य करूच शकत नाही असे मत तालुक्यातील जनतेने व्यक्त केले. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी दडपणात येऊन हा गुन्हा केला, असल्याचा आरोप तालुक्यातील राजकीय नेत्यांनी केला आहे.मनमाड येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी मनमाड बंद करण्यासाठी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन रॅली काढली व व्यापारी वर्गाला आवाहन केले. तर नांदगाव येथे गांधी चौक येथून सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा महात्मा फुले चौक, दत्त मंदिर , सोनार गल्ली , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे , महावीर मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , पोस्ट ऑफिस मार्गे पोलीस ठाण्यात नेण्यात आला.याठिकाणी नांदगाव शहरातील सर्वपक्षीय नेते सर्वसामान्य जनतेने जोरदार घोषणाबाजी केली. येथे नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी,खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या .यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक , माजी आमदार अनिल आहेर , माजी आमदार जगन्नाथ धात्रक, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल वडगुले , नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे ,
काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे , देविदास भोपळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरूण पाटील , शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद , शिवकन्या संगीता सोनवणे यांच्यासह आदी नेते व सर्वसामान्य जनतेने आपले मत व्यक्त केले मुळात ज्या दुकानात गांजा सापडला असे पोलिस सांगतात त्या दुकानात आदल्या रात्री चोरी झाली आणि याबाबत स्वतः संतोष गुप्ता हे रात्री पोलीस ठाण्यात गेले . मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता काही चोरी झाले नाही जाऊ द्या अशी भूमिका घेतली. यामुळे गुप्ता यांनीही दुर्लक्ष केले मात्र हा गांजा कोणीतरी आणून ठेवला हे गुप्ता व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले.याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर तसेच खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने तहसीलदारांचा करणार सत्कार..!
- नांदगाव तालुक्यात महसूल विभागाच्या डोळ्यासमोर रेती मुरूम यासह इतर अनेक अवैध राजरोसपणे व्यवसाय सुरू आहेत .तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी मटका, सोरट, दारू यासह पत्याचे क्लब सुरू आहेत. मात्र या ठिकाणी तालुक्याचे दंडधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाने यांचे दुर्लक्ष असते . मात्र कोणत्यातरी दैवी शक्तीने सौदाने यांना समजले आणि त्यांनी गुप्ता यांच्या दुकानात रेड केली. आणि कारवाई केली याबाबत आम्ही नांदगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार सुनील सौदाने यांचा नागरी सत्कार करणार आहे.
- संतोष बळीद, उपजिल्हाप्रमुख शिवसेना,
No comments:
Post a Comment