नांदगांव (प्रतिनिधी) - संपूर्ण विश्व युद्धामुळे धुमसत असतांना , शांती,करुणा, दया व अहिंसेची शिकवण देणारे" जगा आणि जगू द्या "हा दिव्य संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार व तत्वज्ञान याची आजच्या युगात सर्वाधिक आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जैन तत्वज्ञानाचे अभ्यासक व वक्ते आशिष कुमार छाजेड( नाशिक ) यांनी केले. ते सकल जैन समाज व विधीज्ञ जयकुमार कासलीवाल गौरव समिती आयोजित भ. महावीर जयंती व्याख्यानमालेचे पंचविसावे पुष्प गुंफतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी . ॲड. जयकुमार कासलीवाल हे होते . याप्रसंगी व्यासपीठावर ओसवाल श्वेतांबर जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, सुभाष लोढा, महामंत्री महावीर पांडे, सचिन म. पारख आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक दत्तराज छाजेड यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय शैलेश चोपडा यांनी करून दिला.तर ॲड. कासलीवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला . मंगलाचरण व स्वागत गीत सौ सारिका पाटणी व सौ.यशश्री सुराणा यांनी सादर केले. सूत्रसंचालन कु. इशिका अजमेरा यांनी तर आभार प्रदर्शन संजय लोहाडे यांनी केले . भ.महावीर जयंती निमित्ताने सकल जैन समाजाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे प्रभात फेरी काढण्यात आली . भगवान महावीर मार्गावरील ख. दि. जैन मंदिर येथून प्रारंभ होऊन ओसवाल भुवन मार्गे विविध चौकातून जाऊन स्व. ज.ता.का. जैन धर्म शाळेत येताच सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले याप्रसंगी जैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tuesday, March 31, 2026
Sunday, March 29, 2026
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी आमिन नवाब शेख तर सरचिटणीसपदी चंचल गंगवाल यांची बिनविरोध निवड,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची सन २०२६-२०२७ या वर्षासाठीची महत्त्वाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष अण्णा बोरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोराडे यांनी २९ मार्च २०२६ रोजी अधिकृत निकालपत्र जाहीर केले असून, यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड निश्चित करण्यात आली आहे:
या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ही कार्यकारिणी तत्पर राहील, असा विश्वास नूतन अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला. या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार बब्बूभाई शेख , माजी अध्यक्ष संजय मोरे, विजय चोपडा , अनिल धामणे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी आगामी जिल्हा पत्रकार संघाचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम नस्तनपूर येथे घेण्याची घोषणा करण्यात आली.
- नूतन कार्यकारिणी २०२६-२०२७ :
१) आमिन नवाब शेख - अध्यक्ष
२ )महेश हरिभाऊ पेवाल - कार्याध्यक्ष
३) बाबासाहेब कारभारी काळे - उपाध्यक्ष
४) विजय सुधाकर भावसार - उपाध्यक्ष
५) चंचल मदनलाल गंगवाल - सरचिटणीस
६) सुहास लक्ष्मणराव पुनतांबेकर - सहसरचिटणीस
७) सतिष रतनसिंग परदेशी - खजिनदार
८) अनिल शामराव शिंदे - सहखजिनदार
९) अजहर शफी शेख - संघटक
१०) सचिन अंबादास पांडे - सहसंघटक
११) अनिल महादू आव्हाड - समन्वयक
१२) सचिन पुंजाराम गायकवाड - कार्यकारी सदस्य
१३) दिगंबर पोपट सोनवणे - कार्यकारी सदस्य
१४) मोहम्मद नवाब शेख - कार्यकारी सदस्य
१५) संतोष रामचंद्र खताळ - कार्यकारी सदस्य
Saturday, March 7, 2026
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व पोषण आहार कक्षाचे महिला कर्मचारी यांचा पेन, पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, विद्यालयाच्या वतीने प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला ज्ञानाचे प्रतीक म्हणून पुस्तक, लेखणीचे प्रतीक म्हणून पेन आणि स्नेहाचे प्रतीक म्हणून गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी महिला दिनाचा उद्देश व ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून का साजरा करण्यात येतो हे सांगितले.
यावेळी बोलताना विद्यालयातील उपशिक्षक वासुदेव कवडे महिलांच्या समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "आजच्या युगात महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. घरातील जबाबदारी सांभाळून शैक्षणिक क्षेत्रात त्या देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे," असे विचार त्यांनी मांडले. केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षभर महिलांचा सन्मान राखणे हीच काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी सांगितले की, "स्त्री ही कुटुंबाचा आणि समाजाचा कणा आहे. शिक्षिका म्हणून त्या भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला बळ देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असते."
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी तर आभार बाळासाहेब कवडे यांनी मानले.
Thursday, March 5, 2026
नस्तनपूर रेल्वे उड्डाणपूल भूसंपादन संदर्भात शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट,
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड ते न्यायडोंगरी दरम्यानच्या नस्तनपुर रेल्वे फाटकावरील प्रस्तावित उड्डाण पुलाचे कामामुळे होणाऱ्या भू-संपादनातील तांत्रिक अडचणी व रास्त मोबदला ह्या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार भास्करराव भगरे सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्व तांत्रिक अडचणी आणि मोबदला मिळण्यातील शेतकऱ्यांच्या शंका ह्या संदर्भात सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी काहीही अडचण येणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले. तसेच उप जिल्हाधिकारी श्रीमती भोसले मॅडम ह्यांना योग्य सूचना देऊन कोणतीही अडचण न होता प्रत्यक्ष स्थळ पंचनाम्यानुसार होणारे भू संपादन,पिकहानी, स्थावर मालमत्ता, पाईप लाइन, वृक्षतोड ह्या सर्व बाबींचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणेकामी सूचना देण्यात आल्या. शिष्टमंडळातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी बद्दल समाधान व्यक्त केले. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे,ॲड प्रमोद अगोणे , संदीप पवार,सौरभ गरुड,भाऊसाहेब वामन, बाळू म्हस्के, वाल्मीक म्हस्के, नितीन आहेर, आप्पा शिंदे, आबासाहेब मवाळ, अशोक गुंजाळ यांचा सहभाग होता.
नांदगाव येथील मविप्र महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्यातून २४६ विद्यार्थ्यांना मिळाली नियुक्तीपत्रे,
नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान नांदगाव महाविद्यालय व CII-MCC नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला. महिंद्र सोना लि., बॉश, टाटा मोटर्स, ब्लिंकीट, किर्लोस्कर, बजाज आणि टापारिया टूल्स लि. इत्यादी नामांकित कंपन्यांसोबतच ५० हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या. या मेळाव्यात २४६ हून अधिक विद्यार्थ्यांना मुलाखती झाल्यानंतर लगेचच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे यांनी नांदगाव परिसरातील औद्योगिक कंपन्यांची उणीव, येथील विद्यार्थ्यांमध्ये असलेली विविध कौशल्ये आणि त्याप्रमाणात त्यांना प्राप्त होणाऱ्या रोजगाराच्या संधींची असमानता यादृष्टीने या रोजगार मेळाव्याचे महत्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी निर्भिड होऊन आत्मविश्वासाने आलेल्या परिस्थितीचा सामना करत आलेल्या संधीचे सोने करावे आणि नियुक्तीपत्रासोबतच नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याची मानसिकता तयार करावी असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. दहावी, बारावी, ITI, पदवी, पदव्युत्तर पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकिंग, फायनान्स, मेडिकल, ऑटोमोबाईल, इंजीनियरिंग व अन्य इतर क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदगाव, मनमाड, मालेगाव परिसरातील विद्यार्थी या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणूनच हा मेळावा नांदगाव महाविद्यालयात घेण्याचा आग्रह होता. तसेच या मेळाव्यासाठी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एवढा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
CII-MCC चे मॅनेजर श्री सागर शिरसाठ यांनी मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या तरुणांना विविध कंपन्यांची माहिती देत विद्यार्थ्यांनी सर्वच कंपन्यांच्या HR प्रमुखांची भेट घेऊन मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करत मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक रमेश अण्णा बोरसे, योगेश भाऊराव बोरसे, ITI प्राचार्य एच. बी . ठाकरे, मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. गव्हाणे, होरायझन अकॅडमीच्या प्राचार्य पूनम मढे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. के. आर. खंदारे, प्रा. गोकुळ बोरसे, प्रा. पी . एम. आहेर, IQAC समन्वयक प्रा. एम बी आटोळे, प्रा. स्वप्निल शेंडगे, प्रा. बी. पी. मोरे, प्रा. आर व्हि. वाघ, प्रा. ए. बी. जाधव, प्रा. बी.एम. आहिरे, प्रा. एम. पी. मेश्राम, प्रा. एस. जे. कर्वे, प्रा. एस. पी. दौंड, प्रा. योगेश वाघ, प्रा. ए. एफ. राठोड, प्रा. श्रीमती धोंगडे, प्रा. श्रीमती आहिरे, प्रा. श्रीमती आवारे आणि मोठ्या संख्येने परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.एस. प्रसाद व आभार प्रदर्शन प्रा. डी. वाय. तुंगार यांनी केले.
Wednesday, March 4, 2026
नांदगाव नगर परिषदेस नगरोत्थान योजनेतून डॉग शेल्टर बांधकामासाठी निधी मंजूर,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच नगरपरिषद प्रशासन यांचे संयुक्त आढावा बैठकीत २१ फेब्रुवारी रोजी मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे नगराध्यक्ष सागर हिरे यांनी बांधकामासाठी निधी मागणी केली. जिल्हाधिकारी नाशिक यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर अंतर्गत ४६ लक्ष ९७हजार इतकी रक्कम मंजूर करून प्रशासकीय मान्यता प्रदान केली, असल्याची माहिती नगराध्यक्ष सागर यांनी याबाबत माहिती दिली.
शहर व परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांच्या मागणीप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या कामी निधी मिळणे साठी आमदार सुहास कांदे यांनी प्रयत्न केले . जिल्हाधिकारी यांनी या महत्वपूर्ण कामासाठी तातडीने निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. याबाबतचे आदेश नगरपरिषद प्रशासनास प्राप्त झाले . लवकरच या कामी निविदा प्रक्रिया करून काम काम सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका ५/२०२५ मध्ये न्यायालयाने भटक्या जनावरामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणे कामी निर्देश दिले होते.
Subscribe to:
Comments (Atom)
मनमाड–इंदोर रेल्वेमार्गामुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश ,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मनमाड–इंदोर रेल्वेमार्गाच्या प्रगतीपथावरील कामामुळे अस्तगाव ता. नांदगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती सं...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...