Sunday, April 19, 2026

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!






नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवार दि.१५ एप्रिल रोजी जाहीर झाला.या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी भरारी मारली.
या परीक्षेस ३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.१००%निकालाची परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम ठेवली .त्या पैकी चारू यादव या विद्यार्थ्यांनी ९५.०%गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तर यथार्थ नाईक या विद्यार्थ्याने ९४.४%गुण मिळवून द्वितीय तर प्रियांश अग्रवाल या विद्यार्थ्याने ९३.८% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला अर्णव अग्रवाल व नयना जाधव या विद्यार्थ्यांनी ९३.०%गुण मिळवून चतुर्थ तर आदित्य बोरसे व सार्थक सिसोदिया या विद्यार्थ्यांनी ९०.०% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकवला. तसेच तनिष्का मोकळ ८९.८%, साईप्रसाद पाटील ८९%,दिलशाद अन्सारी ८८%, पियुष काळे ८८%, प्रणवी सोनवणे 88%, सार्थक काळे ८८% या विद्यार्थ्यांनी विशेष उल्लेखनीय गुण मिळविले. चारू यादव या विद्यार्थिनींने सामाजिक शास्ञ(SST) विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले. तसेच यथार्थ नाईक, नयना जाधव, शंतनू टिळेकर या विद्यार्थिनींनी मराठी या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) या विषयांमध्ये संपूर्ण वर्गाने ८५ पेक्षा जास्त गुण मिळवत उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयास वैभव प्राप्त करून दिले.
या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक यांनी खूप परीश्रम घेतले.या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षका यांनी विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वाखारीच्या किसान महाविद्यालयात रंगमंचावरील छताच्या बांधकामाचे भूमिपूजन!!






वाखारी, नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे  किसान माध्यमिक विद्यालयात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रंगमंचावरील छताच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व भरत आहिरे यांच्या स्वखर्चातून सदर बांधकाम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आहिरे सर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.  तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष विजय चोपडा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीष चव्हाण हे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडू खालकर सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विजय चोपडा यांच्या हस्ते भरत आहिरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच  शिक्षक प्रतिनिधी सुनील हिंगमीरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नंदू दवांगे, प्रशांत वाघ, समाधान सोनवणे हे उपस्थित होते.

Tuesday, April 14, 2026

मनमाड–इंदोर रेल्वेमार्गामुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश ,







नांदगाव (प्रतिनिधी)  - मनमाड–इंदोर रेल्वेमार्गाच्या प्रगतीपथावरील कामामुळे अस्तगाव ता. नांदगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती संसाधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार भास्करराव भगरे सर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत शेतकऱ्यांच्या पाईपलाईनसह शेतीतील इतर विविध नुकसानीबाबत मुद्देसूद मांडणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष स्थळ पंचनाम्यानुसार एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने योग्य ती कार्यवाही करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्यासह ज्ञानेश्वर दुकळे, मनोहर काजीकर, भास्कर उगले, सुभाष उगले, त्र्यंबक नागरे, अमोल उगले, दिलीप गेठे, कुणाल बोरसे आदी उपस्थित होते.

न्यू इंग्लिश विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन ; थोर विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन!






नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण,शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
    या कार्यक्रमाच्या प्रारंभी 'भारतीय संविधान' वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची भाषणे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
       जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी "विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांचा 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र जीवनात अमलात आणला पाहिजे. केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे हेच खरे शिक्षण आहे," असे विचार त्यांनी मांडले.
      उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना "बाबासाहेबांचे जीवन हा संघर्षाचा आणि जिद्दीचा प्रवास आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ज्ञानाच्या जोरावर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी," असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
          कार्यक्रमात विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी भाषणे केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण, त्यांचे उच्च शिक्षण आणि संविधानाचे महत्त्व यावर विद्यार्थिनींनी प्रकाश टाकला. त्यांच्या ओघवत्या शैलीतील भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.




Thursday, April 2, 2026

आमदार सुहास कांदे व उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुम कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा, ८ किलो वजनाचे चांदीचे विविध अलंकार अर्पण !!



नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव बुधवार (दि.१) पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून , यात्रेच्या पहिल्या दिवशी नांदगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री एकविरा देवीला आमदार सुहास कांदे व उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुम कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून ८ किलो वजनाचे चांदीचे विविध अलंकार अर्पण करण्यात आले.
    यावर्षी प्रथमच यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महिलेची अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि तो मान अंजुम कांदे यांना मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदा पाच दिवसांचा यात्रोत्सव वाढवून 'सलग सात दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुहास कांदे आणि यात्रोत्सव समितीच्या अध्यक्ष अंजुम कांदे यांच्यावतीने यात्रोत्सवात पारंपरिक रहाड, बोहाडा, गण, बारागाड्या, सोंगे, वाद्यांच्या गजरात मिरवणुका तसेंच सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष रेलचेल पाहायला मिळणार आहे. यात्रोत्सवात गायक अभिजीत जाधव व आमु जाधव यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, प्रसिद्ध नृत्यांगना लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या बहारदार लावणीचा कार्यक्रमही भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे. तसेच महामंडलेश्वर पनि पायलनंदगिरीजी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत देवीच्या स्तुतीसाठी भव्य-दिव्य जोगवा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि वाद्यांच्या निनादात संपूर्ण नांदगाव नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. आज १ एप्रिल रोजी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी मातेची स्तुतीसाठी व इतर देवदेवतांना आमंत्रण देण्यासाठी पारंपरिक गण हा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक ८ वाजता मंदिरापासून पालखी मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी बारा वाजता महाआरती होणार आहे. सायंकाळी पाच वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सवात नामांकित पैलवान सहभागी होणार असून नामांकित पहिलवानांची कुस्ती पाहण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी यात्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुम कांदे व यात्रोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

Tuesday, March 31, 2026

नांदगावात भगवान महावीर जयंतीनिमित्ताने प्रभातफेरी,





नांदगांव (प्रतिनिधी) - संपूर्ण विश्व युद्धामुळे धुमसत असतांना , शांती,करुणा, दया व अहिंसेची शिकवण देणारे" जगा आणि जगू द्या "हा दिव्य संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार व तत्वज्ञान याची आजच्या युगात सर्वाधिक आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जैन तत्वज्ञानाचे अभ्यासक व वक्ते आशिष कुमार छाजेड( नाशिक ) यांनी केले. ते सकल जैन समाज व विधीज्ञ जयकुमार कासलीवाल गौरव समिती आयोजित भ. महावीर जयंती व्याख्यानमालेचे पंचविसावे पुष्प गुंफतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी . ॲड. जयकुमार कासलीवाल हे होते . याप्रसंगी व्यासपीठावर ओसवाल श्वेतांबर जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, सुभाष लोढा, महामंत्री महावीर पांडे, सचिन म. पारख आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक दत्तराज छाजेड यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय शैलेश चोपडा यांनी करून दिला.तर  ॲड. कासलीवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला . मंगलाचरण व स्वागत गीत सौ सारिका पाटणी व सौ.यशश्री सुराणा यांनी सादर केले. सूत्रसंचालन कु. इशिका अजमेरा यांनी तर आभार प्रदर्शन संजय लोहाडे यांनी केले . भ.महावीर जयंती निमित्ताने सकल जैन समाजाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे प्रभात फेरी काढण्यात आली . भगवान महावीर मार्गावरील ख. दि. जैन मंदिर येथून प्रारंभ होऊन ओसवाल भुवन मार्गे विविध चौकातून जाऊन स्व. ज.ता.का. जैन धर्म शाळेत येताच सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले याप्रसंगी जैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, March 29, 2026

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी आमिन नवाब शेख तर सरचिटणीसपदी चंचल गंगवाल यांची बिनविरोध निवड,


.              नुतन तालुकाध्यक्ष - अमिन नवाब शेख
.         सरचिटणीसपदी - चंचल मदनलाल गंगवाल
.                कार्याध्यक्ष - महेश हरिभाऊ पेवाल 




नांदगाव (प्रतिनिधी ) - नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची सन २०२६-२०२७ या वर्षासाठीची महत्त्वाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष अण्णा बोरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
   निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोराडे यांनी २९ मार्च २०२६ रोजी अधिकृत निकालपत्र जाहीर केले असून, यामध्ये  पदाधिकाऱ्यांची निवड निश्चित करण्यात आली आहे:
या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ही कार्यकारिणी तत्पर राहील, असा विश्वास नूतन अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला. या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार बब्बूभाई शेख , माजी अध्यक्ष संजय मोरे,  विजय चोपडा , अनिल धामणे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,  यावेळी आगामी जिल्हा पत्रकार संघाचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम नस्तनपूर येथे घेण्याची घोषणा करण्यात आली.

- नूतन कार्यकारिणी २०२६-२०२७ :

१)  आमिन नवाब शेख -  अध्यक्ष
२ )महेश हरिभाऊ पेवाल - कार्याध्यक्ष
३) बाबासाहेब कारभारी काळे - उपाध्यक्ष
४) विजय सुधाकर भावसार - उपाध्यक्ष
५) चंचल मदनलाल गंगवाल - सरचिटणीस
६) सुहास लक्ष्मणराव पुनतांबेकर - सहसरचिटणीस
७) सतिष रतनसिंग परदेशी - खजिनदार
८) अनिल शामराव शिंदे - सहखजिनदार
९) अजहर शफी शेख - संघटक
१०) सचिन अंबादास पांडे - सहसंघटक
११) अनिल महादू आव्हाड - समन्वयक
१२) सचिन पुंजाराम गायकवाड - कार्यकारी सदस्य
१३) दिगंबर पोपट सोनवणे - कार्यकारी सदस्य
१४) मोहम्मद नवाब शेख - कार्यकारी सदस्य
१५) संतोष रामचंद्र खताळ - कार्यकारी सदस्य



नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...