Saturday, December 30, 2023

नांदगाव येथील गौरव कदम यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव,








नांदगाव (प्रतिनिधी ) - जिद्द,मेहनत,चिकाटी असेल,तर यश निश्‍चित मिळते.दुष्काळग्रस्त नांदगांव तालुक्यातील नांदगांव शहरातील असलेल्या हमालवाडा भागातील दूरसंचार विभागात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्याचे कौतुक होत आहे.
   राज्यातील पोलीस उपनिरीक्षक भरतीची पूर्व परीक्षा २०२१ ला तर मुख्य परीक्षा २०२२ ला झाली होती.निकाल गुरुवारी ता.२८ रोजी जाहीर झाला.त्यात नांदगाव शहरातील हमालवाडा येथील गौरव सुरेश कदम यांनी यश संपादन केले.गौरवने २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले आहे.कुटुंबात पहिलाच पोलीस अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.गौरव चे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्य प्राथमिक शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण येथील व्ही.जे स्कूलमध्ये त्यांनी पूर्ण केले.महाविद्यालयीन शिक्षण नांदगावच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केले नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले.पदवीसाठी नाशिक येथे प्रवेश घेतला.महाविद्यालयीन शिक्षण घेत.सायन्स विषयाची पदवी त्यांनी घेतली.त्यानंतर बाहेर काम करत त्यांनी कोणताही क्‍लास न लावता दिवसाकाठी पाच ते सह तास रविवारी संपूर्ण दिवस मुद्देसूद अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशाला गवसणी घातली.वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन गौरवने सातत्याने अभ्यास करून आज पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.त्याचे यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.नांदगांव येथील दूरसंचार विभागात अल्पमजुरीवर काम करणाऱ्या सुरेश गणपत कदम यांचे ते पुत्र आहेत.आई गृहणी तर मोठा भाऊ विकी कदम फोटोग्राफर आहे. दुसरा भाऊ योगेश कदम आय.टी कंपनीत इंजिनिअर आहे. गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.गौरवचे हमालवाडा येथील रहिवासी व मल्हारवाडी येथे श्रीराम जनसेवा मोफत वाचनालयात अध्यक्ष रवि सोनवणे यांनी नागरी सत्कार केला यावेळी गौरव यांनी तरुणांना मार्गदर्शन केले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.











मनमाड रेल्वे स्थानकावर जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा जोरदार स्वागत,






मनमाड (विशेष प्रतिनिधी) - भारतीय रेल्वेच्या वतीने काल  अजून सहा वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . यातील जालना ते मुंबई या गाडीचे जालना येथून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. तर मनमाड येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार भुसावळ डिव्हिजनचे डी आर एम इथी पांडे व आमदार नरेंद्र दराडे यांनी स्वागत करून गाडीला पूढे रवाना केले .यावेळी रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात या वंदे भारत रेल्वेचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे ध्वज घेऊन या कार्यक्रमात जल्लोष साजरा केला .कार्यक्रम शासकीय होता की भाजपचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला होता.

Tuesday, December 26, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले पांझण डाव्या कालव्याचे जलपूजन,





नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी)  - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणा वरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आता पाटाला पाणी सोडण्यात आले. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
      आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले. याप्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवाडी सह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच  मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असे मत व्यक्त केले. पन्नास वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेला पाठपुराव्या मुळे आज आपल्या पाटाला पाणी आल्याचा आनंद मलाही होत असल्याचे सांगितले‌ ‌. लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करणार असल्याचे सांगितले. तसेच उर्वरित गिगाव दहिवाळ रोझे पाडळदे शेरूळ हिसवाळ या गावांना लिफ्ट द्वारे पाणी मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली . यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करायचे तसेच मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीतला पाणी मिळेल असे काम करायचे आहे असे मत व्यक्त केले. 
          मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते. मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आजरोजी धरणात पाणीसाठा कमी आहे. या मुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. यानुसार २९ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे यंदा देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. 
     आज सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले, या मुळे पाणीटंचाईसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
         कळवाडीसह चिंचगव्हाण, नरडाणे, उंबरदे, दापुरे, साकुर, देवघट या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका झाली असून जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
     या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी डीजे लावत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे गावात स्वागत केले. 
या कार्यक्रमासाठी कळवाडी गटातील सर्वच गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, गटप्रमुख दिनकर आबा महाले, यशवंत देसले, प्रदीप सर देसले, रोहित जाधव, बाळू शेठ बोरा, सोनू पाटील, महेंद्र सिसोदे, उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर, चंद्रशेखर शेलार, केदा भवर, नाना पगार, प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी, प्रवीण सावकार, बाबाजी सूर्यवंशी, यशवंत भीमराव देसले, जगदीश देसले, अनिल देसले, गंभीर देसले, हेमंत देसले, प्रदीप देसले, राकेश आहिरे, साहेबराव नरवडे, अभिमान डांबरे, पीडी चव्हाण, राजू आहिरे, राहुल सरावत, महेंद्र परदेशी, किशोर बोराळे, विलास परदेशी, महेश शेरेकर, सुरेश अहिरे, मिनराम शांताराम मगर, दिलीप मगर, आण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगावचे सुप्रसिद्ध कवी दयाराम अहिरे यांचे अल्पशा आजाराने निधन,






नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावचे सुप्रसिध्द साहित्यिक व व्ही.जे. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कवी दयाराम दामु आहिरे (गिलाणकर)सर यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मालेगाव तालुक्यातील गिलाणे येथील मळ्यात येथे झाला.  शालेय अद्यापनाबरोबरच आपली साहित्य व नाट्यकला जोपासत नांदगाव सारख्या ग्रामीण भागात साहित्याची गोडी अनेकांमध्ये निर्माण केली. व सुरवातीला काही मोजक्या मित्रमंडळी सह साहित्यिक चळवळ साहित्यानंद च्या माध्यमातून  नव्वदच्या दशकात सुरू केली.  पुढे २००९ मध्ये मराठी साहित्य परिषद शाखा नांदगावची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यामुळे नांदगाव शहरात साहित्य चळवळ चांगलीच बहरत गेली. आणि अनेक कवी, लेखक यांच्या पुस्तकाची निर्मिती झाली. यासाठी डी.डी.चे योगदान मोठे आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक कवी व लेखक यांना आमंत्रित करून शहरातील श्रोत्यांना साहित्यिक मेजवानी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. व स्वतः चे "बळीच जिणं " काव्यसंग्रह तसेच "सप्तरंगी एकांकिका " हा एकांकिका संग्रह प्रकाशित केला. व इतरांनाही कविता,कथा, ललित लेख लिखाणास सतत प्रोत्साहन सरांकडुन मिळत असल्यामुळे नांदगाव शहरात साहित्य चळवळ निर्माण करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. आज त्यांच्या निधनाने नांदगाव शहरातील साहित्य चळवळ पोरकी झाली.

Monday, December 25, 2023

नांदगाव भाजपतर्फे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी,







 नांदगाव (प्रतिनिधी )  -  नांदगावच्या शनि चौक येथे भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणुन साजरी करण्यात आली. स्व. अटलजी यांना अभिवादन करताना भाजपा च्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड यांनी स्व. अटलजी यांच्या सोबत दिल्ली येथील संसद भवनात घडलेल्या भेटी बद्दल ची आठवण सांगितली. सदर कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय सानप, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, सोमनाथ घोंगाणे, सतीश शिंदे, मनोज शर्मा, बाबाजी शिरसाठ, ॲड. बी.आर चौधरी, संजय पटेल, महीला मोर्चा शहर अध्यक्षा अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, ॲड. उमेश सरोदे, डॉ. बी.के आहेर, कांतीलाल पटेल, अमोल चव्हाण, धम्मवेदी बनकर, नंदु शर्मा, राजेंद्र चौधरी, देविदास शिंदे, काजल जाधव, नंदिनी निळे, स्वाती जाधव, आकांक्षा रोकडे, वंश पटाईत, संजय सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात स्व. वाजपेयीजी यांच्या प्रतिमेचे पूजन हे शहरातील जेष्ठ नागरिकांना तर्फे करण्यात आले आणि स्व. वाजपेयीजी यांच्या अजरामर कविता व जीवनातील काही प्रसंग, लोकसभेतील त्यांचे भाषण त्यांच्याच प्रखर आणि तेजोमय आवाजात ध्वनिक्षेपक द्वारे उपस्थितांना ऐकविण्यात आल्या. वंदे मातरम् , अटलजी अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात सुशासन दिवस संयोजक ॲड. जयश्रीताई दौंड आणि सहसंयोजक ॲड. बी.आर चौधरी यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी, महीला आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले.

Wednesday, December 20, 2023

मानवी जीवनाचा संबंध हा विज्ञानाशी - अमित बोरसे, नांदगाव येथील न्यू इंग्लिश विद्यालयात ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन,




नांदगाव (प्रतिनिधी ) - विज्ञान प्रदर्शन हे  विद्यार्थ्यांना सुप्त कलागुणांना वाव देणारे असून,  शिक्षकांनी त्यांच्यातील कल्पनाशक्ती व संशोधक वृत्तीला चालना देऊन भविष्यातील संशोधक तयार करावेत असे आवाहन म. वि. प्र. संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांनी केले. ते न्यू इंग्लिश  विद्यालयात आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप दळवी होते. तर प्रास्ताविक विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष संजय बच्छाव यांनी केले.याप्रसंगी अमित बोरसे यांनी बोलताना सांगितले की, मानवी जीवनाचा संबंध हा विज्ञानाशी आला आहे. आजचे विज्ञान प्रदर्शन हे महान शास्त्रज्ञांना आदरांजली ठरेल.  अब्दुल कलाम हे अतिशय गरीब परिस्थितीतून आले आहेत. देशासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आई - वडिलांनी विद्यार्थीच्या कला गुणांना वाव दिला पाहिजे. तालुक्यातील सर्व संस्थांनी एकत्र येवून विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत..
व्यासपीठावर गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, पोलीस उपनिरीक्षक खडांगळे, पत्रकार अनिल आव्हाड, संजय मोरे, विस्तार अधिकारी नंदा ठोके, न. पा. प्रशासन अधिकारी प्रशासन अधिकारी एन. एम. चंद्रमोरे, जिल्हा विज्ञान अध्यापक संघ कार्यवाहक अरुण पवार, स्कूल कमिटी अध्यक्ष दिलीप देवचंद पाटील, विजय काकळीज, राजाराम गवांदे, मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, मुख्याध्यापक
मुख्याध्यापक वाय चव्हाण, मुख्याध्यापिका जे. आर .काळे, मुख्याध्यापिका एस. एस. कांबळे, मुख्याध्यापक योगेश पाटील, जी. ए .वैद्य, पी .एन‌ खुटे, आयोजक अविनाश शेवाळे, सी. डी .अहिरे, उमेश पाटील, निलेश इप्पर, सुनील कोठावदे, भाऊसाहेब सोनवणे, अजित पगार, आत्माराम बोरसे, बाबूलाल ठोंबरे, प्रवीण ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

नांदगाव महाविद्यालयात विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन,

                       ( छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर )



नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव येथील कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना +२ च्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माजी नांदगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर कवडे यांच्या शुभहस्ते सकाळी अकरा वाजता संपन्न झाले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा. डॉ.एस.एन. शिंदे यांनी केले. आपल्या मनोगतातून महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या कक्षा रुंदावल्या जात असल्याची माहिती दिली. नगरसेवक चंद्रशेखर कवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अमित बोरसे यांनी विविध उदाहरणे देऊन एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी कसा घडला जातो याची जाणीव करून दिली व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एस .आर. जाधव यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी दिलीप पाटील, कैलास पाटील , विठ्ठल दादा आहेर,  सुदामराव काळे, रमेश अण्णा बोरसे, डॉ. प्रवीण निकम,अरविंद पाटील, राहुल पवार, प्रवीण सोमासे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व साहित्य पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.के. पवार व आभार प्रदर्शन प्रा. डी वाय आहेर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर.टी. देवरे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वृंदांनी परिश्रम घेतले.


Saturday, December 16, 2023

नांदगावच्या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण तीनदिवसीय व्याख्यानमालेची सांगता,

                              ( छायाचित्रकार-  सुहास पुणतांबेकर)




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव  येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे तीनदिवसीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला पार पडली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. शामकुमार दुसाने (नाशिक) यांनी 'आरोग्यावर बोलू काही...' या विषयाने गुंफत आरोग्याची निगा दैनंदिन जीवनात सहज-सोप्या पद्धतीने कशी राखली जाईल या विषयावर प्रकाशझोत टाकला. डॉ.बी.बी.आहिरे (लासलगाव) यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प 'आपत्ती व्यवस्थापन...' या विषयावर चर्चा करत गुंफले. प्रा. राजाराम मुंगसे यांनी 'रसास्वाद...' या विषयाने व्याख्यानमालेची सांगता करताना साहित्यातील नऊ रस दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने कायम सामील असतात याचे विश्लेषण केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ आणि मविप्र समाजाचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्र कार्यवाह प्रा.एस.पी.भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रवीण शार्दूल, प्रा.पूजा जाधव, प्रा.योगेश वाघ यांनी केले. आभार डॉ.भारती धोंगडे यांनी मानले. व्याख्यानमाले प्रसंगी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नांदगाव शहरातील विवेक गोदावरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग , जनरल सर्जरी तपासणी शिबिर संपन्न,


नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव येथे काल शनिवारी दि. १६  रोजी विवेक /गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदगाव तसेच एसएमबीटी हॉस्पिटल धामणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग व जनरल सर्जरी तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले . विवेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल  येथे १२५/१३५ लाभार्थीनी शिबिरामध्ये ज्यांना गुडघेदुखी, खांदेदुखी, खांदा वारंवार निसटणे, दुर्बिणीद्वारे गुडघ्यांचे आणि खांद्यांचे सर्व स्नायूवरील शस्त्रक्रिया तसेच हर्निया, हायड्रोसील, आतड्यांच्या शस्त्रक्रिया, स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स व मूळव्याध या सर्व आजारांवर लागणाऱ्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत लाभ घेतला.
मोफत नाव नोंदणी व अल्प दरात एक्स-रे आणि सोनोग्राफी करण्यात आल्या. या शिबिरात विवेक गोदावरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक  डॉ. सुनील तुसे, डॉ.हर्षद तुसे सर ( स्रिरोग  तज्ञ), डॉ.शशांक तुसे सर(हृदयरोगतज्ञ),
डॉ. शुभम इल्ले   (ऑर्थो तज्ञ एसएमबीटी),
डॉ.पूजन बच्चूका (सर्जन तज्ञ एसएमबीटी), 
रफीक शेख सर (टी.एल.नांदगांव  तालुका), 
शोएब मंसूरी (नांदगांव ता.एसएमबीटी प्रतिनिधि)
, संदीप पाचोरकर (चाँदवड ता. एसएमबीटी प्रतिनिधि) यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Tuesday, December 12, 2023

नांदगावच्या शनि चौक येथे भाजपतर्फे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी,





नांदगाव (प्रतिनिधी ) - भाजपचे दिवंगत लोकनेते व भारताचे तत्कालीन केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे  यांची जयंती नांदगाव शहरातील शनी चौक येथे साजरी करण्यात आली. भाजपतर्फे  लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे  यांच्या प्रतिमेचे औक्षण करून व त्यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी  भाजपा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्रीताई दौंड यांनी स्व. गोपीनाथ मुंडे  यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्व. मुंडे साहेब हे अडचणींच्या काळात सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि कशा प्रकारे मदत केली याची त्यांनी प्रचिती सर्व उपस्थितांना सांगितली.  आपण सर्वांनी त्यांची शिकवण अशीच अविरत ठेवत सर्वांना सहायता करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष(उत्तर) गणेश शिंदे व भाजपा शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी प्रतिमेचे पुजन केले. 
            या कार्यक्रमास किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, अनु. जाती जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, शहर उपाध्यक्ष दिपक पाटील, शहर सरचिटणीस सतिश शिंदे, सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, मनोज कासलीवाल, ॲड. मनिषा पाटील, महीला मोर्चा शहर अध्यक्षा अन्नपूर्णाताई जोशी, उपाध्यक्षा ताराताई शर्मा, संजय पटेल, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष गणेश शर्मा, ओबीसी शहर अध्यक्ष दिनेश दिंडे, रविंद्र सानप, कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर, अक्षदा कुलकर्णी, योगिता आहेर, अमोल चव्हाण, रविंद्र कवडे, यश सेठी, कमलेश जाधव, सतिश आहिरे, सुरेश कुमावत, सोमनाथ दुसाने, उत्तम आमले, सुरेश महाले, देविदास शिंदे, अनिल महाले, रामआसरे कहर, जबीन बानो मणियार, मनिषा पाटील, लक्ष्मी सोळसे, ज्योती गाढे, जयश्री भाईजे, उषा आहेर, गीता मोरे, विमलबाई मोरे, मंगल बोडखे, उज्वली मोरे, सुवर्णा मोरे, माया रोकडे, काजल जाधव, स्वाती जाधव, संगीता कटारे, भारती निकम, निकिता आहिरे, भावना पानपाटील, शितल बोराळे, कमलबाई बोरसे आदींनी प्रतिमेचे पुजन केले.

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त शिवसेनातर्फे प्रेरणा दिवस म्हणून साजरा,





नांदगाव ( प्रतिनिधी)- काल मंगळवारी १२ रोजी डिसेंबर लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे  यांची जयंती दिवस शिवसेनेतर्फे प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गट, नांदगाव शहर, मनमाड शहर व मालेगाव येथील संपर्क कार्यालय या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे  यांची जयंती दिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. 
    मतदार संघातील विविध ठिकाणी शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. आमदार संपर्क कार्यालय मनमाड शहर, नांदगाव शहर, मालेगाव, भालूर गटातील पानेवाडी, साकोरा गटातील तळवाडे , वेहेळगाव नायडोंगरी , गटातील पळाशी जातेगाव गटातील कासारी या ठिकाणी प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
     विविध जिल्हा परिषद गट व शहर संपर्क कार्यालय येथे झालेल्या जयंती उत्सवात स्थानिक शिवसेना युवासेना महिला आघाडी प्रतिनिधी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोलठाण येथील नेहा बोरा-मुथा यांना डॉक्टरेट पदवी प्रदान,





बोलठाण , नांदगाव ( प्रतिनिधी ) - बोलठाण येथील सौ. नेहा प्रयुम्न बोरा यांनी नुकतीच ओरियटंल विद्यापीठ, इंदौर तर्फे संगणकशास्त्रात पी. एच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांना डॉ. दिनेशचंद्र जैन यांचे मार्गदर्शन लाभले. बोलठाण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे माजी प्राचार्य स्व. केवळचंद मुथा यांची ती नात व चंद्रकांत व सौ. संगिता मुथा यांची ती कन्या आहे. बोलठाण हायस्कूलची ती माजी विद्यार्थिनी आहे. सौ. नेहा बोरा या सध्या एस. एन. जे. बी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, चांदवड येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Saturday, December 9, 2023

आमदार निधी अंतर्गत नांदगाव पोलीस स्टेशनला संगणक, प्रिंटर उपलब्ध,




 नांदगाव (प्रतिनिधी) - आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार निधी अंतर्गत नांदगाव पोलीस ठाणे यांना चार संगणक सेट व दोन प्रिंटर देण्यात आले. सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते  नांदगाव पोलीस ठाणे येथे चार संगणक व दोन प्रिंटर देण्यात आले. नांदगाव पोलीस ठाणे  यांनी संगणक व प्रिंटर सेटची मागणी केली होती. यानुसार आमदार निधी अंतर्गत त्यांना संगणक व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले. 
     यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिप्रमुख उज्वला खाडे , मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल, नांदगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी , सागर हिरे , शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव , भाऊराव बागुल , शशी सोनवणे ,गुलाब चव्हाण ,भैया पगार , संजय महाजन,  संदीप सूर्यवंशी , बापूसाहेब जाधव, भरत पाटील , गौरव बोरसे , पास्कल कम्प्युटरचे संचालक धनराज अग्रवाल, अरबाज बेग तसेच पोलीस ठाणे नांदगाव येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

मंगळणे येथील सरकारी गायरान क्षेत्रातील वादग्रस्त अतिक्रमण जमीनदोस्त,





नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची सरकारी गायरान जमीन गट क्र. १३४ क्षेत्रातील वादग्रस्त असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी दि. ८ रोजी काढण्यात आले. मंगळणे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सरकारी गायरान जमीन गट क्रमांक १३४ मध्ये हरिदास पोपट पाटील यांनी ६ हेक्टर २५ आर क्षेत्रात अतिक्रमण केले असल्याची तक्रार संजय पाटील यांनी केली होती. या  गट क्रमांक १३४ मधील क्षेत्रावर हरिदास पाटील यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अतिक्रमण काढण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. शुक्रवार रोजी सदर अतिक्रमण काढण्यात आले . यावेळी विस्तार अधिकारी विजय ढवळे, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) दिनेश पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे, ग्रामसेविका हिमगौरी आहेर, वेहळगाव महसूल मंडळ अधिकारी जी. यू. काळे, तलाठी टी. एस. येवले आदींच्या उपस्थितीत काढण्यात आले. या क्षेत्रात बांधकाम करण्यात आलेले आरसीसी इमारत तसेच काही क्षेत्रात लागवड करण्यात आलेले कांदा पीक, मका तसेच ऊस पीक क्षेत्रामध्ये देखील जेसीबी फिरवण्यात आला. अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेवर यापुढे कुणीही अतिक्रमण करू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधक फलक लावण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकाचे धाबे मात्र दणाणले आहे.

नांदगाव येथे सकल मराठा समाजाचे आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू,




 नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील जुन्या तहसीलजवळ सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओ.बी.सी.आरक्षण द्यावे या मागणी करीता नांदगाव जुने तहसील समोर १ डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषणास बसनार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे .  साखळी उपोषणास मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर झाल्टे, तालुका अध्यक्ष भिमराज लोखंडे, कार्याध्यक्ष विशाल वडघुले, मनमाड शहराध्यक्ष विष्णु चव्हाण, खालकर दादा, मांडवड  शिवबा ग्रुपचे  अशोक निकम,डॉ जनार्दन पगार, देवीदास देवरे,निलेश चव्हाण,डॉ. किरण कवडे, पत्रकार किरण काळे,डॉ. निंबा बोरसे, शेतकरी संघटनेचे सोमनाथ मगर,डॉ. विनोद पगार, बाळासाहेब जगताप,गणेश सरोदे, योगेश वाघ,विश्वनाथ जगताप, संदिप पवार ,आण्णा देवरे व बहुसंख्येने मराठा बांधव व भगिनी या आंदोलनात सहभागी आहे.

शालेय पोषण आहार मदतनीस महिलांचे शिक्षणधिकारी यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषण अखेर मागे,






नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव मध्ये शालेय पोषण आहार मदतनीस महिलांचे मानधन वाढीसह इतर मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
आधारवड महिला संस्थेच्या महिलांचे उपोषण गेल्या पाच दिवसांपासून सुरू होते. यासाठी विविध सामाजिक,  राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. शालेय पोषण आहार समितीच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन वाढवून मिळावे, विमा संरक्षण मिळावे, शासकीय कर्मचारी म्हणून रुजू करुन घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या होत्या. 
    अखेर पाचव्या दिवशी जिल्हा परिषदेचे अधिकारी बच्छाव यांनी नांदगाव येथे येवून उपोषणाला बसलेल्या महिलांची भेट घेऊन आपल्या मागण्या शरद गोसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना कळविण्यात आले असून , हा धोरणात्मक निर्णय असून शासन स्तरावर सकारात्मक घेण्याचे आश्वासन बच्छाव यांनी दिल्यानंतर महिलांच्या वतीने संगीता सोनवणे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी दळवी,  प्रभारी  शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पो. नि. नितीन खंडागळे संतोष गुप्ता, गुरु निकाळे. फिरोज शेख आदी उपस्थित‌ होते.

Friday, December 8, 2023

कांदा निर्यात बंदीचा पुनर्विचार करावा - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार,





 नांदगाव (प्रतिनिधी ) - केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नाशिक जिल्ह्यांत या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. निर्यात बंदी मुळे कांद्याचे भाव गडगडले आहे. बाजार समितीत कांदा  लिलावावर यांचा परिणाम झाला आहे.  या निर्यात बंदीचा पुनर्विचार करावा यासाठी केंद्रीय आरोग्य  व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली . त्यांना कांद्यावर लादलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले . जेणेकरुन कांदा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही , असे पत्राव्दारे त्यांनी मागणी केली. 

नांदगाव शहरवासीयांचा पाणीप्रश्न सुटणार !! स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश जाहीर, नवीन जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र उभारणार,




नांदगाव (प्रतिनिधी ) -    गिरणा धरण उदभव ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश जाहीर करण्यात आले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वप्नातील नांदगाव शहरा करिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश नांदगाव नगर परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. नांदगाव नगर परिषदेचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. यात एकूण ५०  कोटी रुपये निधी मंजूर असलेल्या या योजनेअंतर्गत नांदगाव शहरात नविन जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र ही उभारण्यात येणार असुन, शहराची २०४१ पर्यंत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेवून योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
    नांदगाव च्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद देऊन मला आमदार केले असल्याने त्यांच्या प्रमुख अडचणी दूर करणार असल्याचे आश्वासन प्रत्येक वेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिले.  त्यादृष्टीने प्रयत्न करत नांदगाव शहराचा मुख्य पाणी प्रश्न सोडवण्याच्या दिशेने मोठा टप्पा पार केला आहे. नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना प्रस्तावित करून सरकारकडून ती मंजूर करून घेतली असुन  कार्यारंभ आदेशही प्राप्त झाले आहेत.
नांदगावकर माता भगिनी व व्यापारी बांधवांना ही मोठी आनंदाची बातमी आहे, कारण पंधरा ते वीस दिवस नांदगाव शहरात पाणी येत नसल्याने महिला वर्गाची मोठी अडचण होत होती. तसेच लहान - मोठ्या व्यापाऱ्यांना पाण्याची गरज लक्षात घेता या योजनेमुळे शहरातील या अनेक समस्या सुटणार असून शहराच्या विकासाला देखिल चालना मिळणार आहे.





Thursday, December 7, 2023

नांदगावच्या मविप्र महाविद्यालयातील संघाने सांघिक खेळाच्या जोरावर कॉर्फबॉल क्रीडा स्पर्धेत पटकावले विजेतेपद,






नांदगाव ( प्रतिनिधी ) -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ, पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा विभाग समिती, नाशिक तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या  वतीने आयोजित कॉर्फबॉल मुले - मुली या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन बुधवारी दि. ६ डिसेंबर  रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकूण नऊ संघांनी सहभाग नोंदविलेला होता.  नांदगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत संघाने अंतिम सामना जिंकून नाशिक जिल्हा आंतर महाविद्यालयीन कॉर्फबॉल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी मिळवले आहे.
       नांदगाव महाविद्यालयाने प्रथम फेरीत सी.बी.सी महाविद्यालय, द्वितीय फेरीत के. टी.एच. एम. महाविद्यालय तर अंतिम सामन्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संघांना पराभूत करून विजेते पदाचा मान मिळवला. या  नांदगाव महाविद्यालयाच्या  संघातील मुलांमध्ये ( खेळाडू ) - डोळे कैलास, कार्तिक औशिकर, निखिल औशिकर, गणेश आहेर, गणेश महाले, बाजीराव कासार, युवराज दूंदे तर मुलींमध्ये ( खेळाडू )कोमल बच्छाव, अश्विनी एरम, अश्विनी औशिकर, जागृती सोनवणे, प्राची सोर यांचा सहभाग होता. या यशस्वी विद्यार्थिनीचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन  ठाकरे, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगावचे संचालक अमित  बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना खेळाचे योग्य व तांत्रिक मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लोकेश गळदगे व कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य दयाराम राठोड यांचे सहकार्य लाभले.

शिवसेना ्उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख मागण्यांसाठी बसलेल्या महिलांच्या उपोषणाला पाठिंबा,





नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील पोलिस स्टेशनजवळ प्रमुख  मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत येथेच ठिय्या मांडून उपोषण सुरू असणार आहे अशी भूमिका उपोषणकर्त्या महिलांनी घेतली आहे . या उपोषणाला विविध पक्ष, संघटना पाठिंबा देत आहे . काल  गुरुवारी ठाकरे गटाने येथे येऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.  शालेय पोषण आहार योजनेतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प पगार वाढवून मिळावा व इतर मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या महिलांना उपोषणस्थळी जाऊन नांदगाव तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक , तालुका प्रमुख संतोष अण्णा गुप्ता , उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिबा देण्यात आला. 

Wednesday, December 6, 2023

भाजप व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नांदगावचे दत्तराज छाजेड यांची नियुक्ती,






नांदगाव ( प्रतिनिधी ) - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी  उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नांदगाव येथील दत्तराज छाजेड यांची निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांचे मार्गदर्शनात व्यापारी आघाडीचे प्रदेश  प्रमूख वीरेंद्र कूकरेजा यांनी त्यांच्या नावांची नियुक्ती जाहीर केली.  छाजेड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणा पासून स्वयंसेवक आहेत.   गत २५ वर्षांपासून  संघटनेत सातत्याने विविध पदावर कार्यरत आहेत.   दोन टर्म नांदगाव तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असताना लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद ,पंचायत समिती या निवडणुकीत पक्षाला चांगले मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचे  मोठे योगदान आहे.  सामाजिक संस्था संस्कृती रक्षक केंद्राची स्थापना करून अनेक  सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने  राबविले आहेत.  महाविद्यालयीन जीवनात पुणे विद्यापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्षपद व सिनेट सदस्य पद भूषवले आहे.  भारतीय जैन संघटनेचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष पदावर ही त्यांनी काम केलेले आहे.   व्यापारी आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्षपदावर  कायरत असतांना फेर निवड होवून ही त्यांनी राजीनामा दिला होता. त्या पाठोपाठ  जिल्हाभरात शेकडो  पदाधिकारी यांनी पक्षपदाचा त्याग करून फक्त भाजपा सदस्य  रहाणे पसंत केले होते.  प्रदेश महामंत्री व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विजयराव चोधरी यांनी त्याची दखल घेवून सर्व पदाधिकारी यांचेशी विचार विनिमय मार्गदर्शन करून पुन्हा सर्व पदाधिकारी सक्रीय केले.  त्यांचे निवडी बद्दल भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच एक अभ्यासू   सर्वसमावेशक व लोकप्रिय नेतृत्वाचे या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भारतरत्न डॉ‌. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिलांना मूलभूत अधिकार मिळाले , उपोषणकर्त्या महिलांनी केलं मत व्यक्त,




नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगावच्या जुन्या तहसील कार्यालयाजवळ शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे आमरण उपोषण सुरू आहे .  या महिलांनी आंदोलन स्थळीच  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हाला महिलांना मूलभूत अधिकार मिळाले असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.यावेळीं महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नांदगाव मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन,




नांदगाव (प्रतिनिधी )  - नांदगाव मध्ये भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर आणि तालुका यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन व मेणबत्ती प्रज्वलीत करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम नांदगाव येथील शनी चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
           शहरातील  कार्यक्रमास भा.ज.पाच्या जेष्ठ नेत्या ॲड.जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रशांत खैरनार, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, डॉ. अशोक सदगीर, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, सोमनाथ घोंगाणे, मनोज शर्मा, राजेंद्र गांगुर्डे, भाजपा ग्रामीण च्या अक्षदा  कुलकर्णी, ॲड. मनिषा  पाटील, तारा ताई शर्मा, ज्योतीताई गाडे, ओबीसी शहर अध्यक्ष दिनेश दिंडे, ॲड. उमेश सरोदे, डॉ. बाळासाहेब आहेर, बळवंत शिंदे, रवि सानप, समाज सेवक संजय मोकळ, सुरेश कुमावत, अतुल कुलकर्णी, धम्मवेदी बनकर, शुभम सौंदाणे, सतिष आहिरे, सुरसेसह आदींची उपस्थिती होती.

Tuesday, December 5, 2023

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील यशस्वी खेळाडूचे महाविद्यालयांकडून सत्कार,




नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव मधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींनी राज्यस्तरावर यश संपादन केले. या स्पर्धेत महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या . अकोला येथे ०१ डिसेंबर ते ०३ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत पाच विद्यार्थिनी कॉटर फायनल मध्ये प्रवेश केला. तेथे त्यांचा निसटता पराभव झाला . मात्र एका विद्यार्थिनीची राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. या यशस्वी विद्यार्थिनीचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन  ठाकरे, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगाव चे संचालक अमित भाऊ बोरसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन शिंदे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थिनी खेळाचे योग्य व तांत्रिक मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लोकेश गळदगे व कनिष्ठ महा. उपप्राचार्य  दयाराम राठोड यांचे लाभले.

नांदगाव मध्ये आढळला पांढऱ्या तोंडाचा चार फुटांचा कोब्रा ,





नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगावच्या दहेगाव चौफुली येथील बाळकाका कलंत्री काटा समोर दशरथ शिंदे यांचे चहाचे हॉटेल असून हॉटेलच्या मागे शेतीपरिसर आहे. हॉटेल च्या मागून एक पांढऱ्या तोंडाचा साप दगडा मध्ये जाताना दशरथ शिंदे यांना दिसला. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. सर्पमित्र बडोदे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दगड हलवले असता त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा नाग या ठिकाणी लपल्याचे आढळले. अश्या प्रकारचा साप पहिल्यांदाच बघायला मिळाला होता. या नागाची लांबी जवळपास चार फूट होती. नागाच्या तोंडाकडचा भाग फाटलेला असून तोंड पूर्णपणे पांढरे पडले होते. कदाचित मुंगूस व नागामध्ये द्वंद्व झाले असावे आणि नाग मुंगसाच्या तावडीतून सुटलेला असावा. नागाच्या तोंडाला जखम झालेली होती. अश्या प्रकारचा नाग पहिल्यांदाच सापडल्याने याची माहिती मिळविण्यासाठी सर्पमित्र बडोदे यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना या नागाचे फोटो पाठवले. राहुल शिंदे यांनी फोटोचे निरीक्षण केले आणि मुंगसाने या नागाचे तोंड फाडल्याचा अंदाज असून यामुळे या नागाची शिकार करण्याची क्षमता कमी झाली असावी. यामुळे हा नाग अशक्त झाला असावा. अशक्तपणा मुळे या नागाला योग्य प्रमाणात पोषण मिळाले नसावे आणि त्याच्या शरीरातील मेलनीनचे प्रमाण कमी होऊन याच्या त्वचेचा मूळ रंग जाऊन त्या ठिकाणी पांढरा रंग येत आहे किंवा हा पूर्वीपासूनच लुसिस्टिक म्हणजे पांढरा असावा आणि त्याच्या शरीराला आलेल्या पांढऱ्या रंगामुळे तो मुंगसाच्या नजरेस सहजरित्या पडला असावा आणि त्यातून तो मुंगसाकडून जखमी झाला असावा. याच्या शरीरावर आलेल्या पांढऱ्या रंगामुळे हा लुसिस्टिक होत असून या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत लुसिझम म्हणतात. ल्युसिझम म्हणजे रंगद्रव्य हस्तांतरणातील दोषामुळे मेलेनिनचे आंशिक किंवा पूर्ण नुकसान झाल्याने रंगद्रव्य कमी होते आणि ती त्वचा रंगहीन होते किंवा तिथे पांढरा रंग येतो. या नागाचा संपूर्ण तोंडाचा भाग पांढरा पडला असून शरीराच्या काही भागांवरील खवलेही पांढरे झाले आहेत असे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले. सर्पमित्र विजय बडोदे यांनी या नागास पशुवैद्यकीय डॉ यांच्याकडे नेऊन उपचार केले आणि नांदगाव वनविभाग नोंद करून या नागास तात्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

नांदगाव येथे शालेय पोषण आहार मदतनीस महिलांचे मानधन वाढीसह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण,





नांदगाव (प्रतिनिधी ) - शालेय पोषण आहार समितीच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन वाढवून मिळावे विमा संरक्षण मिळावे शासकीय कर्मचारी म्हणून रुजू करुन घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी  नांदगाव पोलिस स्टेशन समोर आधारवड महिला संस्थेच्या महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे .जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवू अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे. याठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी भेट घेऊन हा निर्णय केवळ नांदगाव तालुक्याचा नसून संपूर्ण राज्याचा आहे यामुळे उपोषण मागे घ्या अशी विनंती केली.  मात्र सर्व महिलांनी यास विरोध केला . आता जोपर्यंत सरकार दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने उपोषण सुरूच आहे.

Monday, December 4, 2023

नांदगावात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत सात हजार आठशे रुपये दंड वसूल, शहरांत वाहतूक पोलीस अॅक्शन मोडमध्ये,




नांदगाव (प्रतिनिधी ) -   मनमाड येथील रेल्वे पुलाचा काही भाग कोसळला असल्यामुळे मनमाड मार्गे जाणारी शिर्डी, अहमदनगर व आंतरराज्य वाहतूक नांदगाव मार्गे वळविण्यात आल्याने नांदगाव शहरातील वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून वाढलेल्या वाहतूकीने एका महिलेचा बळी घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून नांदगाव पोलीस व नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत सात हजार आठशे रुपये दंड वसूल केला आहे.पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी शहरातील व्यापारी व नागरिकांना आव्हान केले . वाहतूकीला अडथळा ठरणारे सामान काढून घेऊन सहकार्य करावे‌ अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शहरातील रेल्वे उड्डाणपूल पुलाचा काही कोसळला असल्यामुळे सर्व वाहतूक नांदगाव मार्गे वळविण्यात आली असून शहरातील वाहतूकीत प्रचंड वाढ झाली मुळातच शहरातील रस्ते अरुंद असल्याने तसेच या मार्गावर शाळा, महाविद्यालय,  बँक आहे. नागरिकांना यामुळे मोठा त्रास होत असून रहदारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून नाशिक ग्रामीण व नांदगाव पोलीसांनी संयुक्त कारवाई करत सात हजार आठशे रुपये दंड वसूल केला आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी शहरातील व्यापारी व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना आवाहन केले आहे की वाहतूकीला अडथळा ठरणारे दुकानाबाहेर ठेवलेले सामान काढून घेण्यात यावे अन्यथा नागरिकांना चालण्यासाठी पादचारी मार्ग मोकळा करून द्यावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

Sunday, December 3, 2023

भारतीय जनता पक्षाकडून तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर जल्लोष,




नांदगाव (प्रतिनिधी) -  नुकताच काल  रविवार दि. ३ डिसेंबर  रोजी भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये मिळवलेल्या घवघवीत यशा नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकालानुसार मध्य प्रदेश मध्ये एकुण २३० जागांपैकी भा.ज.पा - १६४, काँग्रेस - ६५, इतर १, तसेच,  राजस्थान मध्ये एकुण १९९ जागांपैकी भा.ज.पा - ११५, काँग्रेस - ६९, इतर - १५ व छत्तीसगढ मध्ये ९० जागांपैकी भा.ज.पा - ५४, काँग्रेस - ३५, इतर - १ अशा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीने यश मिळवले आहे. मिळालेले यश हे इतके महत्त्वाचे आहे कारण भा.ज.पा समोर सगळे विरोधक एकत्र येऊन सुध्दा विरोधक काही कमाल करु शकले नाहीत. आणि विरोधकांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासा समोर सपशेल पराभव पत्करावा लागला आहे अशी चर्चा सगळीकडे ऐकण्यात आली. 
                 नांदगाव शहरात  भा.ज.पा तर्फे ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  नांदगाव शहरातील नागरिकांना पेढे भरवुन आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भा.ज.पा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन कवडे, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा, भगवान सोनवणे, शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे, प्रशांत खैरनार, बळवंत शिंदे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अशोक पेंढारकर, भरत काकड सर, ॲड. हिरालाल गांधी,  शेंडगे, आकाश पानकर सुरेश कुमावत ,दिंडे‌सर , सुरेश काळे आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Saturday, December 2, 2023

नांदगाव शहरातील वाढते रहदारीवर उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक,






नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यात कोणताही अपघात होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये आणि तत्काळ रहदारी नियंत्रित करावी, मनमाड येथील पुलाचे काम लवकरात लवकर करून घेण्यात येईल यासाठी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे दिली आहे.
      आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार, नांदगाव येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात नांदगाव शहरातील वाढते रहदारीवर उपाय योजना करण्यासाठी यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना तत्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. सर्व शासकीय अधिकारी , पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
      या बैठकीत प्रशासनाकडून तहसीलदार कोणकर साहेब, पोलीस निरीक्षक चौधरी साहेब, सार्वजनिक बांधकाम खात्याचे निकम साहेब, तसेच राष्ट्रीय महामार्गाचे सुपरवायझर हर्षल चौधरी, नांदगाव नगरपालिकेचे निकम साहेब , तहसीलचे योगेश पाटील उपस्थित होते.
       मनमाड येवला मार्गावरील वाहतूक बंद केल्यामुळे मालेगाव धुळे कडून येणाऱ्या सर्व गाड्या नांदगाव मार्गे येवला अशा जात आहेत. यामुळे नांदगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी वाढली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काल झालेल्या अपघातात एका महिलेचे दुर्दैवी निधन झाले. या पार्श्वभूमीवर काल शनिवारी तातडीची बैठक बोलावून सर्व प्रशासकीय स्तरावर रहदारी नियंत्रणाच्या आदेश देण्यात आले. 
    यावेळी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याच्या सूचना केलेले आहेत. पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाला त्वरित रहदारी जास्त असलेल्या ठिकाणी रहदारी नियंत्रित करण्यासाठी आपले कर्मचारी नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या. 
        यावेळी पोलीस प्रशासन व नगरपालिकेत प्रशासनाने तात्काळ रहदारी नियंत्रणासाठी कर्मचारी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे व खड्डे रिपेअर करून देण्याचे सांगण्यात आले.
      या बैठकीस विलास भाऊ आहेर , विष्णू निकम सर, डॉ.सुनील तुसे, सुधीर देशमुख, अमोल नावंदर, सागर हिरे, सुनील जाधव, रमेश काकळीज, पोपट सानप ,बापूसाहेब जाधव, भैय्या पगार , समाधान पाटील, डॉ   प्रभाकर पवार , शशी सोनवणे, राजेंद्र पवार, प्रकाश शिंदे, मुज्जू शेख, मयूर लोहडे आदींची उपस्थिती उपस्थित होती.

जामदरी येथील जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जोशी यांची साकोरा गटाच्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती,






नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जोशी यांची साकोरा गटाच्या विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली . दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बलीद, जिल्हा संघटक सजय कटारिया, जिल्हा समन्वयक सुनील  पाटील , तालुका प्रमुख संतोष गुप्ता, शहर प्रमुख माधव शेलार, उप ता. प्रमुख गोटूभाऊ केकान, कैलास  भाबड, सनी फसाटे ,संतोष जगताप,  इरफान शेख सह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, December 1, 2023

नांदगावच्या दहेगाव फाटा येथे कंटेनरच्या टायरखाली सापडून महिला जागीच ठार, स्कूटरला दुसऱ्या दुचाकी स्वाराने हुलकावणी दिल्याने झाला अपघात,







नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव - येवला रोडवर दहेगाव फाटा येथे शुक्रवारी सकाळी कंटेनरच्या टायरखाली सापडून सुनीता माणिक जाधव ( वय अंदाजे ४५) रा. धनेर ही महिला जागीच ठार झाली . तर दुचाकी स्वार जखमी झाला. अपघाताची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी, सहाय्यक पो. नि. नितीन खंडागळे तत्काळ अपघात स्थळी येवून जखमी व्यक्तीस ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून मृतदेह रूग्णालयात नेण्यात आला व वाहतूक सुरळीत केली. 
     या  महिलेचे माहेर शहरातील बेलदार वाडी येथील चव्हाण परिवारातील असून ती आपला भाऊ सोमनाथ चव्हाण याचेकडे माहेरी आलेली होती. सकाळच्या सुमारास ती आपल्या पतीच्या स्कुटर वर बसून धनेर येथे जात असतानां दहेगाव फाटा येथे स्कूटरला दुसऱ्या मोटारसायकल ने हुलकावणी दिल्याने सदर महिला स्कुटर वरून खाली पडल्याने कंटेनर खाली येवून जागीच ठार झाली.
    इंदोर पुणे राज्यमहामार्गावरील मनमाड शहरातील रेल्वे लाईन वरील उड्डान पुलाचा कठडा तुटल्याने सदर वाहतूक मालेगाव नांदगाव येवला या मार्गाने वळविली असून नांदगाव शहरातील जुनी पंचायत समिती ते रेल्वे बायपास मार्गे मल्हारवाडी पर्यत मोठया प्रमाणावर वाहतूक वाढली असून सदर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदगाव दिवस रात्र मेहनत घेताना दिसत आहे.

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...