Monday, July 31, 2023

नांदगांवमधील आनंदनगर भागातील नागरिकांचे नगरपालिकेवर ढोल बजाव आंदोलन, संतप्त महिला उतरल्या रस्त्यावर, नवीन जलशुद्धीकरण उभारले जाणार - मुख्याधिकारी विवेक धांडे यांचे स्पष्टीकरण




नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव शहरातील आनंदनगर भागातील गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी एकत्र येऊन नांदगाव- संभाजीनगर रोडवर रास्ता रोको केला होता. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन मोठ्या संख्येने  नांदगाव नगरपरिषद कार्यालयावर  मोर्चा काढला आहे.
  सकाळी वेळेस आनंदनगर भागात गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी  नांदगाव- संभाजीनगर रोडवर सकाळी ८:३० रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.ढोल ताशांच्या गजरात आनंदनगर येथून मोर्चाला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गाने  संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन शेकडोच्या संख्येने नांदगाव कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते.त्यामुळे गढूळ पाणी आले आहे. आपल्याला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल. लवकरच नांदगाव शहरासाठी जलशुद्धीकरण केद्र उभारण्यात येणार आहे. तसेच शहरासाठी  पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले.या मोर्चा मध्ये माजी नगरसेवक अरुण साळवे, अनिल जाधव,विश्वास अहिरे, नितीन जाधव, अँड सचिन साळवे, मनोज चोपडे, दिपक अंभोरे,गणेश अहिरे, तानसेन जगताप,अविनाश केदारे, सचिन पगारे, अँड विद्या कसबे, शोभा पगारे,कमल अहिरे,कुसूम जगताप,तारा चोपडे, आक्का सोनवणेसह शेकडो महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Friday, July 28, 2023

नांदगाव शहरातील रेल्वे पुलाखाली घाण - गाळ, कचरा साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून जाण्याची वेळ, नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड, नागरिकांची तीव्र संतप्त प्रतिक्रिया,


नांदगाव( प्रतिनिधी) -  नांदगाव पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आले आहे.  नांदगाव नगर परिषद प्रशासनाचा हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसत असून येण्या-जाण्यासाठी असलेल्या पुलाखाली मोठं मोठे खड्डे, गाळ आणि घाण साचल्यामुळे जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची वेळ नागरिक आणि विद्यार्थ्यावर आली आहे. नांदगाव शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला शहर, शाळा,बाजारपेठ असून नागरिकांना दोन्ही बाजूला येण्या जाण्यासाठी ब्रिटिशकाळात पूल बांधण्यात आलेला आहे. पुलाच्या वरून रेल्वे तर खालून नागरिकांची ये-जा सुरु असते . मात्र गेल्या एक ते दीड वर्षा पासून पुला खाली मोठं - मोठे खड्डे झालेले असून गाळ, घाण देखील इतकी साचलेली आहे.  पुला खालून जाणे अवघड झाल्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थी आणि नागरिक रेल्वे रूळ ओलांडून जातात.
रेल्वे रूळ ओलांडून जाताना मोठा अपघात झाल्यास त्याला फक्त नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील अशी तीव्र प्रतिक्रिया येणारं जाणारं नागरिक करत असून, त्यामुळे पुला खाली असलेले खड्डे बुजवून गाळ आणि घाण काढण्याची मागणी नागरिक करत  आहे.

Thursday, July 27, 2023

मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही भारताचे लोकच्या वतीने नांदगाव मध्ये मूक मोर्चा, नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना निवेदन,



नांदगाव( प्रतिनिधी ) - मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही भारताचे लोक च्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या क्रूर घटनेमुळे भारतीय समाजासमोर जे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचा सामना करून संविधानिक मूल्य बळकट करणे आवश्यक आहे.याचा विचार करून त्यासाठी नांदगाव शहरात आम्ही भारताचे लोक या नावाने मूक मोर्चा काढण्यात आला. 
    या मोर्चाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली होती. ही रॅली नांदगाव तहसील कार्यालयात आल्यानंतर विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी मणिपूरच्या अत्याचाराच्या विरोधात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या वेळी नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना आम्ही भारतीय लोक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नांदगाव मधील सुजाता महिला मंडऴ,रमाई मित्र मंडऴ, आदिवासी जनसमुदाय, एकलव्य संघटना, आधार बहुदेशीय संस्था, वंचित बहुजन आघाड़ी चे वाल्मीक जगताप, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे शहर अध्यक्ष मनोज चोपड़े, मनसे महिला शहर प्रमुख रेषा शेलार, संगीता सोनवणे शबाना मन्सुरी, अॅड सचिन साऴवे, महावीर जाधव ,राजू गुडेकार, अनिल जाधव ,विश्वास आहिरे, अरुण साऴवे,व असंख्य आर पी आय चे कार्यकर्त, महिला वर्ग या घटनेविरुध्द एकत्र येऊन या मूक मोर्चात संख्येने सहभागी झाले होते.

नांदगावच्या मल्हारवाडी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २० लक्ष रुपये निधी मंजूर , येवला रोड ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ,


     

नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व  २० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून येवला रोड ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन आज युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांचे हस्ते संपन्न झाले.
     यावेळी व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विष्णू निकमसर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप सरपंच सौ.सारिका जेजुरकर, उपसरपंच दीपक खैरनार, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते..
     यावेळी विष्णू निकम यांनी आपल्या मनोगतातून आ. सुहास आण्णा कांदे यांच्या दातृत्वाविषयी माहिती देतांना सांगितले की, आ.सुहास आण्णा कांदे हे विविध विकास कामांसाठी कुठलाही भेदभाव न करता भरघोस निधी उपलब्ध करून देत असतात. आतापर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.     
       प्रास्ताविकात राजाभाऊ जगताप यांनी मल्हारवाडी गावात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भविष्यातही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी केली.. मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येवला रोड ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी खैरनार, सुनंदा झेंडे, शोभा पिठे, दिगंबर भागवत, अरुण भोसले, मधुकर ईघे,वाल्मीक काकळीज, भागिनाथ गोविंद, भाऊसाहेब पिठे, नंदू परदेशी, बापू ईघे, आबासाहेब खैरनार, चंद्रभान गोविंद, जयराम मोकळ, प्रकल्प पाटील आदींसह मल्हारवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकल्प पाटील यांनी तर आभार संदीप जेजुरकर यांनी मानले..

Wednesday, July 26, 2023

नांदगाव शहरातील हुतात्मा स्मारकावर कारगिल विजयी दिनानिमित्त अभिवादन,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील  हुतात्मा स्मारकावर कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारत-पाकिस्तान यांच्यात १९९९मध्ये झालेल्या युध्दाचा शेवट २६ जुलै १९९९ ला भारताच्या जवानांनी प्राणांची बाजी लावुन भारताला विजय मिळवून दिला व आपल्या देशाचे संरक्षण केले. या युध्दात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यासाठी हुतात्मा चौकात तहसीलदार डॉ.सिध्दार्थ मोरे, नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व सेवानिवृत्त ,मेजर, व सैनिक यांनी सर्व प्रथम संविधान प्रतिकृतीला पुष्पहार घालून वंदन केले. व त्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी मेजर नानासाहेब काकळीज यांनी कारगिल युध्दाच्या आठवणी जागवल्या व युध्दप्रसंगातील अनुभव कथन केले. तसेच यावेळी मेजर जगन्नाथ साळुंखे यांनी देखील कारगिल युध्दाची माहिती देऊन येथील हुतात्मा स्मारक निर्मिती कशी झाली याबाबत माहिती सांगितली व शहीद जवानांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे संयोजन शिवसंस्कार संस्था,व माजी सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले. याप्रसंगी सुभेदार बाजीराव मोहिते, हवालदार शंकर थेटे, सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष नानासाहेब काकळीज, संजय खैरनार, दै.आवाजचे संपादक भगवान सोनवणे,बापू जाधव, मुस्ताक शेख, भावराव जाधव, मधुकर पवार, प्रभाकर पगारे, योगेश जाधव, संदिप बोरसे, श्रावण आढाव, अनंत शेवरे,शामभाऊ पारख, मनोज शर्मा, शिवाजी निकम, शिवाजी गरुड, प्रा. सुरेश नारायणे, गंगाधर औंशिकर,विजय बोरसे, किसन जगधने, वामन पोतदार, सुमित गुप्ता, अकाश पानकर, जेष्ठ नागरिक, व्यापारी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित माजी सैनिक व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी केला.व शहरातील सामाजिक स्वास्थ टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Tuesday, July 25, 2023

नांदगाव च्या कासलीवाल शाळेत ग्रीन डे उत्साहात साजरा , मुलांनी परिधान केले हिरवळ पोशाख,




नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील एम.जे.  कासलीवाल प्रसारक मंडळ संचालित सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल पूर्व प्राथमिक व प्राथमिक नांदगाव शाळेत ग्रीन डे उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावण महिना सुरू झाला की, सगळीकडे हिरवळीचे वातावरण निर्माण होते.अशा या हिरवळीच्या उल्हासित वातावरणात पूर्व प्राथमिक विभागाचा ग्रीन डे साजरा झाला. इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक  चावला सर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पवार सर तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  सावंत सर यांनी केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली.तसेच सर्व विद्यार्थी हिरवा पोशाख परिधान करून शाळेत आले.त्याचप्रमाणे काही मुलांनी पक्ष्यांचे, भाज्यांचे, फळांचे असे वेगवेगळे पोशाख करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्रीमती सुरळकर मॅडम,  निकम मॅडम,  देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राथमिक विभागाचे शिक्षक श्रीमती देवरे मॅडम, श्रीमती पठाण मॅडम,  जगताप सर ,शिंदे मॅडम, थोरात सर, कुमावत मॅडम, मांडोडे मॅडम, जेजुरकर सर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच इंग्लिश मिडीयम चे ड्रॉइंग टीचर निलेश पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

नांदगाव येथे नगरपालिकेसमोरील बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी मागे,


नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपालिका प्रशासनाला २१ तारखेला इंद्रायणी नगर परिसरातील समस्यांचे तिसर्‍यांदा उपोषणाचे निवेदन दिले होते. परंतु परिसरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित पडलेली वरील नागरिकांच्या समस्यांचे तीन वेळा निवेदन उपोषण करुन सुध्दा नांदगाव नगरपालिका प्रशासनाने या नागरिकांनाच्या समस्यांना केराची टोपली दाखवल्याने अखेर एकत्रीत येऊन रिपाइंचे शहराध्यक्ष महाविर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा चौथ्यांदा ठाम भूमिका घेऊन इंद्रायणी नगर,जयभोले नगर, करीमचाळ नागरिकांनी नाराजी व्यक्त करुन रस्ता मागणीसाठी चर्चा करत उपोषणास रात्री उशिरापर्यंत निर्णयावर ठाम राहिल्याने आजचा दुसरा दिवस होउन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने महिलांनी जेष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. 
    शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांनी या उपोषणास बसलेले महाविर जाधवसह स्थानिक रहिवाशांना जाहीर पाठिंबा दर्शविला असून नांदगाव नगरपालिका प्रशासनाचे अयशस्वी कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.! या वेळी शहरातील ठाकरे गटाचे संतोष गुप्ता,काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे, वंचितचे तालुका सचिव, विलास केतकर, राष्ट्रवादीचे युवा शहराध्यक्ष, गौतम जगताप, समाजिक कार्यकर्ते अॅड विद्या कसबे,नेहा कोळगे भाजपाचे व्यापारी जिल्हाअध्यक्ष दत्तराज छाजेड,उमेश उगले, राहुल आहेर,प्रहार जनशक्तीचे डॉ पगार,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ घोंगाने,विवेक गोदावरी दवाखान्याचे संस्थापक डॉ सुनिल तुसे यादींनी मत व्यक्त करत जाहिर पाठिंबा दर्शवला आहे.
आज दुपारी नगरपालिका कर्मचारी राहुल कुटे,बंडू कायस्थ यांनी उपोषणकर्ते महावीर जाधव यांना उपोषणास बसलेले तीन मागणी पैकी शहरातील मध्यवर्ती नागरीभागातून रेल्वे पुलाचे तिसर्‍या लाईनचे काम सुरु असल्याने इंद्रायणी नगर,जयभोले,नगर,करीम चाळ, रहदारीस अडथळा निर्माण होत असून तसेच आगामी पावसाळ्यात, शांकबरी लेंडीनदीला पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे शहरातील चांडक प्लॉट, एस,टी कॉलनी, जय भोले नगर,या भागात जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.   आपली उपोषण स्थळी झालेले चर्चेनुसार परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजुस लेंडीनदीवर बांधलेल्या पुलाचा वापर करुन सदर भागातील नागरिकांच्या सोयीसाठी गेट उघडा ठेवण्यासाठी आवश्यक पत्र प्रज्ञानंद व्यवहार केलेला आहे.तसेच नांदगाव रेल्वे लाईनच्या बाजूला लक्ष्मी टॉकीजवळ नदीपात्रात तात्पुरता पुल करुन तयार करण्यात आला आहे. तसेच इतर कायमस्वरूपीच्या योजनेसाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे तरी सदरील बाबींचा विचार करून उपोषण मागे घेण्यात यावे असे लेखी पत्र नगरपालिका प्रशासनाने उपोषण करते महावीर जाधव यांना दिल्या नंतर आहे काल दुपारी मागे घेण्यात आले.

Sunday, July 23, 2023

नांदगावचे प्रसिद्ध व्यापारी रमेश करवा यांच्या कांद्याच्या खळ्यात आढळला चक्क सहा फूट लांबीचा कोब्रा जातीचा सर्प,



  नांदगाव ( प्रतिनिधी )  - सध्या पावसाळा चालू झाला आहे , आपण काळजी घेणे खूप महत्वाचे आहे . पाऊस पडल्याने पाणी बिळात जाते आणि साप बाहेर येतात तर साप कुठे पण आसरा घेऊ शकतो असाच प्रकार नांदगाव चे प्रसिद्ध व्यापारी रमेश करवा यांच्या कांद्याचे खळ्यामधे झालं कांदे भरायचे काम चालू आहे ‌. हमाल कांद्याची पोत उचलताना त्यांना काही तरी हालचाल जाणवली आणि बघितलं तर भला मोठा साप निदर्शनात आले ‌ . काम बंद पडले,  मुकरदम मनोजभाऊ यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केले.   बडोदे तात्काळ पोहीचले आणि कोब्रा सापाला व्यवस्थित पकडून बरणीत बंद केले . थोडक्यात माहिती दिली ,"  हा नाग आहे याला इंग्लिश मध्ये कोब्रा म्हणतात‌  याची लांबी सरासरी सहा फूट आहे ‌ . सर्पदंश झाल्यावर कुठे पण वेळ घालवू नका तांत्रिक मांत्रिक कडे आणि ब्लेड ने कापून स्वतःच हॉस्पिटल जाण्याचं प्रयत्न करून नका. सर्पदंश झाल्या वर ती जागा स्वछ डेटॉल ने किंवा साबणाने धुवा,  दंश ची जागेच्या वर अवळपट्टी करा आणि घाबरू नका हॉस्पिटल घेऊन जाणे अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिल आणि कोब्रा सापळा निसर्गमुक्त केले.

Friday, July 21, 2023

नांदगावच्या व्ही.जे. हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शाळेकडून प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार,


नांदगाव ( प्रतिनिधी  ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व्ही.जे.हायस्कूल मधील २०२३ या शैक्षणिक वर्षातील एसएससी परीक्षा, पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव शाळेचे माजी विद्यार्थी तथा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेले ऋषिकेश कर्नर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून  करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवराच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत मुख्याध्याप मनोहर बडगुजर यांनी केले यात शाळेच्या निकालाविषयी माहिती दिली व या वर्षी १२६ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाले असे सांगून शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी ऋषिकेश कर्नर व त्यांच्या आजी आजोबा व आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थाचा उपस्थित मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शाळेने व गुरुजनांनी  केलेले संस्कार या शिदोरीवर  आज मी जीवनात यशस्वी झाल्याचे सांगितले.मेंडपाळ व्यवसाय करणाऱ्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण केले,व स्वयंअध्ययन करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली यात माझे कुटुंब व शाळेचे योगदान आहे असे सांगून विद्यार्थांनी चिकाटीने अभ्यास करावा व असे सांगून गुणवंत विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे होते त्यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थांनी पुढील शिक्षण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून करावे म्हणजे यश हमखास मिळते असे सांगून शुभेच्छा दिल्या . गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने वैष्णवी जावरे व मृणाल रत्नपारखी याने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रसंगी मंचावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण , उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे , अॅकाडमी बोर्ड सदस्य भास्कर मधे,माजी शिक्षक भैयासाहेब चव्हाण,हेमंत शांडिल्य  शिक्षक प्रतिनिधी गुलाब मोरे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे सदस्य,पालक, तसेच पत्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रियंका पाटील यांनी केले पाहुण्याचा परिचय प्रविण अहिरे यांनी केला आभार शिक्षक प्रतिनिधी अनिल तांबेकर यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील बक्षिस समिती प्रमुख दिपाली सांगळे ,कार्यक्रम प्रमुख राकेश ननावरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नागरी समस्यांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष , नांदगाव नगरपरिषदेच्या विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा,




नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील ‌इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जय भोले नगर, करीम चाळ येथील समस्या वारंवार निवेदने देऊनही सुटत नाहीत. वरील प्रश्नांवर आम्हाला वारंवार विनंती करूनही आम्ही आमच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने महावीर जाधव यांनी  बेमुदत उपोषणाचा इशारा नगरपालिकेला दिला आहे. 
नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जय भोले नगर व करीम चाळ याभागात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. नागरिकांना मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी रस्ता नाही. आमच्या कॉलनीतील एक शाळा आहे जेथे मुलांना आणि पालकांना त्यांच्या लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी खूप त्रास होतो. आजही रस्ता नाही.रेल्वे पुलाजवळ तिसऱ्या लाईनच्या कामामुळे आमचा मुख्य रस्ता बंद आहे.काम पूर्ण झाल्यावर तो बंद केला जाईल.गेल्या २ वर्षापासून लेंडी नदीपात्रात मोठा पूल व्हावा अशी आमची मागणी आहे. हे समजून घ्या कारण ११/०५/२०२२ आणि २५/०१/२०२२ रोजी आम्ही तुम्हाला निवेदन दिले. पण तुम्ही आमचे निवेदन घेतले नाही आम्ही नांदगाव नगरपालिकेत कर भरतो आम्ही ही मागणी केली आहे पण ती पूर्ण केलेली नाही. आमच्या कॉलनीतील योगेश गायकवाड ते गांगुर्डे यांच्या घरापर्यंतचे काम अजूनही अपूर्ण आहे.उद्या महिलेला डिलेव्हरीसाठी दवाखान्यात नेण्याची वेळ आली तर रस्ता नाही अशा काय करायचे असा प्रश्न येथील नागरिकांनी पडला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.


Thursday, July 20, 2023

नांदगाव - साकोरा रस्त्यावर गिरणानगर येथे पिक अप - मोटरसायकल झालेल्या अपघातात एक जण ठार, नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद ,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव- साकोरा रस्त्यावर गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीत पिक अप आणि मोटारसायकल अपघातात तालुक्यातील दहेगाव येथील एक जण ठार झाला असून पिकअप चालकाविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवार (ता. २०) रोजी दुपारी नांदगाव - साकोरा रस्त्यावर गिरणानगर येथे एम. एच. १९बी.एम.२७३५ पिकअप नांदगाव कडून उड्डाणपूलाकडे जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील एम. एच. १५ सी.एक्स.८५१० हिरो होंडा स्पेलंडर गाडीला जबर धडक देवून दोन पलट्या घेवून गाडीची दिशा बदलली या अपघातात तालुक्यातील दहेगाव येथील मोटारसायकल चालक बाळासाहेब तुकाराम जाधव (४०) यांना डोक्याला जबर मार लागला त्यांना उपस्थितांनी उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाळासाहेब जाधव यांना दोन मुली व मुलगा असा परिवार असून तीन महिन्यांपूर्वी एका मुलीचा विवाह झाला असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने दहेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी दहेगाव येथे बाळासाहेब जाधव यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नांदगाव मध्ये सकल जैन समाजाचा मूक मोर्चा,


 नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव अहिंसेच्या भारत देशात सकल दिगंबर जैन समाजाच्या आस्थाचे केंद्र असलेले प्रसिद्ध जैन संत गणधर आचार्य कुंथुसागर महाराज, यांचे प्रभावक शिष्य, आचार्य कामकुमारनंदीजी यांचे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील, हिरेकुड आश्रमातुन ५ जुलै रोजी अपहरण करून शरीराला दुखापत करीत काही समाज कंटकाकडुन निघृण हत्या करण्यात आली.! या निषेधार्थ आज नांदगाव सकल जैन समाजाच्या वतीने शहराच्या मध्यम भागातून मूक मोर्चा काढण्यात आला. महिला व पुरुष यांच्या हातात निषेध फलक घेऊन जैन मंदिर येथुन मुक मोर्चेला सुरवात करण्यात आली होती या निषेध फलकांवर "मुनियो की सुरक्षा यही जैन समाज की मांग"... "पहले शिखरजी अब मुनियोपर आघात नही सहेगा जैन समाज"...असे अशायचे फलक व काळ्या फिती लावून निषेध करत तेथुन गांधी चौक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,या मार्गाने थेट नांदगाव पोलिस ठाणे येथे नेण्यात आला.त्यानंतर या घटनेने देशातील सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी जैन धर्म, जैन तीर्थक्षेत्र, जैन समाज यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मुक मोर्चा शहरातून शांततेत काढण्यात आला . नांदगाव तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी,यांना सकल जैन समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.तसेच या वेळी शहरातील ,  संस्कृति रक्षक कैन्द संस्थापक दत्तराज छाजेड़, माझी नगर सेवक महावीर पारख, उद्धव शिवसेना प्रमुख संतोष गुप्ता बाऴासाहेब ठाकरे सेना शहर अध्यक्ष सुनील जाधव, काॅग्रेस शहर अध्यक्ष मनोज चोपड़े यांची निषेर्थात भाषणे झाली शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सुंगदचंद सेठी, शामभाऊ पारख, शांतीलाल सुराणा, नुतन कासलीवाल, कमलेश खिलोशीया, दिलीप सेठी, चंचल गंगवाल, नाशिक   जिल्हा प्रमुख (शिवसेना शिंदे गट) किरण देवरे, नांदगांव कुषी उत्पन्न बाजार समिति संचालक दिपक मोरे, रमेश मामा, चंदशेखर कवडे, मनोज वाघ, अमित लोहाडे सह नांदगांव शहरातील महिला वर्ग मोठया संख्येत उपस्थित होते सर्व पक्षीय यांच्या वतीने निषेध करत पाठींबा दिला शहरातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत आपले मत व्यक्त केले. यावेळी जैन समाजातील महिला पुरुष व्यापारी बांधवमोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Sunday, July 16, 2023

नांदगाव येथील महाविद्यालयात १२वीच्या परिक्षेसाठी आसनव्यवस्था, येत्या मंगळवार पासून परिक्षा सुरू होणार ,



नांदगाव (प्रतिनिधी ) -  कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे इयत्ता बारावी जुलै २०२३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व विभागीय मंडळ नाशिक यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेची आसनव्यवस्था नांदगाव महाविद्यालयात केलेली आहे .   विद्यार्थ्यांची येत्या  मंगळवारी दि. १८ जुलै रोजी परीक्षा सुरू होत आहे . कला, कॉमर्स आणि सायन्स या शाखेत परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था नांदगाव महाविद्यालयात केंद्र क्रमांक ३६० मध्ये केलेली आहे .  संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आपल्या परीक्षेच्या नियमित वेळेत उपस्थित राहून आपण परीक्षेसाठी लागणाऱ्या लेखन साहित्यासह व आपल्यासोबत परीक्षेचे रिसीट व महाविद्यालयाचे ओळखपत्र ही सोबत आणावे व परीक्षेच्या नियमित वेळेत उपस्थित रहावे , असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन . शिंदे , केंद्र संचालक आर. टी. देवरे यांनी सुचित केले आहे. तरी संबंधित, परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही नोंद घ्यावी अशी सूचना केली आहे.

Friday, July 14, 2023

नांदगांव तालुक्यातील मल्हारवाडीला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका संदिप जेजुरकर यांची बिनविरोध निवड,



नांदगाव (प्रतिनिधी ) - मल्हारवाडी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका संदीप जेजुरकर यांची बिनविरोध निवड झाली.
आवर्तन पद्धतीने ठरल्यानुसार सुनंदा बळीराम झेंडे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत सरपंचपदासाठी सारिका जेजुरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. के. ढवळे यांनी सारिका जेजूरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यांना ग्रामसेवक अतुल सोनवणे, कर्मचारी कृष्णा बावणे यांचें सहाय्य लाभले. या विशेष सभेस उपसरपंच दिपक खैरनार, ग्रामपंचायत सदस्या चित्रा घे, अश्विनी खैरनार, मीना गोविंद, सरला काकळीज, शोभा पिठे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आदी उपस्थित होते. या निवडीनंतर ढोल ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. आ. सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका अंजुम कांदे,शिवसेना युवा नेते फरहान खान यांनी या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच सारिका जेजुरकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी मधुकर ईधें, भागिनाथ गोविंद, शांताराम वाघ, वाल्मीक काकळीज, मुकुंद खैरनार, भाऊसाहेब पिठे, बाळासाहेब महाजन, जयराम मोकळ, सचिन रोहम, युवराज सोनवणे, आबासाहेब खैरनार, रवींद्र आहेर, दिपक खैरनार, विठ्ठल पानसरे, भारत जेजुरकर,पोपट जेजुरकर, गणेश जेजूरकर, समाधान खैरनार, राजू खैरनार, अंबादास जाधव, जीवन खैरनार, योगेश गेजगे,संजय गोरे, संतोष आहेर, सुनील भवर, गोलू घोडके, पवन खैरनार, जयेश खैरनार, गोरख महाजन, चंद्रभान गोविंद आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर विशाल सभामंडपाचे लोकार्पण,





नांदगाव (प्रतिनिधी ) -  श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर नांदगाव येथील विशाल सभा मंडपाचे लोकार्पण आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. 
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून ६० लक्ष रुपये निधीतून सदर सभा मंडप उभारण्यात आला आहे. येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांनी टाळ मृदंग व अभंगाच्या उच्चारत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब, विष्णू निकम,  प्रमोद भाबड ,अमोल नावंदर, दीपक मोरे , सावता उत्सव समितीचे राजाभाऊ मोरे, प्रशांत खैरनार, सतीश गायकवाड, बाळासाहेब मोकळ आदि उपस्थित होते. सावता महाराज उत्सव समितीतर्फे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करण्यात आला. राम कथाकार रामप्रियादीदी यांचा सत्कार आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केला. याप्रसंगी बोलताना विष्णू निकम यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले तसेच आजपर्यंत अण्णांनी समाजासाठी खूप काही दिले आहे आणि अजूनही देण्याची तयारी दाखवत आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असे मत व्यक्त केले. 
 ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी आपल्या भाषणात आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघात प्रत्येक जाती धर्माच्या 
लोकांना न्याय देत मोठे विकास कार्य होत असल्याचे सांगितले. 
   आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या भाषणात मतदारसंघात करीत असलेला विकास हे माझे कर्तव्य असल्याचे मी समजतो कारण आपण मला मत दिले आहे आणि या मताला जागणे माझे कर्तव्य आहे असे सांगितले, सावता कंपाउंड येथे आज पर्यंत अनेक वेळा आलो असताना सप्ताह काळात पावसामुळे होणारी हाल मी पाहिली आणि म्हणूनच साठ लाख रुपयांचा सभा मंडप तात्काळ मंजूर करून दिला यापुढेही पन्नास लाख रुपये देतो या संपूर्ण परिसराचा विकास करून घ्यावा जेणेकरून समाजातील गरजवंत कुटुंबांना या वास्तूचा लाभ होईल, या ठिकाणी मोठे सप्ताह संपन्न होतील असे सांगितले. 
     महिन्यातच हा विशाल सभा मंडप बांधून तयार झाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यांना उद्देशून आमदार यांनी येत्या वर्षभरात नांदगावकरांच्या प्रत्येक घराघरात २४ तास नळाला पाणी येईल असे आश्वासन दिले. 
    याप्रसंगी सावता उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव तालुका रिपाइं युवक आघाडी तर्फे राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न सुरक्षा व ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्रीपदी आ. छगन भुजबळ यांची निवड झाल्याबद्दल पुष्पहार देऊन स्वागत,




नांदगाव ( विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेते माजी उपमुख्यमंत्री लोकनेता विकासपुरुष  छगन भुजबळ  यांची महाराष्ट्र राज्याच्या अन्न सुरक्षा व ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली आहे ‌ . या निमित्ताने नांदगाव तालुका युवक आघाडीतर्फे तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या आहेत.

नांदगाव येथे मनसेकडून " एक सही संतापाची" स्वाक्षरी मोहीम,


 नांदगाव (प्रतिनिधी) मनसेचे  नांदगाव तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली "एक सही संतापाची "हा उपक्रम राबविण्यात आला . काल गुरुवारी दि. १३ रोजी जुलै राेजी हुतात्मा चौक नांदगाव पोलीस स्टेशन जवळ नांदगाव मनसेचे नांदगाव तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमास मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा संघटक सुनील कोल्हे, अभिषेक विघे शहर अध्यक्ष ,महिला तालुकाध्यक्षा रेखा शेलार , महिला तालुका उपाध्यक्षा अकिला शेख, मिथुन पवार ,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अकबर सोनावला, माजी नगरसेवक मनमाड नाना आहेर , माजी शहराध्यक्ष मनमाड राजू तरंगे, मनमाड शहर सचिव राम मालोतकर  व राहुल पाटील सह मनसेचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, July 13, 2023

इंग्लंड स्थित प्रियंका घोंगाणे ( सालपे) यांचे कडून नांदगाव येथे गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ,




नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगावच्या रहिवासी व सद्या इंग्लड येथे स्थाईक असलेल्या प्रियंका घोंगाणे ( सालपे ) यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाखारी येथील किसान माध्यमीक विद्यालयातील ४१ विद्यार्थी/ विद्यार्थीनींना शालेय गणवेश मोफत वाटप केले. शहरातील प्रसिद्व व्यापारी व वाखारी येथील किसान माध्यमीक विद्यालयाचे अध्यक्ष उमाकांत घोंगाणे यांची मुलगी प्रियंका सालपे ही इंग्लड येथे वास्तव्यास आहेत. त्या नांदगाव येथे माहेरी आल्या असता विद्यार्थ्यां प्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून त्यांनी वाखारी येथील किसान माध्यमीक विद्यालयातील ४१ गरीब विद्यार्थी / विद्यार्थीनींना गणवेशाचे वाटप करण्याचा मनोदय कुटुंबातील व्यक्तींजवळ व्यक्त केला. लागलीच विद्यालयाच्या मुख्याध्यापक यांच्या बरोबर संपर्क साधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रमाचे नियोजन केले. 
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट चव्हाण यांनी प्रियंका सालपे यांचे स्वागत केले तर रत्नप्रभा पाटील यांनी शाल देवून सत्कार केला.
 यावेळी प्रियंका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानां सांगीतले की, आपण ग्रामीण भागातील मराठी मिडीयम मध्ये शिक्षण घेत असाल तरी आपण स्वतःला कमी समजायचे नाही. मी सुद्वा मराठी मिडीयम मध्ये शिकलेली आहे. आई, वडील, शिक्षकांचा नेहमी आदर करा.
यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे संजय काकळीज, पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी वाखारी ग्रामस्थाकडून प्रिंयका हिचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक पोपट चव्हाण, शिक्षक दत्तात्रय महाजन, सुनील हिंगमीरे, ऋषी डोमाडे, नंदू दंवगे, रत्नप्रभा पाटील, रोहीणी गोराडे, महेष निकम, पत्रकार सोमनाथ घोंगाणे आदी मान्यवर उपस्थीत होते.

Wednesday, July 12, 2023

गंगाधरी येथील हनुमान मंदिर खैरनार वस्ती येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन ,




 नांदगाव (प्रतिनिधी ) - आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गंगाधरी येथील खैरनार वस्तीवरील हनुमान मंदिर येथे सभामंडप देण्यात आला. या  सभामंडपाचे भूमिपूजन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते   करण्यात आले.
   या वेळी शाल व पुष्पगुच्छ देत आमदार सुहास आण्णा कांदे यांचे स्वागत करण्यात आले.  विष्णू निकम सर यांनी या वेळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू असून १२०० कोटी रुपये निधी आमदारांनी खेचून आणला जे या आधी कोणत्याही आमदाराला शक्य झाले नसल्याचे मत व्यक्त केले. 
     या प्रसंगी बोलताना विकास कामांसाठी कोणतीही शंका मनात न ठेवता केंव्हाही मला सांगा मी आपल्या सेवेत हजर असल्याचे  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले. येथील ग्रामस्थांच्या मागणी नुसार येथील खैरनार वस्ती ते खैरे वस्ती, खैरे नगर अंतर्गत रस्ता व स्मशानभूमी चे काम लवकरच करून दिले जाईल असे आश्वासीत केले. आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राजकीय कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करायला संकोच करू नका, मी आपल्याला सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 
    याप्रसंगी  विष्णू निकम सर, डॉ.वाय.पी.जाधव, प्रमोद भाबड, गंगाधरी ग्रामपंचायतचे सरपंच निलेश खैरनार, दिगंबर भागवत, वसंतराव सोनवणे, नंदू खैरनार, सुनील जाधव, अशोक खैरनार , गणेश खैरनार , डॉ.मधूकर खैरनार, संदीप खैरनार, दीपक खैरनार, संजय खैरनार , वैभव खैरनार , बाळकृष्ण खैरनार, महेश इघे, सोपान जाधव, वसंतराव खैरनार, शिवाजी खैरनार महेंद्र गायकवाड, महेश ईघे,विजय ईप्पर, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सूत्रसंचालन भगीरथ जेजुरकर यांनी केले.

Tuesday, July 11, 2023

मनमाड मध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पंकज खताळ पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित, ३७४० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया,


मनमाड (विशेष प्रतिनिधी) -  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पंकज खताळ पाटील फाउंडेशन व एच व्ही देसाई आय हॉस्पिटल हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  पुणे येथे मनमाड वरून ४० रुग्ण घेऊन लक्झरी बस रवाना झाली. तसेच मोदी एट नाईन घर घर संपर्क अभियान अंतर्गत मोदी सरकारच्या नऊ वर्षातील वेगवेगळ्या योजना याबाबत माहिती तसेच पत्रके रुग्णांना वाटण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 हा मोबाईल नंबर दाबून मिस कॉल देऊन मोदींना समर्थन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात परिसरातील लोकांनी या मोफत मोतीबिंदू शिबिरामध्ये सहभागी होऊन अथवा याबाबतची माहिती आपल्या आसपासच्या परिसरातील रुग्णांना देऊन या शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा असे आव्हान भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व नांदगाव विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज खताळ पाटील यांनी केले असून, आत्तापर्यंत ३७००  व आता ४० अशा ३७४० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अजूनही दहा बस जवळपास चारशे रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे . या बस सलग रुग्णांना घेऊन पुन्हा येथे जाणार आहे.

Saturday, July 8, 2023

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश होणार , आमदार सुहास कांदे यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न,


नांदगाव ( प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याबाबत पाणीपरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे मागणी केली होती यास सकारात्मक प्रतिसाद देत पुढील योग्य कारवाही करावी साठी आदेश संबंधित विभागास दिले आहे. 
          नांदगाव मतदार संघातील मौजे लोहशिंगवे,पोखरी, चांदोरा, मंगळणे, शास्त्रीनगर, जळगांव खु, धनेर, खादगाव  दुष्काळग्रस्त भागात असल्याने नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्भव असलेल्या ठिकाणी उन्हाळ्याचे कालावधीत भूजल पातळी खोलवर जावून माहे एप्रिल, मे व जून महिन्यात रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश करण्या संधर्भात आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 
       आमदारांच्या पाठपुराव्याची दाखल घेत या गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश करण्या बाबत संबंधित विभागास गुलाबराव पाटील यांनी सूचना केल्या आहेत.
        आमदार सुहास आण्णा कांदे यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघाची प्रमुख गरज ओळखून पहिल्या दिवसापासून आपले लक्ष पाणी प्रश्नावर केंद्रित केला, सतत शासनाकडे पाठपुरावा केला, आपले वजन वापरत करंजवण मनमाड, ७८ खेडी, दहिवाल सह २६ गाव, नांदगाव पण योजना सारख्या विविध योजना मार्गी लावल्या आहेत यांचे काम जलद गतीने सुरू असून येणाऱ्या काळात पाण्यापासून वंचित असलेल्या शेकडो गावांना नियमित व मुबलक पाणी मिळणार आहे. या शिवाय विविध गावांना जलजीवन मिशन अंतर्गत गावपातळीवर योजना मंजूर करवून घेऊन काम केले आहे. 
         आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या शासनाकडे केलेले सततच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले, आता मतदारसंघाचा पाणी प्रश्न मिटणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Friday, July 7, 2023

नांदगावला एकदिवसीय धरणे आंदोलन , सफाई कामगारांच्या वारसांचे मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन ,




नांदगाव( प्रतिनिधी) -   नगरपालिकेतील मयत, सेवानिवृत्त आणि बारा ते तेरा वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून होणारी हेतू पुरस्कार विलंब होत असल्याच्या कारणांवरून नगरपरिषद, महापालिका संलग्न भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील पालिका कार्यालयासमोर कामगार नेते श्रावण जावळे, शशिकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
      नांदगाव  येथील पालिकेच्या सेवानिवृत्त, मयत सफाई कामगारांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आस्थापनेवरील मंजूर रिक्त पदांवर नियुक्ती मिळणेबाबत वारसदारांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी व महसूल आयुक्त तसेच नगरविकास विभागाच्या संचालकांकडे पाठपुरावा केला. मात्र पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन दाद देत नसल्याच्या मुद्दयाकडे
लक्ष वेधण्यासाठी काल शुक्रवारी ७ जूलै रोजी हे आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी श्रावण जावळे, प्रदेश सरचिटणीस शशिकांत मोरे यांच्याशी आंदोलनस्थळी भेट घेत चर्चा करत याप्रकरणी पालिका प्रशासनाचे कुठलेही वेळकाढू धोरण नसून न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्यावर शासनाचे मार्गदर्शन मागविले असल्याचे स्पष्टीकरण , आंदोलकांच्या निदर्शनास आणून देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे मोर्चा काढण्यात येऊन त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कामकाज बंद करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला. आंदोलनाला काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे, कपिल तेलरे यांनी कामगारांना आपला पाठिंबा दिला. यावेळी बापू भालेकर, कामगार नेते राधेशाम निकम, रंजीत अहिरे, सोनू पेवाल, विकी पेवाल, राजू गुडेकर , गणेश शर्मा आदी उपस्थितीत होते.

चौथीत असलेल्या आराध्याने केले ज्ञानदान, जन्मदिनानिमिताने समाजात आगळा वेगळा संदेश ,



नांदगाव ( प्रतिनिधी) - आतापर्यंत आपण ऐकले होते... ज्ञान दान सर्वात श्रेष्ठदान आहे... इयत्ता ४ थी शिकत असलेली आराध्या अर्चना धवलचंद्र आढाव या विद्यार्थीने चक्क आपल्या जन्म दिनानिमित नांदगांव तालुक्यातील आमदार सुहास कांदे यांच्या गुरुकुल तंत्रनिकेतन ,औद्योगिक काॅलेजला मातृभाषेतून इंग्रजीकडे ज्ञान दान करुन आपला जन्म दिवस या काॅलेजच्या विद्यार्थी सोबत साजरा केला. वेगळ्या प्रकारचा संदेश समाजात देण्याचे काम या ४ थी शिकत असलेल्या आराध्या आढावने केले. त्याबदल सर्वत्र आराध्यासह तीच्या पालकांचे अभिनंदन होत आहे.आमदार सुहास कांदे, नांदगांव नगरी माजी नगराध्यक्ष डॉ .आनंद पारख,शामभाउ पारख, माजी नगर सेवक महावीर पारख, महावीर सुराणा,दिलीप पारख, शांतीलाल सुराणा ,राजेन्द्र लोढ़ा, माजी नगराध्यक्ष चेतन पाटिल ,हिंदू पंच पत्रकार अनिल धामणे यांनी अभिनंदन केले. कर्ण हे पात्र आजही दानवीर म्हणुन ओळखले जाते. कुणी श्रमदान करते, कुणी रक्तदान, कुणी अन्नदान,कुणी संपत्ती दान करते , कुणी गो दान करते, कुणी अवयव दान करते , कुणी वस्त्रदान करते कुणी सुवर्ण दान तर कुणी कन्यादान करते. परंतु जे. टी. के. इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी कुमारी आराध्या अर्चना धवलचंद्र आढाव हिने आपला प्रगटदिन ज्ञानदानाने साजरा केला. कुणी म्हणेल हे कसले दान? पण आराध्या ने गुरुकुल तंत्रनिकेतन आणि गुरुकुल आयटीआय नांदगाव येथील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून इंग्रजीकडे या आशयाने इंग्रजी शिकवून ज्ञान दान केले. यावेळेस गुरुकुल तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रो. झाडखंडे, आयटीआय चे प्राचार्य प्रो. थेटे तसेच समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डी.एस. क्षीरसागर सर यानी केले.

Wednesday, July 5, 2023

सेवानिवृत्त व मयत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसास नियुक्ती मिळावी , उद्या नांदगाव शहरातील नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन,




नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगाव नगरपरिषदेमध्ये सन १९९१ मध्ये रोजंदारी कर्मचारी यांना न्यायालयीन आदेशानुसार  सफाई कामगार पदावर नियुक्ती मिळाली होती.  शासनाच्या आदेशानुसार वारसा हक्काने वारसदारांना नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही सुमारे १२ ते १३ वर्षांपासुन वारसा हक्काने नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. या निषेधार्थ प्रशासनाला जागे करण्यासाठी वारसदारांनी उद्या शुक्रवारी (दि.७) रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
    शासनाच्या आदेशानुसार सन २००० पर्यंत ज्या कर्मचान्यांचे समावेशन  नगरपालिकेत मध्ये करण्यात आले आहे .त्यांना वारस हक्काचा लाभ मिळणार नाही याचा नगरपालिका प्रशासनाने वेगळा अर्थ लावुन या वारसांना नगरपालिकेत नेमणुक दिलेली नाही. शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक यांचे कार्यालयाकडुन दि. २४ फेब्रुवारी रोजी चे वारस हक्काने लाभ सर्व सफाई कर्मचाऱ्यांना द्यावा असे स्पष्ट नमुद असुन सुध्दा त्या परिपत्रकाचा अवमान नांदगांव नगरपालिका प्रशासन करीत आहे. याबाबत विभागीय आयुक्त नासिक यांचे कार्यालयाकडुन देखील त्याबाबत वारसांना वारस हक्काने नियुक्ती देणेबाबत आदेश दिले असुन सुध्दा त्या पत्राचा अवमान करीत आहे. त्या विरोधात वारस हक्काने नियुक्त्या देण्यात नगरपालिका प्रशासनाचे वेळ काढूपणा व हेतुपुरस्कर टाळाटाळ करीत आहे.  शासनाच्या परिपत्रकाचे सुध्दा पालन केले जात नाही, या निषेधार्थ वारसदार आपल्या कुटुंबासह एक दिवसाचे धरणे आंदोलनास  नांदगांव नगरपालिका कार्यालयासमोर बसणार असल्याचे अखिल भारतीय मजूर महासंघाचे प्रदेश महामंत्री शशिकांत मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Tuesday, July 4, 2023

गॅसने भरलेल्या टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांना दिली धडक, नांदगाव येथील गिरणानगर उड्डाण पुलाजवळ घटना,


 नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगांव शहरालगत गिरणानगर उड्डाण पुलाजवळ   गैस ने भरलेला टैंकर ने चार मोटरसाइक गाडीला उडविले . हा टँकर पानेवाडी गैस प्लांट मधुन टैंकर क्रमांक (MH04F7315) हा पानेवाडी येथुन कासोदा येथे जाणार होता.  गिरणानगर लगत उडाण पुला जवऴ येताच वाहनावरील नियंत्रण सुटल्या कारणाने समोरील चार मोटरसाइकल, फऴाचे गाडी यांच्या वर जाऊन आढऴला .  या अपघातात जीवीत हानी झाली नाही .  समोरुन टॅकर येताच  वेळीच मोटार सायकल चालक,  फऴ विक्रेता यांनी जीव घेवुन मुठीत धुम ठोकली . वाहन चालकास नागरिकांनी नांदगांवच्या  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे धोकादायक वळणावर या ठिकाणी यापूर्वी लहान मोठे अपघात झाले आहेत. 

Monday, July 3, 2023

पिंपरखेड येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी,



नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - पिंपरखेड येथे  काल सोमवारी दि. ३ जुलै २०२३ रोजी विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी प्रमुख अतिथी सौ. निता  चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  काशिनाथ गवळी हे होते.गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कु. चांदणी चव्हाण हिच्या पालकांना व्यास पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कु. चांदणीच्या हस्ते तिचे पहिले गुरू तिच्या मातापित्यांचे पूजन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. उत्तम सोनवणे, संजय कांदळकर व मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. कु. प्रतिक्षा मवाळ हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे, श्रीमती अलका शिंदे, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, संदीप मवाळ, आबा सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय कांदळकर यांनी मानले.

नांदगावच्या जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे .टी .कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ३ जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात व्यासांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मधुर आवाजातील प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी शाळेचे प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  शरद पवार,  विशाल सावंत,  गोरख डफाळ या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाल व श्रीफळ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे व शिक्षकांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितका शिक्षकांचा देखील असतो. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारामुळे माणूस घडतो. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश गुप्ता बोलत होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हातून केक कटिंग करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी स्कूलचे प्राचार्य श्री मनी चावला यांनी सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले.
       संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा ,विश्वस्त जुगलकिशोर अग्रवाल रिखबचंद कासलीवाल ,महेंद्रभाऊ चांदिवाल यांनी गुरूपौर्णिमेच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

Saturday, July 1, 2023

नांदगाव येथे नगरपालिकेसमोरील शिवस्मृती मैदानावर आमदार आपल्या दारी महा शिबिर ,



 नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगाव शिवस्फूर्ती मैदान येथे आमदार आपल्या दारी शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून आमदार आपल्या दारी एक महा शिबिर राबविण्यात येत असून , नांदगाव येथे नगरपालिकेसमोरील शिवस्मृती मैदानावर आमदार आपल्या दारी महा शिबिर संपन्न झाले. 
    गेल्या महिन्याभरापासून नांदगाव विधानसभा मतदार संघामध्ये आमदार आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत विविध शासकीय सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 
     यामध्ये नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे विविध आजारांवरील उपचार औषधे रक्त तपासणी करून दिली जात आहे. 
     रेशन कार्ड संबंधित अडचणी नवीन रेशन कार्ड दुय्यम रेशन कार्ड विविध प्रकारचे निराधार दाखले व इतर दाखले या ठिकाणी काढून दिले जात आहेत. 
     नांदगाव येथे संपन्न झालेल्या आमदार आपल्या दारी या शिबिरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये नांदगाव नगरपालिका, शासकीय रुग्णालय नांदगाव महावितरण भूमि अभिलेख पंचायत समिती व तहसील असे विविध स्टॉल होते. 
     नांदगाव शहरांमध्ये तीन शिबिरे होणार असून आज पहिले शिबिर शिवस्फूर्ती मैदान नांदगाव नगरपालिकेसमोर संपन्न झाले. शरअंतर्गत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरास उपस्थिती लावली तसेच विविध सुविधांचा लाभ घेतला. 
        नांदगाव शहरात विविध प्रकारचे मोफत सुविधा महा शिबिर पहिल्यांदाच होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. 
        या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे, उज्वलाताई खाडे, मुख्याधिकारी विवेक धांडे , डॉक्टर ख्याती तुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, नगराध्यक्ष राजेशजी कवडे , विष्णू निकम सर, प्रमोद भाबड युवासेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, शहर प्रमुख सुनील सोनवणे सागर हिरे, बाजार समितीचे संचालक कान्हा कलंत्री, अमोल नावंदर , दीपक मोरे, आनंद कासलीवाल, बाळासाहेब शेवरे, साईनाथ पवार ,प्रदीप कासलीवाल, रमेश काकळीज, भास्कर कासार, बाळासाहेब कवडे, वामन पोतदार, मुन्ना शर्मा सर, राजाभाऊ पवार ,संजय आहेर, एन के राठोड, संजय सानप, डॉ.गणेश चव्हाण, राजाभाऊ पवार, , भाऊराव बागुल, अय्याज शेख, शशी सोनवणे, संतोष भोसले,कपिल तेलोरे, युवा सेना शहर प्रमुख मुज्जू शेख, महेंद्र आहेर, सतीश बोरसे ,ज्ञानेश्वर खैरनार, भाऊराव पाटील, राजाभाऊ गुप्ता, महेंद्र गायकवाड, आदीसह 
    शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रोहिणी मोरे, तबसुम सैय्यद, भारती बागोरे सोनिया सोर , रेणुका बाहिकर उपस्थित होत्या.
         ॲड.सचिन साळवे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगर पालिका अंतर्गत घरकुल, महिला बचत गट यांना कर्ज धनादेश, विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वही, तसेच आरोग्य विभाग अंतर्गत नवजात बालक व मातेस बेबी केअर किट वाटप करण्यात आले.  जवळपास २२०० लोकांनी आरोग्य तसेच शासकीय विभागाचा लाभ घेतला.

आमदार आपल्या दारी
आकडेवारी ->

रेशन कार्ड - २६४
निराधार योजना - ०८
उत्पन्न दाखले - ४७
जातीचे दाखले -  ३४
डोमोसील - १७

जनरल ओपीडी - ५५९
डोळे तपासणी - १०५१
चष्मे वाटप - ९५७
रक्त तपासणी - १९०
थायराईड तपासणी - ३६

नांदगावात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाचे शहराच्या विविध भागातून पथसंचलन,

नांदगाव (प्रतिनिधी  ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पा...