नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंजुम कांदे यांच्या हस्ते वह्यांचे संच वाटप करण्यात आले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंजुम कांदे यांच्या संकल्पनेतून सोमवारी पालिका शिक्षण मंडळातील सर्वच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. पालिका शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबत राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी पालिका शिक्षण मंडळाच्या नांदगाव व मनमाड शहरातील शाळांच्या मोडकळीला आलेल्या इमारती व वर्गखोल्या नूतनीकरणासाठी अंजुम कांदे यांनी पती आमदार सुहास कांदे यांच्यामार्फत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरविकास विभागातून दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध करून दिल्याबद्दल नांदगाव शिक्षण मंडळातील
शाळांच्या वतीने आमदार सुहास कांदे यांचा सत्कार करण्यात आला. अंजुम कांदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आम्ही लोकांप्रती कर्तव्य म्हणून काम करीत असतो, असेही श्रीमती कांदे म्हणाल्या. आपण सर्व एक कुटुंब आहोत. कुटुंबप्रमुख या नात्याने हे आमचे कर्तव्यच आहे. आज या स्तुत्य उपक्रमाची सुरवात केली आहे. यापुढे विद्याथ्र्यांसोबतच शिक्षकांनाही गणवेश उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या वेळी जवळपास ६२० विद्यार्थ्यांना वह्यांचे संच वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विवेक धांडे, प्रशासनाधिकारी चंद्रा मोरे, उज्वला खाडे, संगीता बागूल, विद्याताई जगताप, रोहिणी मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक साहेबराव घुगे, केदु जाधव, ईश्वर ठाकूर, शाहिद अख्तर, लिपिक अनिल पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment