Tuesday, September 27, 2022

"सत्यशोधक चळवळ ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनीय लोकचळवळ" - वडक्ते एस.के. यांचे प्रतिपादन


  मांडवड- ( प्रतिनिधी) - १५० वर्षापूर्वी समविचारी लोकांना बरोबर घेऊन महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 
"सर्व साक्षी जगत्पती!! त्याला नकोच मध्यस्थी!!"
 हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. निर्मिकाचा धर्म सत्य आहे. हेच तत्त्व पटवून देण्यासाठी तात्कालीन समाजाला मानवतेचा, समतेचा, बंधुभावाचा संदेश देत, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, अमानुषता, धार्मिक थोतांड यापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात प्रबोधनाचे नवे पर्व सुरू केले. सरकार,सरकारी नोकर, सावकर, व्यापारी व भटजी यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, श्रमिक वर्ग, स्त्रीयांवर होणारे अत्याचार,शोषण आणि उच्चनीचता , जातीभेद याविरुद्ध सत्यशोधक चळवळीने लढे दिले. सवर्ण-दलितांमधील दरी कमी केली. दलित मुक्ती लढ्याचा पाया घातला. सत्यशोधकांनी शिक्षणाकडे समाज परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले. लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी जनजागृती केली. सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणेतून रयत शिक्षण संस्था व मराठा विद्या प्रसारक समाज संस्था यासारख्या ध्येयवादी शिक्षण संस्था सुरू झाल्या.सत्यशोधक समाजाकडून प्रेरणा घेऊन मविप्र समाज संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊराव ‌हिरे व सह कर्मवीरांच्या सहकार्याने मविप्र समाज संस्थेची स्थापना करून नाशिक जिल्ह्यांत शैक्षणिक क्रांती केली. त्याकाळातील लोकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी कार्य करणारी सत्यशोधक चळवळ हि आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनीय लोकचळवळ होती असे पगार के.जे. यांनी असे प्रतिपादन केले. 
       मविप्र समाज संचलित स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक पगार के.जे. यांच्या अध्यक्षतेखाली मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पायाभरणीत सत्यशोधक समाजाचे अतुलनीय योगदान आहे, हे आजच्या विदयार्थ्यांना या चळवळीची माहिती होण्यासाठी सत्यशोधक चळवळीवर आधारित विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सातपुते बी.पी. यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या काळात व तत्पूर्वी महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती कशी होती. या विषयी माहिती दिली. श्रीमती आहिरे यांनी भाषणात सत्यशोधक चळवळीच्या कार्यातून आजच्या बहुजनांना आपला इतिहास समजेल आणि इतिहास समाजाला तरच आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतील त्यासाठी आजच्या तरुण पिढीला सत्यशोधक विचारांची गरज असल्याचे सांगितले. वडक््तते एस.के.यांनी समाजातील दीनदुबळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि मानवता धर्माची प्रेरणा देण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळी सुरू केली. या सत्यशोधक समाजाच्या विचारसारणीतून प्रेरणा घेऊन कर्म. रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, गणपतदादा मोरे, या कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून नाशिक जिल्ह्यातील खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा पोहचवण्याचे महान कार्य केल्याचे प्रबोधनपर विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सभासद रामराव मोहिते उपस्थित होते.
       कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले, यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...