Friday, March 24, 2023

आजपासून पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ,

 


नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव  तालुक्यात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी चंद्रदर्शन झाले. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली. आज (शुक्रवारी) पहिला रोजा (उपवास) आहे. चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या.
  
मुस्लिम बांधव ठेवणार महिनाभर रोजा

     शांतता, प्रेम, बंधुभाव, त्याग व उपासनेचा प्रतीक असलेल्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजे करुन अल्लाहच्या इबादत (प्रार्थनेत) मध्ये असतात. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव पहाटे सुर्योदयापुर्वी सहेरी करून उपवास धरतात. तर संध्याकाळी सुर्यास्तावेळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. यामध्ये संपुर्ण दिवसभर पाणी, अन्न काही घेतले जात नाही. घरोघरी व मशिद मध्ये कुरान पठण करुन मुस्लिम बांधव पाच वेळची नमाज अदा करत असतात. 
रात्री तराहवीची विशेष नमाज अदा केली जाते. ज्यामध्ये कुरानच्या पारेचा समावेश असतो. नमाजनंतर मशिदमध्ये जे पठण झाले त्याचा अर्थ देखील मौलाना विशद करत असतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात दान-धर्म केले जाते.

     इस्लाम धर्मात पवित्र 'रमजान'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात.
रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते. मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरीत्या परिभाषित करण्यात आले आहे. यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मुलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात. इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात.

रोजाचा मूळ उद्देश - 
    रमजानमध्ये रोजा या शब्दाला आरबी भाषेत सोम म्हणतात, याचा अर्थ थांबणे. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस ‘रोजा’ (उपवास) करणारे सर्व ‘रोजेदार’ दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचिभरूत वळण लाभतं. मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे ‘ इबादत’ (उपासना) करण्यासाठीसुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते. संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय, प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो.
'रमजान' मांगल्याचे प्रतिक आहे. त्यामुळे याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात. पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचढ ठरली आहे. रमजातमध्ये रोजे अनिवार्य आहेत. या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय. नफील नमाजचा (जादा नमाज) मोबदला फर्ज (अनिवार्य नमाज) इतका दिला जातो तर फर्ज (अनिवार्य) नमाजचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो.

रमजान महिन्याचे तीन हिस्से - 
    रमजान इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो. रमजान महिन्याचा पहिला दशक 'कृपेचा', दुसरा दशक 'क्षमेचा', तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून 'मुक्ततेचा' मानला जातो. या काळात अल्लाह त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल. त्यामुळे वर्षभरातील अन्य अकरा महिन्यांत मिळणार्‍या नेकी (पुण्याई) पेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी  ही तब्बल सत्तर पटीने जास्त असते. त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीतजास्त नेकी कमाविण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार, व्यापार आदींचा त्याग करून अल्लाहस शरण जातात.


No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...