यौमे आशुरा -
इस्लामी वर्षाचा मोहरम हा पहिला महिना असून या महिन्याच्या दहा तारखेला यौमे आशुरा म्हणतात.मोहरमच्या एक तारखेपासून नवीन इस्लामी हिजरी वर्षाचा प्रारंभ होतो.आशुराचे महत्व फार पूर्वीच्या काळापासून आहे. त्यामुळे या महिन्याला खूप महत्त्व आहे.हजरत प्रेषित पैगंबर यांनी म्हटले आहे कि मोहर्रम हा अल्लाहचा महिना आहे.
मोहरमच्या दहा तारखेला जगातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. या सृष्टीची निर्मिती मोहरमच्या दहा तारखेला म्हणजे आशुराच्या दिवशी झाली.हजरत आदम अलैसलाम यांची माफी याच दिवशी स्वीकारली गेली. हजरत नुह अलैसलाम यांची नौका तूफानातून सुखरूप याच दिवशी जुदी पर्वताला टेकली. हजरत युनुस अलैसलाम यांची याच दिवशी माशाच्या पोटातून सुटका झाली. हजरत आयुब अलैसलाम यांचा आजार याच दिवशी बरा झाला. हजरत मुसा अलैसलाम यांना याच दिवशी फिरऔनच्या जाचातून मुक्ती मिळाली. हजरत युसुफ अलैसलाम यांची आपल्या भावंडांशी भेट याच दिवशी झाली. या जगाचा शेवट म्हणजे कयामत देखील याच दिवशी होणार आहे. अशा अनेक महत्त्वाच्या घटना या आशुराच्या दिवशी घडल्या आहेत. मोहरम अलीकडे लक्षात राहतो तो हजरत पैगंबरांचे नातू हजरत इमाम हुसेन (रजि.) व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बलिदानाच्या घटनेमुळे. याच दिवशी त्यांच्यात व सरदार यजीद यांच्यात जे धर्मयुद्ध झाले त्यात हजरत इमाम हुसेन यांच्या कुटुंबातील जवळपास बहात्तर लोक शहीद झाले.ही घटना इराकमधील करबला या ठिकाणी घडली.मोहरम मधील प्रमुख घटना म्हणून करबलाच्या घटनेचा उल्लेख केला जातो.आजचा दिवस हा जगाच्या प्रमुख घडामोडींचा महत्त्वाचा दिवस आहे. इस्लामपूर्व काळात आजच्या दिवसाचे रोजे सुन्नत होते. रमजान महिन्यातील रोजे नंतर अनिवार्य झाले.तरी सुद्धा हजरत पैंगंबरांनी मोहरमच्या दहा तारखेचा रोजा आशुराचा रोजा म्हणून धरण्यास सांगितले आहे. जगभरातील महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असा हा दिवस असून या दिवशी आपल्या कुटुंबातील लोकांसह जास्तीत जास्त लोकांना अन्नदान केले जाते.
करबलाच्या घटनेची आठवण म्हणून शिया लोक मोहरमच्या दिवशी ताजिया म्हणजे ताबुतांची मिरवणूक काढतात.सवाऱ्या बसवतात.ताजिया व सवाऱ्याची परंपरा भारतात तैमूरलंग च्या काळात सुरू झाली. लखनऊ व हैदराबाद आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ताबूत व सवाऱ्या बसवल्या जातात.अहमदनगर मधील सवाऱ्या या देखील त्याच काळापासून सुरू झाल्या आहेत.आशुराचा हा दिवस हजरत इमाम हुसेन(रजि.) यांच्या बलिदानाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी अन्नदान केले जाते.सरबत वाटप ही करतात .
हजरत इमाम हुसेन (रजि.) व त्यांच्या कुटुंबीयांनी करबलाच्या मैदानामध्ये धर्माच्या रक्षणार्थ जे बलिदान दिले,ती घटना सुद्धा दहा मोहरमला घडलेली असल्याने तिला वेगळे महत्त्व आहे. अलीकडच्या काळात मोहरम हा हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या जात नाहीत, तर दुःखाचा सण म्हणून मोहरम ओळखला जातो.
No comments:
Post a Comment