पिंपरखेड , नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे सोमवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी विद्यालयात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त 'कवितांचा जागर' हा कवितांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून कवीवर्य दयाराम गिलाणकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी सर होते.
प्रसंगी विद्येची देवता सरस्वतीच्या व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले होते. पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कवीवर्य दयाराम गिलाणकर सर यांनी त्यांचे बळीचं जिनं व सप्तरंगी एकांकिकेच्या दोन दोन प्रती विद्यालयास भेट म्हणून दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास पठाडे यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ गवळी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भाषा हे विचार अभिव्यक्तीचे साधन असते. भाषा नसती तर आपल्याला आपले विचार मांडता आले नसते. भाषेमुळे उत्तम प्रकारे संवाद साधला जातो. आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो याचा आपल्याला सदैव अभिमान वाटला पाहिजे. मराठी ही खूप शालिन भाषा आहे त्यामुळे विसंवाद होत नाही. आपले विचार समृद्ध करण्यासाठी पाठ्यपुस्तकांव्यतीरिक्त इतर उत्तमोत्तम व दर्जेदार आणि संस्कारक्षम साहित्य वाचले पाहिजे असे मत कवीवर्य दयाराम गिलाणकर यांनी मांडले. तसेच कवीवर्य दयाराम गिलाणकर सर व मुख्याध्यापक कवीवर्य, गझलकार काशिनाथ गवळी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम, संस्कारक्षम व भावस्पर्शी कविता म्हणून दाखवल्या. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात या कवितांना प्रतिसाद दिला. शेवटी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या 'कणा' या कवितेचे सादरीकरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
विद्यालयाचे कला शिक्षक लक्ष्मण जाधव यांचे फलकलेखन व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख संजय कांदळकर यांचे योग्य आयोजन नियोजन खूप आवडल्याचे प्रमुख पाहुणे कवीवर्य दयाराम गिलाणकर यांनी आवर्जून सांगितले. अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यालयात नियमितपणे घेतले जावेत त्यामुळे विद्यार्थ्यांना महान व्यक्तींचा परीचय होईल त्यांच्या जाणिवा समृद्ध व प्रगल्भ होत जातील अशी भावना शिक्षकांनी बोलून दाखवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे, संजय कांदळकर, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव , उत्तम सोनवणे, संदीप मवाळ, आबा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांदळकर यांनी व आभार उत्तम सोनवणे यांनी मानले.
No comments:
Post a Comment