नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नांदगाव तहसील कार्यालयावर शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही अशा घोषणा देण्यात आल्या. नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. वीजबिल माफ झाले पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पिण्याचे पाणी, चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगाव तालुका दुष्काळी झाला नाही, असा ठपका जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक यांनी लगावला आहे. तसेच काही पक्षाचे पदाधिकारी गावोगावी जाऊन दुष्काळाचा दौरा करत होते, तरीदेखील दुष्काळ जाहीर झाला नाही. मग इथे कोण कमी पडले, असेही धात्रक यांनी बोलताना म्हटले आहे.
परंतु आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, प्रशासनाला दुष्काळ संदर्भात ज्या अडी-अडचणी आल्या असतील त्या त्यांनी पूर्ण करून नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यात छेडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, कैलास भाबड , माधव शेलार,श्रावण आढाव, शशिकांत मोरे, संदीप जगताप, संतोष जगताप, शिवाजी वाघ, अनिल दराडे, बाळासाहेब चव्हाण, कविता छाजेड, रेणुका जयस्वाल, मुक्ताबाई नलावडे, लता कळमकर, प्रेरणा गायकवाड, वृषाली आहेर यांच्यासह शिवसैनिक, महिला तालुक्यातील आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment