Friday, February 9, 2024

नांदगाव मध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टी कामांची आमदार सुहास कांदे यांच्याकडून पाहणी,




 नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या कामाची पाहणी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केली.  आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव शहरात निर्माण होत असलेल्या शिवसृष्टी चे कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. नांदगाव शहरातील जुने पंचायत कार्यालय येथील जवळपास अडीच एकर जागेवर विशाल अश्वारूढ पुतळ्यासह शिवकालीन शिवसृष्टी निर्माण होत आहे. आमदार सुहास आण्णा कांदे स्वतः जातीने या कामात सतत लक्ष घालताना दिसून येतात.  सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसृष्टी च्या सुरू असलेल्या कामावर जाऊन पाहणी करून आढावा घेतला.  

      अडीच एकर जागेवरील शिवसृष्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी ठरणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २९ फुटी असून चौथाऱ्यासह ४६ फुट इतकी आहे. तसेच शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य शिव-प्रेमींना अनुभवायला मिळणार असून या शिवसृष्टीमध्ये विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कथा पाहायला वाचायला व अनुभवायला मिळणार आहे.यात महाराजांची जीवन कथा भिंतीवर साकारली जाणार आहे. शिव संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन हत्यारे शिवकालीन वस्तू पाहायला मिळणार आहे, यामुळे भावी पिढीला स्वराज्याचा इतिहास जवळून पाहता येईल आणि समजून घेता येईल. शिव वाचनालय यामध्ये शिवकालीन ग्रंथ वाचायला उपलब्ध करून दिले जाणार आहेत . यासह शिवसृष्टी पाहायला येणाऱ्या शिवप्रेमी साठी येथे शिवभोजनालयाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. यानंतर शिव चित्रपटगृह या संकल्पनेच्या माध्यमातून एक मिनी थियटर या ठिकाणी असणार आहे या शिव चित्रपटगृहात ऐतिहासिक चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे शिवसेनेचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, चोळके साहेब, सदर कामाचे ठेकेदार यांच्यासह माजी आमदार संजय पवार, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, फरहान दादा खान, उपजिल्हा प्रमुख महेंद्र दुकळे, राजेंद्र देशमुख, नंदू पाटील, सागर हिरे, प्रकाश शिंदे, प्रमोद भाबड, सुनील जाधव, शशिकांत सोनवणे,अय्याज शेख रोहित काकळीज, मंदार ढासे, आदीसह नागरिक उपस्थित होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सदर कामाची पाहणी करून कामाबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...