Thursday, January 1, 2026

नांदगावचा नार - पार नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याची मागणी,






नांदगाव ( प्रतिनिधी)  - बहुप्रतिक्षित नार-पार- गिरणा नदी जोड प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे या योजनेचा मार्ग प्रशस्त झाला असला तरी सदर प्रस्तावित प्रकल्पात सतत अवर्षणग्रस्त व अतीतुटीच्या नांदगाव तालुक्याचा समावेश वगळण्यात आला आहे,ही बाब विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविणे ह्या तत्वालाच छेद देणारी आहे.असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी घेतला असून , नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
      या  प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील कामांत नऊ धरणे प्रस्तावित आहेत.या पाण्याने नाशिक जिल्ह्यातील चार तर जळगाव जिल्ह्यातील सहा असे उत्तर महाराष्ट्रातील १० तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत. नार, पार, औरंगा आणि अंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्यातील अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात आणण्यासाठी नार-पार-गिरणा नदी जोड योजनेची मांडलेली संकल्पना प्रदीर्घ काळानंतर प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. या योजनेला जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटनेने ७५ टक्के विश्वासार्हतेसह(१०.७६ टीएमसी) पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र दिलेले आहे.
     या योजनेंतर्गत नार आणि पार नद्यांमधील १०.७६ टीएमसी म्हणजे तब्बल ३०४.६० दशलक्ष घनमीटर पाणी गिरणा नदीत वळविण्यात येणार आहे. यातील काही पाणी स्थानिकांसाठी आरक्षित असेल.तर उर्वरित साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यास मिळणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे साडेसात हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून यातील पहिल्या टप्प्यातील कामांची ४११६ कोटींची निविदा जलसंपदा विभागाने काढली आहे.
    पहिल्या टप्प्यात उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभूवन, मिलन, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा, देवमाळ या ठिकाणी धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. मानखेड व साळभोया येथे दोन साठवण तलावांमध्ये अतिरिक्त पाणी गोळा करून ते विविध उंचीवर उचलले जाईल. आणि नंतर ३७ किलोमीटर लांबीच्या बोगद्यांमधून पर्वतरांग ओलांडून गुरुत्वाकर्षणाने पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत आणले जाणार आहे. नार-पार- गिरणा नदी जोड प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील कळवण, बागलाण,देवळा आणि मालेगांव तालुक्यांतील काही भाग असे चार आणि जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांना मिळणार आहे. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरणांच्या परिसरातील ७,१७४ हेक्टर, असे एकूण ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने अतिशय महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडवून आणणाऱ्या ह्या योजनेत नांदगावचा समावेश करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....