नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण,शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी 'भारतीय संविधान' वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची भाषणे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी "विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांचा 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र जीवनात अमलात आणला पाहिजे. केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे हेच खरे शिक्षण आहे," असे विचार त्यांनी मांडले.
उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना "बाबासाहेबांचे जीवन हा संघर्षाचा आणि जिद्दीचा प्रवास आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ज्ञानाच्या जोरावर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी," असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी भाषणे केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण, त्यांचे उच्च शिक्षण आणि संविधानाचे महत्त्व यावर विद्यार्थिनींनी प्रकाश टाकला. त्यांच्या ओघवत्या शैलीतील भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
No comments:
Post a Comment