नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपालिकेतील मयत व सेवानिवृत्त मागासवर्गीय सफाई कामगार यांचे वारसदार यांनी लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने मयत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना रिक्त सफाई कामगार या पदावर नियुक्ती मिळावी यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर बुधवार (दि.२) पासून कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत.
नांदगाव नगरपालिकेतील सेवानिवृत्त सफाई कर्मचारी तथा मृत कर्मचारी यांच्या वारसांनी वेळोवेळी वारसाहक्काने नोकरी मिळण्यासाठी उपोषणे केली असून याबाबत प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत असून या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी बुधवार (दि. २) पासून येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबीयांसह साखळी उपोषणाला बसले आहेत. यावेळी संतोष गुप्ता, प्रदिप थोरात, गौतम जगताप, नाना जाधव, सखाराम चव्हाण आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
नांदगाव नगरपालिकेतील आस्थापना विभागातील मंजुर सफाई कामगार पदावर सन १९९१ मध्ये ११ व सन १९९५ मध्ये १० सफाई कामगार म्हणून कोर्ट सुलेनामा च्या आधारावर कायम नियुक्ती देण्यात आली असता त्यांना स्थायी निर्देश लागू करण्यात आले होते. या सर्वांनी पंचवीस ते तीस वर्ष सेवेत कार्यरत राहून सेवानिवृत्त झाले तर काही मयत झाले त्यांच्या वारसांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे विनंत्या, अर्ज करून नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले असता केवळ दोन जणांना नोकरीत सामावून घेतले तर इतरांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही.
वारसा हक्काने नियुक्ती मिळत नसल्याने न.पा. प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी २५ जून २०१९ रोजी नांदगाव नगरपरिषद समोर आमरण उपोषण केले. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१९ जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे सामुदायिक आमरण उपोषण केले. पुन्हा १३ ऑगस्ट २०२० रोजी जुने तहसील कार्यालय नांदगाव या ठिकाणी उपोषण करण्यात आले. अनेक वेळा मुख्याधिकारी नांदगाव तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालय नपा शाखा यांनी वेळोवेळी आयुक्त तथा संचालक यांचे कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळताच नियुक्ती देऊ असे खोटे आश्वासन देऊन आम्हाला वारसा हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. कोरोना महामारी मध्ये सुद्धा हाताला रोजगार नाही. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने आम्हा वारसदारांवर उपासमारीची वेळ आली असून आमच्यावर दया करावी व नगरपालिकेच्या सफाई कामगार पदावर वारसाहक्काने नियुक्ती देण्यात यावी जेणेकरून आमच्या कुटुंबाची उपासमार थांबू शकेल असे उपोषनार्थींनी मुख्याधिकारी नांदगाव नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बापू भालेकर, शालूबाई भालेकर, अर्चना भालेकर, ज्योती भालेकर, शितल भालेकर, रणजीत अहिरे, दिपाली अहिरे, विनोद आहिरे, पोपट ससाने, सचिन गुढेकर, दिगंबर गुढेकर आदींच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment