नांदगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील विविध शाळेतून शालेय पोषण आहार अंतर्गत काम करणाऱ्या महिलांना आशा वर्कर यांच्या धर्तीवर मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी योजनेत काम करणाऱ्या महिलांनी केली. याबाबत शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किशोर सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की आम्ही भांडे धुण्यापासून ते खिचडी यासह इतर माध्यान्ह भोजन शिजवून वाटप करून साफसफाई करण्यापर्यंत हे सर्व काम करतो. या कामाच्या मोबदल्यात आम्हाला केवळ एक हजार ५०० रुपये महिना मिळतो. याशिवाय शासन जे काही अन्नधान्य व इतर वस्तू पाठवते ते कंत्राटदारामार्फत पाठवत असते. यामुळे याचा दर्जा देखील अतिशय निष्कृष्ट आहे. तसेच, मदतनीस महिलांना तेल व रोज लागणारा भाजीपाला विकत घ्यावा लागतो. मात्र याचा पगार देखील महिन्याच्या महिन्याला होत नसल्याने ते घेण्यासाठी देखील अडचणी आहेत. यामुळे मानधनात आशा वर्कर यांच्या धर्तीवर वाढ करावी यासह वेळेवर बिल अदा करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संगीता सोनवणे, आशा काकळीज, तब्बसुम शेख, सरला मोढे, नपीसा जाकीर शेख, वंदना बाहिकर, शोभा बाहिकर, पुष्पा वाघ, बेबीबाई शिंदे, शोभा सूर्यवंशी, हिराबाई आहेर, मंगलाबाई जक्कल आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment