नांदगाव( प्रतिनिधी) - नगरपालिकेतील मयत, सेवानिवृत्त आणि बारा ते तेरा वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून होणारी हेतू पुरस्कार विलंब होत असल्याच्या कारणांवरून नगरपरिषद, महापालिका संलग्न भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील पालिका कार्यालयासमोर कामगार नेते श्रावण जावळे, शशिकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
नांदगाव येथील पालिकेच्या सेवानिवृत्त, मयत सफाई कामगारांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आस्थापनेवरील मंजूर रिक्त पदांवर नियुक्ती मिळणेबाबत वारसदारांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी व महसूल आयुक्त तसेच नगरविकास विभागाच्या संचालकांकडे पाठपुरावा केला. मात्र पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन दाद देत नसल्याच्या मुद्दयाकडे
लक्ष वेधण्यासाठी काल शुक्रवारी ७ जूलै रोजी हे आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी श्रावण जावळे, प्रदेश सरचिटणीस शशिकांत मोरे यांच्याशी आंदोलनस्थळी भेट घेत चर्चा करत याप्रकरणी पालिका प्रशासनाचे कुठलेही वेळकाढू धोरण नसून न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्यावर शासनाचे मार्गदर्शन मागविले असल्याचे स्पष्टीकरण , आंदोलकांच्या निदर्शनास आणून देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे मोर्चा काढण्यात येऊन त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कामकाज बंद करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला. आंदोलनाला काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे, कपिल तेलरे यांनी कामगारांना आपला पाठिंबा दिला. यावेळी बापू भालेकर, कामगार नेते राधेशाम निकम, रंजीत अहिरे, सोनू पेवाल, विकी पेवाल, राजू गुडेकर , गणेश शर्मा आदी उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment