Sunday, November 5, 2023

नांदगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदगाव तालुका दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच,




नांदगाव (प्रतिनिधी) -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदगाव तालुका दुष्काळाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात  चौथ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. सुट्टीच्या दिवशीही महसूल व कृषि विभागाची कागदपत्रांची पूर्तता करण्याची धावपळ सुरू होती. तालुका प्रशासनाच्या वतीने अधिकारी वर्गाने उपोषणकर्त्याशी चर्चा करून आजपावेतो तयार केलेले रेकॉर्ड व सुरू असलेले काम ह्या बाबत अवगत केले. जे नुकसान होऊन गेले ते भरून निघणे अवघड आहे मात्र ह्या पुढील उपाययोजना,अनुषंगिक सवलती व अनुदान मिळणेकामी यापुढे तरी हयगय व्हायला नको आणि ऐनवेळी परत येरे माझ्या मागल्या असे होऊन तालुका वंचित राहू नये म्हणुन यंत्रणेने सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून तत्पर असले पाहीजे ह्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त ४० तालुक्यांना मिळणारे अनुदान व सवलती नांदगांव ला लागू होणार का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने दुष्काळग्रस्त ४० तालुक्यात ३ हेक्टर क्षेत्रावर हेक्टरी २२५०० रू.अनुदान देण्याची घोषणा केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त जाहीर ४०तालुक्यांतील शेतकऱ्यांचे २ लाखा पर्यन्तचे पिक कर्ज राज्य सरकार माफ करणार असल्याचे प्रसार माध्यमातील बातमीनुसार समजते. दुष्काळग्रस्त जाहीर तालुक्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषाप्रमाणे विविध सवलतींची मदत होत असते, त्यामुळें नांदगांव तालुका ह्या निर्णयापासून वंचित राहिल्यास फार मोठी आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याची जबाबदारी कोणाची? ह्या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी विचारला आहे.
   शासनाने घोषित केलेल्या सवलती मध्ये जमीन महसुलात सुट, शैक्षणीक फी माफी, पिक कर्ज सवलत, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंप वीजबिलात सूट, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, कृषि पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादि सवलती पासुन वंचित राहण्याची वेळ जनतेवर येणार आहे.
दुष्काळग्रस्त ४० तालुक्या व्यतिरिक्त राज्यभरातील उर्वरीत दुष्काळसदृश्य तालुक्यांचा आढावा मा.मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उपसमिती घेणार असून त्यात कुठल्या तालुक्यांतील कुठल्या मंडळाला टंचाईसदृश्य घोषित करायचे तो अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करेल व त्यानंतर उपसमितीच्या शिफारसीनुसार शासन निर्णय घेणार आहे. १५ डिसेंबर ला अंतिम पैसेवारी जाहिर झाल्यावर राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या टंचाई सदृश्य उपाय योजनात तालुक्यातील एकंदरीत प्रतिकुल परिस्थीती बघता सदर अहवालात तालुक्यातील सर्वच्या सर्व ८ महसूल मंडळांचा समावेश होऊन संपुर्ण तालुक्याला न्याय मिळावा ह्या भूमिकेतून यंत्रणेने कामकाज करणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त व टंचाईसदृश्य ह्या तांत्रिक फरकाचा फटका जनतेला बसू नये हि भावना नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने नांदगांव तालुक्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
तालुक्यातील जनता व ग्रामपंचायत यंत्रणा ह्यांनी आपापल्या गावातील दुष्काळाची भीषणता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतने मा. तहसिलदार नांदगाव ह्यांच्या नावे निवेदन सादर करावे असे आवाहन उपोषण कर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Saturday, November 4, 2023

नांदगाव तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी,






नांदगाव (प्रतिनिधी) - राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा परिणाम झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. खरीप हंगामातील सन २०२३ मधील दुष्काळग्रस्त राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे परंतु , नाशिक जिल्हातील केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ठ असल्याने उर्वरीत दुष्काळी तालुक्यांचा समावेश करुन संपुर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणुन घोषित करण्याबाबत शुक्रवार ( दि. ०३) रोजी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून केंद्रीय राजमंत्री डॅा. भारती पवार यांनी निवेदन देवुन मागणी केली आहे. यावेळी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा. राहुल हे देखील उपस्थित होते. 
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झालं असून अनेक गावांमध्ये आजमितीस टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अनेक तालुक्यांत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. परिनामी कोरडवाहु शेती तसेच फळबागा व बागायती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतक-यांना कृषीविषयक अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यात नदीनाले, छोटे मोठे पाझर तलाव कोरडे ठाक पडली आहेत. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात काही गावांत भर पावसाळ्यात देखील टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. आता यात आणखी भर पडली असून, प्रशासनाकडे टँकरचीमागणी सुरु झाली आहे. असे असतांना राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्यातील मालेगांव, येवला व सिन्नर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होते मात्र देवळा, चांदवड व नांदगाव, निफाड, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ या तालुक्यांत देखील दुष्काळाची भयावह परिस्थिती असून, तालूक्यातील बहुतांश गावात दिवसाआड तर काही ठिकाणी दैनंदिन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून, पशुपालक मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत चारा विकत घेत आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात जनतेत व शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचा सूर उमटला असलेयाची बाब मंत्री भारती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणुन दिली. तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यांसह निफाड, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ या तालुक्यांचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी केली आहे.

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर न झाल्यास अजितदादा पवार गटाच्या वतीने उपोषणाचा इशारा,





नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत. यावर्षीच्या जून महिनापासून पाऊसाने दडी मारली तर आत्तापर्यंत अतिशय अल्प १८६.३ मिली पाऊस झाल्याने तालुक्याची आणेवारी ३६ पैशांपर्यंत आहे. तालुक्यात खरीप हंगामाची पीक जमिनीतून फक्त उगवली आहेत‌‌. पुढील वाढीसाठी पाऊसचं पडला नाही. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान सलग महिनाभर पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम होरपळून गेला. त्यामुळे खरीप हंगामाचे हंगामाचे १००% टक्के नुकसान झाले आहे. जनावरांना चाराही राहिलेला नाही. जनावरं व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहेत. हातांना काम नाही‌. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहेत.
           तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमान व सर्वात कमी पिकांची आणेवारी लागली आहेत. अशा प्रकारचे दुष्काळाची दाहकता नांदगाव तालुक्यात कधीही जाणवली नाही. अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना आजपर्यंत नांदगाव तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला नाही. तरी परिस्थितीचे अवलोकन करून तात्काळ नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा.
           नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास मंगळवार दिनांक- ७ नोव्हेंबर पासून नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (अजित दादा पवार गट) उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदन नायब तहसीलदार केतन कोनकर यांना देण्यात आले.
           यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक विलास राजुळे, महिला तालुकाध्यक्ष योगिता पाटील, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, सामाजिक न्याय विभाग राजेंद्र लाठे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष वाल्मीक टिळेकर, देवदत्त सोनवणे, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, पंडित सूर्यवंशी, अशोक पाटील, अलका आयनोर, हेमंत देहाडराय, प्रशांत बोरसे, जगदीश सुरसे, शुभम बोरसे, जयवंत सुरसे, शंकर शिंदे, राजेंद्र सावंत, करूणा कासार, लक्ष्मण बोगीर, वाल्मीक वाघमारे, नितीन गांगुर्डे, पंढरीनाथ वाघमारे, संजय सोमासे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी तहसील कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नांदगाव तहसील कार्यालयावर शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही अशा घोषणा देण्यात आल्या. नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. वीजबिल माफ झाले पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पिण्याचे पाणी, चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
   प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगाव तालुका दुष्काळी झाला नाही, असा ठपका जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक यांनी लगावला आहे. तसेच काही पक्षाचे पदाधिकारी गावोगावी जाऊन दुष्काळाचा दौरा करत होते, तरीदेखील दुष्काळ जाहीर झाला नाही. मग इथे कोण कमी पडले, असेही धात्रक यांनी बोलताना म्हटले आहे.
परंतु आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, प्रशासनाला दुष्काळ संदर्भात ज्या अडी-अडचणी आल्या असतील त्या त्यांनी पूर्ण करून नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यात छेडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नांदगाव  तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, कैलास भाबड , माधव शेलार,श्रावण आढाव, शशिकांत मोरे, संदीप जगताप, संतोष जगताप, शिवाजी वाघ, अनिल दराडे, बाळासाहेब चव्हाण, कविता छाजेड, रेणुका जयस्वाल, मुक्ताबाई नलावडे, लता कळमकर, प्रेरणा गायकवाड, वृषाली आहेर  यांच्यासह  शिवसैनिक, महिला तालुक्यातील आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Friday, November 3, 2023

वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत कामगार संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन,




नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव येथील वाल्मीकी, मेहतर, भंगी समाजातील बांधवांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत दिवाळीनंतर मुंबईला कामगार संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यामुळे दोन दिवसांपासून येथील पालिका कार्यालयाबाहेर सुरू असलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला.
वाल्मीकी, मेहतर, भंगी या समाजाला वारसाहक्काने नोकरी देण्यात यावी असा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा नोकरी मिळत नसल्याने व प्रलंबित मागण्यांसाठी वारसदार, कुटुंबातील घटक, सर्व निवृत्त कर्मचारी
सेवानिवृत्त आमरण उपोषण सुरु होते. गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. त्यातील रणजित आहिरे, बापू भालेकर, प्रदीप भालेकर या तिघा उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. नागसेन चव्हाण यांनीही उपोषणार्थीची भेट घेत त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत पालिका प्रशासनाला तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करीत वाल्मीकी, मेहतर, भंगी समाजातील बांधवाना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत दिवाळीनंतर तोडगा काढणार असल्याचे सांगितले. त्यानंतर नांदगाव नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी  पालिका कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणकर्ते यांची भेट घेत पालकमंत्री यांनी दिलेली माहिती उपोषणकर्ते यांना दिली. यानंतर आंदोलन रात्री दहा वाजेच्या सुमारात स्थगित करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वारसा हक्काने निवे नियुक्ती मिळण्यासाठी पालिकेला तत्व मार्गदर्शन करण्याचे पत्रच दिले नसल्याने उपोषणावर व आतापावेतो झालेल्या त्याग आंदोलनातून तोडगा निघू शकलेला गोड नाही. यावेळी नांदगाव शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, न.पा.चे राहुल कुंटे , संजय सानप, आनंद शिंदे, सोनू पेवाल,   राजाभाऊ गूढेकर, किरण फुलारे, विकी पेवाल, सचिन गुढेकर, अरबाज बेग, यांन राहुल गुढेकर, सुजित जगताप, हरिभाऊ भालेकर, समाधान सूर्यवंशी, रवी सानप, लखन भालेकर, नंदू ससाणे, दिगंबर  गुढेकर, सुनील गुढेकर उपस्थिती होती.  येथील अरुण पाटील, संतोष गुप्ता, मनोज चोपडे, दिपक सोनवणे,  समाजसेविका संगिता सोनवणे, राकेश चंडाले, प्रदिप थोरात यांनी उपोषणाला पाठींबा दिला.

Wednesday, November 1, 2023

नांदगाव येथील आमरण उपोषणास मनसेचा जाहीर पाठिंबा, सरकारने आरक्षणासंदर्भात लवकर तोडगा काढावा,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषण व आमरण उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देतांना नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रेखा शेलार,शहराध्यक्ष अभिषेक विघे, शहरसचिव कुणाल सौंदाने आदीची उपस्थिती होती. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी शांततेत आंदोलन, उपोषण चालू आहे. नांदगाव मध्ये साखळी उपोषणाची आमरण उपोषणात रुपांतर होत आहे. तरी सरकार या विषयावर जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे, यांची शासनाने गंभीर विचार करुन मराठा समाजास योग्य तो न्याय द्यावा व मनोज जरांगे पाटील यांचा जीव धोक्यात न घालता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आले. मनसेकडून या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला.

समता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मूळडोंगरी तांडा येथे शिधापत्रिका वाटप,





नांदगाव (प्रतिनिधी) - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर-एंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ३२ वा वर्धापन दिनानिमित्त मूळडोंगरी तांडा (पांढरावड वस्ती) येथील गोरगरीब महिला व शेतमजूर यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
          यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, समता परिषद तालुकाध्यक्ष अशोक पाटील, समता परिषद शहराध्यक्ष शिवा सोनवणे, समता परिषद शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, रा. काँ. सामाजिक न्याय विभाग राजेंद्र लाठे, नगरसेवक वाल्मिक टिळेकर,सोजरा चव्हाण, वैशाली चव्हाण , शोभा चव्हाण, जनाबाई चव्हाण, छकुली चव्हाण ,वैशाली चव्हाण, गिता चव्हाण, ज्योती चव्हाण  वनिता राठोड , अंजना चव्हाण ,सुरेखा चव्हाण, सुनिता चव्हाण, मनीषा चव्हाण, शालू चव्हाण, मोनाली चव्हाण, योजना चव्हाण , वसुनंदा चव्हाण, अनिता चव्हाण, प्रतिभा चव्हाण , वैशाली चव्हाण, सुनिता चव्हाण, सिंधुबाई चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...