Tuesday, February 28, 2023

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा, विद्यार्थ्यांनी सादर केले विविध विज्ञानाचे प्रयोग प्रदर्शन,




 नांदगाव( प्रतिनिधी) -  विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी नांदगाव शहरातील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून खुशबू खेमणार व भावना आबड (विद्यार्थी पालक) म्हणून उपस्थित होत्या. यांच्या हातून विज्ञान प्रदर्शन हाॅलची रिबीन कट करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विज्ञान शिक्षिका  मोहिनी देसले यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या संशोधकांविषयी माहिती दिली.या दिवशी विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन ,चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिके ,प्रश्नमंजुषा यांसारखे बरेच उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. विद्यार्थ्यांचे प्रयोग प्रात्यक्षिके बघण्यासाठी पालकही उपस्थित होते.
विद्यालयातील प्राचार्य  मणी चावला सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक यांनी मिळून यशस्वी रित्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा पार पाडला . सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन  सुनिलकुमार कासलीवाल , संस्थेचे सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल, प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पिंपरखेड येथे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती व मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा,



पिंपरखेड , नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे सोमवारी दि. २७ फेब्रुवारी  रोजी विद्यालयात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त 'कवितांचा जागर' हा कवितांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून कवीवर्य दयाराम गिलाणकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  काशिनाथ गवळी सर होते.
   प्रसंगी विद्येची देवता सरस्वतीच्या व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले होते. पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कवीवर्य दयाराम गिलाणकर सर यांनी त्यांचे बळीचं जिनं व सप्तरंगी एकांकिकेच्या दोन दोन प्रती विद्यालयास भेट म्हणून दिल्या.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कैलास पठाडे यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष  काशिनाथ गवळी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
  भाषा हे विचार अभिव्यक्तीचे साधन असते. भाषा नसती तर आपल्याला आपले विचार मांडता आले नसते. भाषेमुळे उत्तम प्रकारे संवाद साधला जातो. आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो याचा आपल्याला सदैव अभिमान वाटला पाहिजे. मराठी ही खूप शालिन भाषा आहे त्यामुळे विसंवाद होत नाही. आपले विचार समृद्ध करण्यासाठी पाठ्यपुस्तकांव्यतीरिक्त इतर उत्तमोत्तम व दर्जेदार आणि संस्कारक्षम साहित्य वाचले पाहिजे असे मत कवीवर्य दयाराम गिलाणकर यांनी मांडले. तसेच कवीवर्य दयाराम गिलाणकर सर व मुख्याध्यापक कवीवर्य, गझलकार काशिनाथ गवळी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम, संस्कारक्षम व भावस्पर्शी कविता म्हणून दाखवल्या. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात या कवितांना प्रतिसाद दिला. शेवटी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या 'कणा' या कवितेचे सादरीकरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 
    विद्यालयाचे कला शिक्षक  लक्ष्मण जाधव यांचे फलकलेखन व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख  संजय कांदळकर यांचे योग्य आयोजन नियोजन  खूप आवडल्याचे प्रमुख पाहुणे कवीवर्य दयाराम गिलाणकर यांनी आवर्जून सांगितले. अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यालयात नियमितपणे घेतले जावेत त्यामुळे विद्यार्थ्यांना महान व्यक्तींचा परीचय होईल त्यांच्या जाणिवा समृद्ध व प्रगल्भ होत जातील अशी भावना शिक्षकांनी बोलून दाखवली. 
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक  गोकुळ बोरसे,  संजय कांदळकर,  कैलास पठाडे,  लक्ष्मण जाधव , उत्तम सोनवणे,  संदीप मवाळ,  आबा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संजय कांदळकर यांनी व आभार  उत्तम सोनवणे यांनी मानले.

Monday, February 27, 2023

व्ही.जे.हायस्कुलचा सार्थक देवरे जिल्ह्यात “रीड टू मी” क्रीएटिव्ह चॅम्पियन स्पर्धेत प्रथम,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. जे.हायस्कुलचा विद्यार्थी सार्थक देवरे यांनी रीड टू मी या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र शासन आणि इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि आकलन कौशल्य सुधारण्यासाठी राज्यात शासनाच्या शाळांमध्ये ' रीडटूमी' या अँपचा वापर केला जातो.   उपक्रमाअंतर्गत इयत्ता ६वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ' रीडटूमी ' चा वापर करून, वर्गात शिकवलेल्या इंग्रजी पाठाची उजळणी विद्यार्थी कशाप्रकारे करतात यावर एक सारांशरूपी व्हिडीओ बनवायचा होता. नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 
     या स्पर्धेमध्ये व्ही.जे.हायस्कुल,नांदगाव शाळेतील इयत्ता इयत्ता सातवी चा विद्यार्थी सार्थक श्रीकांत देवरे या विद्यार्थ्याला जिल्ह्यात प्रथम पारितोषिक मिळाले.त्याबद्दल त्याला गोल्ड मिडल व प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बडगुजर व पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी रीड टू मी चे प्रतिनिधी विशाल गलाटे, पंचायत समिती शिक्षण विभागाचे योगेश फटांगरे त्या विद्यार्थांचे वडील डॉ.श्रीकांत देवरे उपस्थित होते.या विद्यार्थाला अनिल तांबेकर यांनी मार्गदर्शन केले.या विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल संकुल प्रमुख संजीव धामणे, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे व शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी यांनी त्याचे कौतुक केले .

Saturday, February 25, 2023

ग्रामपंचायत संगणक परिचालक २७ फेब्रुवारी पासून कामबंद ठेऊन बेमुदत संपावर जाणार ,



नांदगाव( प्रतिनिधी ) -  ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून ११ वर्ष प्रामाणिक काम केलं आहे. संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना करत आहे. याच मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणकपरिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संप करणार असून १ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.
           याबाबत सविस्तर वृत्त की, संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत.परंतु शासनाने संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.आपले सरकार प्रकल्पात काम करणार्याि संगणकपरिचालकांवर नेहमी अन्याय करण्यात आलेला असून ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६००० रूपये मानधनात १००० रुपये वाढ केली.आज महागाईच्या काळात ७००० रूपयाच्या मासिक मानधनात संगणकपरिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही.
     याआधी नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संघटनेच्या वतीने २७ व २८ डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी ग्रामविकासमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या मागणीनुसार शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला . सदरची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय बैठकीत झाला, सध्या ग्रामविकास विभागाने वित्त विभागास सुधारित आकृतीबंधाची फाईल पाठवली आहे. परंतु त्यावर निर्णय होऊन निधीची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी या प्रमुख मागणीसाठी २७ फेब्रुवारी २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप करण्यात येणार असून ०१ मार्च २०२३ रोजी राज्यातील संगणकपरिचालक हजारोंच्या संख्येने मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती व नांदगाव तालुका पूर्ण तकदी निशी मोर्चाला उपस्थित राहील असे सांगितले. नांदगाव मतदार संघाचे  आमदार सुहास आण्णा कांदे व नांदगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी व इतर पद अधिकारी यांना कामबंद व धरणे आंदोलनाचे निवेदन देण्यात आले .निवेदन देताना नांदगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ उरकुडे , तालुकासचिव श्रीकांत (नाना) जगताप , तालुका उपाध्यक्ष अरुण जाधव व इतर सदस्य उपस्थित होते . मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे नांदगाव तालुकासचिव श्रीकांत (नाना)जगताप यांनी दिली.  नांदगाव तालुका संपूर्ण ताकदीनिशी   मोर्चाला उपस्थित   राहील असे सांगितले.

Friday, February 24, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांतून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करण्यास मान्यता, फळझाडांची लागवड क्षेत्र वाढण्यास होणार मदत ,




  नांदगाव  ( प्रतिनिधी) -   कृषी विभागाचे प्रक्षेत्रावर शासकीय फळ रोपवाटिका प्रस्तावित करण्यासाठी  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कडून पाठपुरावा करण्यात आला होता.फळ रोपवाटिका क्षेत्र मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना आंबा कलमे , डाळिंब कलमे इत्यादी फळझाडांचे कलमे रोपे उपलब्ध होणार असून यासाठी आता तालुका किंवा जिल्हा बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. शिवाय फळझाडांची लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. 
   भविष्यात शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण, शेती प्रशिक्षण गृह प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय पद्धतीने उत्पादन वाढ करण्यासाठी मदत  होईल . नांदगाव  तालुका बीज गुणन केंद्र  या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे मान्यता मिळणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागा कडून शासन निर्णय काढण्यात आला आहे.
   नांदगाव तालुका बीज गुनन केंद्र  या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांच्याकडून प्राप्त झाला आहे . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड विषयाचा आढावा घेताना कलमी रोपे उपलब्ध न झाल्यामुळे प्रशासकीय मान्यता दिलेल्या क्षेत्रांपैकी कमी क्षेत्राची लागवड झाल्याचे दिसून आले आहे . त्याकरिता भविष्यात कलमे रोपांची उपलब्धता होण्यासाठी तालुका बीजगुणन केंद्र नांदगाव येथील प्रक्षेत्राचे रोपवाटिकेत रूपांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली आहे.

Wednesday, February 22, 2023

सोलो डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर, शाळेतील ११० स्पर्धकांचा सहभाग,



नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल  आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूलची सोलो डान्स स्पर्धा यशस्वीरित्या घेण्यात आली .          
     विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,  उपाध्यक्ष सरिता बागुल, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका खांडेकर , रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व पर्यवेक्षक म्हणून शिवानी गांधी या लाभल्या होत्या. त्यांनी आपल्या छोट्याशा नृत्य सादरीकरणातून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
 या स्पर्धेमध्ये एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये एका विशिष्ट प्रकारचे नियमावली ठरवण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांना एका मर्यादित वेळेत आपले नृत्य सादर करावयाचे होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे वयोगटाुसार ग्रुप तयार करण्यात आलेले होते . या ग्रुपला अनुक्रमे ग्रुप ए,ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी..... ही नावे देण्यात आलेली होती. यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले आणि प्रत्येक ग्रुप मधून विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात पालकांनी प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका पिलके व नेहा यांनी केले.
     आज या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले.  ही स्पर्धा उत्तमरीत्या घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.

Tuesday, February 21, 2023

नांदगाव नगरपरिषद येथे अंजुमताई सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध अभियाना अंतर्गत गुणगौरव सोहळा ,


नांदगाव (प्रतिनिधी )  - नांदगाव येथे आज मंगळवारी २१ फेब्रुवारी  रोजी नांदगाव नगरपरिषद  महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत स्वच्छ भारत अभियान २०२३ माझी वसुंधरा ३.० व लोकशाही पंधरवाडा इ. शासनाच्या विविध अभियानाच्या माध्यमातून नांदगाव शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व बचत गटातील महिलांसाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध,व संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या केंद्रशासन पुरस्कृत उपक्रमांतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरि उपजीविका अभियान नांदगाव नगरपरिषद अंतर्गत गंगेश्वर महिला बचत गट व सिद्धेश महिला बचत गट यांना प्रत्येकी चार लाख रुपये अर्थसाह्याचा धनादेश कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. राजश्री राजेंद्र बेलदार (अध्यक्ष स्त्रीशक्ती शहर संघ) , शबाना मंसुरी (सचिव स्त्रीशक्ती शहर संघ), अलका दिलीप गायकवाड (अध्यक्ष एकविरा वस्ती संघ), रत्ना वाबळे (सदस्य नीलंबरी वस्ती स्तर संघ), कोमल भालेकर (सदस्य ज्ञानज्योती वस्ती स्तर संघ) , बेबीनंदा मोरे (निर्मिती वस्ती स्तर संघ) यांची माझी वसुंधरा 3.0 व स्वच्छ भारत अभियान २०२३ अंतर्गत नांदगाव शहराचे ब्रँड अँम्बेसिडर  म्हणून नियुक्ती केल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक, नांदगाव नगरपरिषद विवेक धांडे यांनी घोषित केले व अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 
            विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी वेळोवेळी अशा स्पर्धा घेतल्या पाहिजेत ज्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता येईल . यासाठी वेगवेगळ्या विषयांवर नियमितपणे स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. तसेच बचत गटांसाठी ४२ नवीन उद्योग व त्या उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण लवकरच सुरु करणार असल्याचे आणि महिला बचत गटांसाठी महिला बँक सुरु करणार असल्याचे अंजुमताई कांदे यांनी सांगितले. नगरपरिषद अंतर्गत रविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम व अभियान या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक वापरावर बंदी,आणि वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी व या अभियानाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पुढेही निरंतर असे अधिका अधिक उपक्रम सुरु राहतील असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी केले.
  या  कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व व्ही.जे.हायस्कूलचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजीव धामणे, व्ही.जे. हायस्कूलचे मुख्याध्यापक  बडगुजर सर, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, शिक्षण मंडळाचे लिपिक अनिल पाटील, विजया धनवट , नांदगाव नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे यांनी केले. तर आभार नगरपरिषद शिक्षण मंडळाचे शाळा क्रमांक सहा चे मुख्याध्यापक शहीद शेख यांनी केले.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...