Friday, December 8, 2023

नांदगाव शहरवासीयांचा पाणीप्रश्न सुटणार !! स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश जाहीर, नवीन जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र उभारणार,




नांदगाव (प्रतिनिधी ) -    गिरणा धरण उदभव ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश जाहीर करण्यात आले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वप्नातील नांदगाव शहरा करिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश नांदगाव नगर परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. नांदगाव नगर परिषदेचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. यात एकूण ५०  कोटी रुपये निधी मंजूर असलेल्या या योजनेअंतर्गत नांदगाव शहरात नविन जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र ही उभारण्यात येणार असुन, शहराची २०४१ पर्यंत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेवून योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
    नांदगाव च्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद देऊन मला आमदार केले असल्याने त्यांच्या प्रमुख अडचणी दूर करणार असल्याचे आश्वासन प्रत्येक वेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिले.  त्यादृष्टीने प्रयत्न करत नांदगाव शहराचा मुख्य पाणी प्रश्न सोडवण्याच्या दिशेने मोठा टप्पा पार केला आहे. नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना प्रस्तावित करून सरकारकडून ती मंजूर करून घेतली असुन  कार्यारंभ आदेशही प्राप्त झाले आहेत.
नांदगावकर माता भगिनी व व्यापारी बांधवांना ही मोठी आनंदाची बातमी आहे, कारण पंधरा ते वीस दिवस नांदगाव शहरात पाणी येत नसल्याने महिला वर्गाची मोठी अडचण होत होती. तसेच लहान - मोठ्या व्यापाऱ्यांना पाण्याची गरज लक्षात घेता या योजनेमुळे शहरातील या अनेक समस्या सुटणार असून शहराच्या विकासाला देखिल चालना मिळणार आहे.





Thursday, December 7, 2023

नांदगावच्या मविप्र महाविद्यालयातील संघाने सांघिक खेळाच्या जोरावर कॉर्फबॉल क्रीडा स्पर्धेत पटकावले विजेतेपद,






नांदगाव ( प्रतिनिधी ) -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ, पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा विभाग समिती, नाशिक तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या  वतीने आयोजित कॉर्फबॉल मुले - मुली या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन बुधवारी दि. ६ डिसेंबर  रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकूण नऊ संघांनी सहभाग नोंदविलेला होता.  नांदगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत संघाने अंतिम सामना जिंकून नाशिक जिल्हा आंतर महाविद्यालयीन कॉर्फबॉल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी मिळवले आहे.
       नांदगाव महाविद्यालयाने प्रथम फेरीत सी.बी.सी महाविद्यालय, द्वितीय फेरीत के. टी.एच. एम. महाविद्यालय तर अंतिम सामन्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संघांना पराभूत करून विजेते पदाचा मान मिळवला. या  नांदगाव महाविद्यालयाच्या  संघातील मुलांमध्ये ( खेळाडू ) - डोळे कैलास, कार्तिक औशिकर, निखिल औशिकर, गणेश आहेर, गणेश महाले, बाजीराव कासार, युवराज दूंदे तर मुलींमध्ये ( खेळाडू )कोमल बच्छाव, अश्विनी एरम, अश्विनी औशिकर, जागृती सोनवणे, प्राची सोर यांचा सहभाग होता. या यशस्वी विद्यार्थिनीचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन  ठाकरे, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगावचे संचालक अमित  बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना खेळाचे योग्य व तांत्रिक मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लोकेश गळदगे व कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य दयाराम राठोड यांचे सहकार्य लाभले.

शिवसेना ्उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख मागण्यांसाठी बसलेल्या महिलांच्या उपोषणाला पाठिंबा,





नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील पोलिस स्टेशनजवळ प्रमुख  मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत येथेच ठिय्या मांडून उपोषण सुरू असणार आहे अशी भूमिका उपोषणकर्त्या महिलांनी घेतली आहे . या उपोषणाला विविध पक्ष, संघटना पाठिंबा देत आहे . काल  गुरुवारी ठाकरे गटाने येथे येऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.  शालेय पोषण आहार योजनेतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प पगार वाढवून मिळावा व इतर मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या महिलांना उपोषणस्थळी जाऊन नांदगाव तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक , तालुका प्रमुख संतोष अण्णा गुप्ता , उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिबा देण्यात आला. 

Wednesday, December 6, 2023

भाजप व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नांदगावचे दत्तराज छाजेड यांची नियुक्ती,






नांदगाव ( प्रतिनिधी ) - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी  उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नांदगाव येथील दत्तराज छाजेड यांची निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांचे मार्गदर्शनात व्यापारी आघाडीचे प्रदेश  प्रमूख वीरेंद्र कूकरेजा यांनी त्यांच्या नावांची नियुक्ती जाहीर केली.  छाजेड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणा पासून स्वयंसेवक आहेत.   गत २५ वर्षांपासून  संघटनेत सातत्याने विविध पदावर कार्यरत आहेत.   दोन टर्म नांदगाव तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असताना लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद ,पंचायत समिती या निवडणुकीत पक्षाला चांगले मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचे  मोठे योगदान आहे.  सामाजिक संस्था संस्कृती रक्षक केंद्राची स्थापना करून अनेक  सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने  राबविले आहेत.  महाविद्यालयीन जीवनात पुणे विद्यापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्षपद व सिनेट सदस्य पद भूषवले आहे.  भारतीय जैन संघटनेचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष पदावर ही त्यांनी काम केलेले आहे.   व्यापारी आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्षपदावर  कायरत असतांना फेर निवड होवून ही त्यांनी राजीनामा दिला होता. त्या पाठोपाठ  जिल्हाभरात शेकडो  पदाधिकारी यांनी पक्षपदाचा त्याग करून फक्त भाजपा सदस्य  रहाणे पसंत केले होते.  प्रदेश महामंत्री व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विजयराव चोधरी यांनी त्याची दखल घेवून सर्व पदाधिकारी यांचेशी विचार विनिमय मार्गदर्शन करून पुन्हा सर्व पदाधिकारी सक्रीय केले.  त्यांचे निवडी बद्दल भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच एक अभ्यासू   सर्वसमावेशक व लोकप्रिय नेतृत्वाचे या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भारतरत्न डॉ‌. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिलांना मूलभूत अधिकार मिळाले , उपोषणकर्त्या महिलांनी केलं मत व्यक्त,




नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगावच्या जुन्या तहसील कार्यालयाजवळ शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे आमरण उपोषण सुरू आहे .  या महिलांनी आंदोलन स्थळीच  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हाला महिलांना मूलभूत अधिकार मिळाले असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.यावेळीं महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नांदगाव मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन,




नांदगाव (प्रतिनिधी )  - नांदगाव मध्ये भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर आणि तालुका यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन व मेणबत्ती प्रज्वलीत करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम नांदगाव येथील शनी चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
           शहरातील  कार्यक्रमास भा.ज.पाच्या जेष्ठ नेत्या ॲड.जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रशांत खैरनार, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, डॉ. अशोक सदगीर, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, सोमनाथ घोंगाणे, मनोज शर्मा, राजेंद्र गांगुर्डे, भाजपा ग्रामीण च्या अक्षदा  कुलकर्णी, ॲड. मनिषा  पाटील, तारा ताई शर्मा, ज्योतीताई गाडे, ओबीसी शहर अध्यक्ष दिनेश दिंडे, ॲड. उमेश सरोदे, डॉ. बाळासाहेब आहेर, बळवंत शिंदे, रवि सानप, समाज सेवक संजय मोकळ, सुरेश कुमावत, अतुल कुलकर्णी, धम्मवेदी बनकर, शुभम सौंदाणे, सतिष आहिरे, सुरसेसह आदींची उपस्थिती होती.

Tuesday, December 5, 2023

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील यशस्वी खेळाडूचे महाविद्यालयांकडून सत्कार,




नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव मधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींनी राज्यस्तरावर यश संपादन केले. या स्पर्धेत महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या . अकोला येथे ०१ डिसेंबर ते ०३ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत पाच विद्यार्थिनी कॉटर फायनल मध्ये प्रवेश केला. तेथे त्यांचा निसटता पराभव झाला . मात्र एका विद्यार्थिनीची राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. या यशस्वी विद्यार्थिनीचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन  ठाकरे, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगाव चे संचालक अमित भाऊ बोरसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन शिंदे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थिनी खेळाचे योग्य व तांत्रिक मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लोकेश गळदगे व कनिष्ठ महा. उपप्राचार्य  दयाराम राठोड यांचे लाभले.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...