Friday, January 30, 2026

महामार्गावरील स्ट्रीट लाईट चालु करण्यासाठी नांदगाव शहर शिवसेनेतर्फे निवेदन,









नांदगांव ( प्रतिनिधी) - चाळीसगांव - नांदगांव - मनमाड - चांदवड राष्ट्रीय महामार्ग (७५३) या रस्त्यावर नांदगांव शहरालगत फुलेनगर ते गंगाधरी पर्यंत स्ट्रीटलाईट बसविण्यात आले आहे. परंतु सदर स्ट्रीटलाईट अनेक महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. स्ट्रीटलाईट बंद असल्यामुळे रस्त्यावर भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असुन,  वाहन धारकांना अडवून लुटमार केली जात आहे. सदर रस्त्याची कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती (मेंटेनन्स) न करता टोल वसुली मात्र नियमित सुरु असुन वाहनधारकांना वेठीस धरले जात आहे.
    याबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारीं लक्षात घेता आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशान्वये शहर शिवसेना च्या वतीने टोल व्यवस्थापकांची भेट घेत त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली.
     तसेच येत्या दोन ते तिन दिवसात राष्ट्रीय महामार्ग ७५३ या रस्त्यावरील फुलेनगर ते गंगाधरी पर्यंतचे स्ट्रीटलाईट चालू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून पिंपरखेड येथिल टोलनाका बंद करण्यात येईल व होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील अशी तंबी शिवसेना नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना युवासेना पदाधिकारी , मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Monday, January 26, 2026

नांदगाव येथील शाळेत "प्रजासत्ताक दिन" मोठ्या उत्साहात साजरा,





नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव  येथील स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जाधव मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रगीत व ध्वजगीत गायनाने परिसरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते.
   ध्वजारोहणानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात भारतमाता पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे अधीक्षक श्री. भैय्यासाहेब चव्हाण, माता पालक संघ अध्यक्ष श्रीमती जयश्री कुमावत आणि वाहन चालक अध्यक्ष श्री. गणेश सोमासे प्रामुख्याने उपस्थित होते.
वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचे कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार, मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि संविधानाची महती सांगणारा प्रेरणादायी संदेश दिला. याप्रसंगी शाळेच्या 'ज्ञानयात्री' अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सामूहिक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच विविध स्पर्धांमधील यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला. सांस्कृतिक वैभव शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. देशभक्तीपर गीतांवर आधारित या नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन श्री. प्रसाद बुरकूल सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता गोड खाऊ वाटपाने करण्यात आली. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत देखणा व अविस्मरणीय ठरला.

नांदगावच्या न्यू इंग्लिश विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, नृत्य, विद्यार्थ्यांकडून सादरीकरण,





नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव मधील  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र , न्यू इंग्लिश स्कूल, आदर्श प्रा. शाळा, बाह्यरुग्ण रूग्ण कक्ष नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी प्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत केले . भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  २६ जानेवारी १९५० रोजी म्हणजेच आजच्या दिवशी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले.
 आणि भारत एक ' प्रजासत्ताक राष्ट्र ' बनले. आजचा हा दिवस म्हणजे भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक व सर्व महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.सुरुवातीला आरुषी बोरसे हिने उद्देशिकेचे वाचन केले.कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुरावलीत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोपटराव पवार यांच्या हस्ते ' स्काऊट - गाईड ' ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन ( परेड) सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
    उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार व नरेंद्र पाटील यांनी काॅपीमुक्त परिक्षा व साक्षरता शपथ उपस्थितांना दिली.
      याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायत सादर केली. तसेच देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. लेझीम पथकाने ढोल- ताशांच्या गजरात कवायत सादर केली. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील , वाळू बागुल, संजय जाधव, जयश्री बोरसे यांनी मार्गदर्शन केलं.
 मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि अमित बोरसे -पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
  प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
   या कार्यक्रमास विजय काकळीज, अनिल पाटील, पोपटराव पवार, सुनील बोरसे, अशोक जाधव, पुंजाराम जाधव, बाळू कदम, आबासाहेब सोमवंशी, अरविंद बोरसे,राजेश पाटील, संजय कदम, दिलीप गोटे, प्रकाश फणसे,एकनाथ तांबे,शिवाजी जाधव, विजय बागूल, अक्षदा कुलकर्णी, डॉ.प्रज्ञा पगार, श्रीमती चौधरी, विलास देशमुख, नंदू आहेर,प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, अविनाश साळुंके, ज्योती काळे,दिपक चव्हाण, अविनाश शेवाळे, उपस्थित होते.
      हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय भिलोरे व राजेंद्र कदम यांनी केले.

Saturday, January 24, 2026

नांदगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने आठ वर्षीय भावेश भावसार मुलांचा मृत्यू , नगरपरिषद प्रशासनाविरोधात नागरिकांकडून संतप्त भावना!!




नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भावसार या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून , यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाविरोधात नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या महिन्यात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पाच ते सहा बालकांसह एका नगरपालिका कर्मचाऱ्याला चावा घेतला होता. त्यांच्यावर मालेगाव व नाशिक येथे विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. 
   शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणेही मुश्कील झाले असून,  नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 
शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे. सोमवार (दि.२३ जानेवारी) रोजी सायंकाळी एक मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने शहराच्या मध्यवर्ती भागात घराजवळ खेळत असलेले शुतेश खैरनार (८), भावेश दीपक भावसार(८), ईश्वरी दत्तू बाहिकर व इतर दोन लहान मुलांना चावा घेत लचके तोडल्याची घटना घडली होती. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता आवश्यक उपचार उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेर गावी उपचारासाठी पाठविण्यात आले होते. 
  शहरातील भावेश भावसार (८) या मुलावर मालेगाव, चाळीसगाव व नाशिक येथे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्यास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान शनिवार (दि.२४) रोजी पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नगरपरिषद प्रशासनाविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते - इंजि . अमित बोरसे-पाटील , होरायझन ॲकॅडमीत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम !!






नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगावच्या  मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन ॲकॅडमीत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. 'धरोहर हमारी संस्कृती, हमारी सभ्यता ' या कार्यक्रमाचे उद्घाटन मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम रंगतदार सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
      कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मविप्र तालुका संचालक इंजि. अमित बोरसे पाटील मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.कैलास शिंदे नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर,होरायझन ॲकॅडमी नांदगाव शाळेचा प्राचार्या पुनम मढे, समाजसेविका रोहिणी मोरे ज्येष्ठ सभासद बाळासाहेब कवडे,रामनाथ गायकवाड, सुनील बोरसे, विजय काकळीज ,रविंद्र कवडे, वाल्मीक थेटे ,गंगाधर थेटे, भावेश पाटील ,कुणाल देशमुख, अरविंद पाटील, रमेश बोरसे,अशोक पाटील, सुसेन आहेर,डॉ.गणेश चव्हाण, पत्रकार बांधव आदी मंचावर उपस्थित होते.
     याप्रसंगी नांदगाव तालुका संचालक इंजि.बोरसे-पाटील म्हणाले की होरायझन अकॅडमी शाळेने 'धरोहर हमारी संस्कृती, हमारी सभ्यता' या सांस्कृतिक कार्यक्रमातून एक प्रेरणादायक कार्यक्रमाचे आयोजन केले . त्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले. तसेच प्राचार्या पुनम मढे यांनी प्रास्ताविक केले तर मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.कैलास शिंदे, डॉ.गणेश चव्हाण,दादाभाऊ राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
      त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, गणेश वंदना राजस्थानी गीत, कोळी गीत, बॉलीवूड थीम, गोविंदा, जुबी डुबी, ऑपरेशन सिंदूर ,छावा, तारक मेहता, रामायण, लगान गुजराती नृत्य ,पारिवारिक नृत्य, नारीशक्ती, दशावतार, पर्यावरण वाचवा आधारित सादरीकरणाने प्रेक्षकांची मन जिंकली विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारी नृत्य आणि समाज प्रबोधन करणारी नाट्य प्रयोग विशेष आकर्षण ठरले.
     याप्रसंगी आशिष लोढा राहुल फोफालिया, संजीव धामणे, राजेश पाटील, डॉ.प्रवीण निकम, ॲड. वंदना पाटील, प्रा.सुरेश नारायणे, स्नेहल देशमुख,सिद्धार्थ पवार, विशाल वडगुले बाबासाहेब बोरसे मारुती जगधने, किरण काळे, बाबासाहेब कदम, अनिल आव्हाड, अनिल धामणे, प्रज्ञानंद जाधव, विजय बडोदे, किरण भालेकर, संजय मोरे, महेश पेवाल, महेश पवार, निखिल मोरे, धनराज काकळीज आदी सह सर्व सभासद बांधव पत्रकार बंधू, सर्व क्षेत्रातील मान्यवर ,पालक,मविप्र संचलित सर्व शाखांचे, स्था.व्य.समिती अध्यक्ष, सदस्य सर्व संकुलांचे शाखाप्रमुख शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शरयू आहेर,सिताराम पिंगळे, अनुराधा खांडेकर सिद्धी देशपांडे यांनी केले शेवटी आभार शरयू आहेर यांनी मांडले. वंदे मातरम नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Friday, January 23, 2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून साजरी,






नांदगाव (प्रतिनिधी) -  मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेताजींच्या महान कार्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
      कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती काळे,उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
      इ . ५ वी च्या आराध्या शिंदे या विद्यार्थ्यांनी नेताजींच्या जीवनावर भाषण व लावण्या देशमुख हिने 'वह लहू कहो किस मतलब का जिसमें आता उबाल नहीं ' हि कविता सादर केली.
         पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, " भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती एक शक्ति आहे, हे नेताजींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले."
          याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे सांगितले की, "आजच्या तरुण पिढीला नेताजींचे शिस्तप्रिय जीवन आणि राष्ट्रप्रेम प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता राष्ट्रहित जोपासण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे." या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कवडे यांनी केले.

" ग्रंथ हेच आपले खरे मार्गदर्शक " - मुख्याध्यापिका ज्योती काळे, न्यू इंग्लिश शाळेत भव्य दिंडी सोहळा संपन्न !!






 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील  मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त  अत्यंत उत्साही वातावरणात 'ग्रंथ दिंडी' सोहळा संपन्न झाला. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि वाचन संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब कवडे यांच्या प्रास्ताविकातून झाली. 
 विद्यालयाचे उमेश पगार, सुनिता पगार या दाम्पत्याने तसेच मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाली. 
           ज्ञानेश्वरी, गाथा आणि आधुनिक मराठी साहित्यातील श्रेष्ठ ग्रंथांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या गीताने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि मराठीमय झाले होते.
               ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी हातात मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे फलक धरले होते."मराठी पाऊल पडते पुढे!" "ग्रंथ हेच गुरु!"
  "मराठी भाषा, महाराष्ट्राची शान!" अशा घोषणांनी परिसरातील रस्ते दुमदुमून गेले. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
          दिंडीचा समारोप विद्यालयाच्या प्रांगणात झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास आणि साहित्याचे महत्त्व पटवून दिले. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक पान मराठी साहित्य वाचण्याची आणि मराठी भाषेतूनच संवाद साधण्याची प्रतिज्ञा घेतली.
       मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "ग्रंथ हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत. वाचन संस्कृती लोप पावत असताना अशा उपक्रमांमुळे नवीन पिढी पुन्हा पुस्तकांकडे वळेल."
       या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल अभिमान आणि वाचनाची गोडी द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.
  या कार्यक्रमास वारकरी शिक्षण संस्थेचे नंदू महाराज यांच्ये सहकार्य लाभले.
     हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील अशोक मार्कंड, बाळासाहेब कवडे,रवी कवडे, स्मिता केदारे, देविका चोळके तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता केदारे याने केले, तर आभार अशोक मार्कंड यांनी मानले.

Wednesday, January 21, 2026

न्यू इंग्लिश विद्यालयात 'कॉपीमुक्त परीक्षा अभियान सप्ताह' , विद्यार्थ्यांना देण्यात आली सामुहिक शपथ !







नांदगाव (प्रतिनिधी)  - विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी आणि परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'कॉपीमुक्त परीक्षा' अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना 'कॉपीमुक्ती'ची सामूहिक शपथ देण्यात आली.
       परिपाठाच्या वेळी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कॉपीचे दुष्परिणाम आणि प्रामाणिक अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले. 
    क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना , "मी परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबणार नाही, मी कोणाचीही मदत घेणार नाही किंवा कोणाला मदत करणार नाही. मी माझ्या कष्टावर आणि कतृत्वावर विश्वास ठेवून पूर्ण प्रामाणिकपणे परीक्षा देईन," अशी सामूहिक शपथ दिली.
         विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे महत्त्वाचे नसून, मिळवलेले ज्ञान शुद्ध असावे, या उद्देशाने घेतलेल्या या शपथमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.                      
             यावेळी बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे म्हणाल्या की, "कॉपीमुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक नुकसान होते आणि आत्मविश्वास डगमगतो. हे अभियान केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता ती एक जीवनशैली बनावी, हा आमचा प्रयत्न आहे."
      हा अभियान   दि.  १९ जानेवारी ते २६ जानेवारी 'कॉपीमुक्त परीक्षा अभियान सप्ताह' राबविण्यात येणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा अनावश्यक ताण कमी होण्यास , परीक्षेची भिती नष्ट करण्यास मदत होईल व विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



नांदगाव नगरपरिषदेच्या दालनात जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावणा-या एजन्‍सी तसेच सामाजिक संस्था यांच्या उपस्थित बैठक,





नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव नगरपरिषदेचे नगराध्‍यक्ष सागर हिरे व मुख्‍याधिकारी शामकांत जाधव यांनी  नांदगाव नगरपरिषद हद्दीत बेशिस्‍त पणे व रहदारीस अडथळा ठरणात-या जाहीराती, पोस्टर, बॅनर, होडींग लावल्‍या जावू नये यासाठी नगराध्‍यक्ष यांचे दालनात जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावणा-या एजन्‍सी तसेच सामाजिक संस्था यांचे उपस्थित बैठक घेण्यात आली. मुख्‍याधिकारी यांनी उपस्थितांना मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचे PIL १५५ अंतर्गत वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार बेकायदा अनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग नुसार शहर विद्रुपीकरण करण्यात येईल अशा बेकायदा अनधिकृत जाहिराती पोस्टर बॅनर, होर्डिंग उभारण्यास सक्‍त मनाई असल्‍याचे उपस्थितांना सांगितले . तसेच नांदगाव नगरपरिषद कार्यालयाकडून जाहीराती, पोस्टर, बॅनर, होडींग लावण्या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र मिळणे, जाहिरातीसाठी अधिकृत ठिकाण, दर निश्चिती व विहित कार्यपद्धती निर्धारित करणेत आलेली आहे. तसेच जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग ची परवानगी कामी नोडल अधिकारी, व्हॉटसअप नंबर खालील प्रमाणे प्रसिध्द करणेत आले आहे. नोडल अधिकारी- दिपक वाघमारे (लिपीक, नांदगाव नगरपरिष्द) व्हॉटसअप नंबर /मोबाईल नंबर ९८९०५८३०५१, तसेच ०२५५२-२४२२३८ नांदगाव पोलिस ठाणे प्रतिनिधी दत्ता सोनवणे (मोबाईल नंबर ७६६६५४९४६१) असे तक्रारीसाठी संपर्क नंबर देणेत आलेले आहे अशी माहिती दिली. 
    नगराध्‍यक्ष.सागर हिरे यांनी सर्व सामान्‍य नांदगावकरांना रहदारीस अडथळा होणार नाही यास प्राधान्‍य राहील . तसेच जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावतांना नगरपरिषद व शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे असे आव्हान उपस्थितांना केले. तसेच कोणीही बेकायदेशिर अनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग नुसार अथवा शहर विद्रुपीकरण होईल असे कृत्‍य करणा-या एजन्‍सी तसेच सामाजिक संस्था यांचे विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे सुचित करण्यात आले.

Tuesday, January 20, 2026

नवीन पिढीने मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्याची सवय लावून घ्यावी - साहित्यिक, प्रतिभाताई खैरनार,







नांदगाव( प्रतिनिधी) - मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन: काळाची गरज' या विषयावर व्याख्यानाचे ' मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त आयोजन करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात कवी विष्णू वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली . प्रमुख वक्त्या , साहित्यिक , प्रतिभाताई खैरनार यांना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे, जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड आणि शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते. साहित्यिक प्रतिभाताई खैरनार यांचा परिचय उपशिक्षक बाळासाहेब कवडे यांनी करून दिला.
    कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रतिभाताई खैरनार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व वाढत असताना आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करत आहोत, ही चिंतेची बाब आहे.मराठी टिकवायची असेल, तर तिचा वापर केवळ साहित्यात न राहता दैनंदिन व्यवहारात, तंत्रज्ञानात आणि प्रशासनात अभिमानाने व्हायला हवा.
     नवीन पिढीने मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्याची सवय लावून घ्यावी, जेणेकरून भाषेतील शब्दसंपदा समृद्ध होईल. मुलांशी घरात मराठीत बोलणे आणि त्यांना मराठी संस्कृतीची ओळख करून देणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे हे सांगितले.
       मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. 
     मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे साधन नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे, असा सूर कार्यक्रमातून उमटला.
     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील अशोक मार्कंड, रवी कवडे, बाळासाहेब कवडे, स्मिता केदारे, देविका चोळके तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता केदारे यांनी तर आभार रवी कवडे यांनी मानले. 
      


नांदगाव येथे 'महिला सप्तशक्ती संगम मेळावा' नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात,





नांदगाव ( प्रतिनिधी)  - नांदगाव येथील स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिरमध्ये 'महिला सप्तशक्ती संगम मेळावा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. 
 विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  अध्यक्षस्थानी रुपाली श्रीकांत तुसे होत्या. तसेच प्रमुख व्याख्यात्या म्हणून झोडगेकर उपस्थित होत्या. त्यांनी कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरणाबाबत भारतीय दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले. माता पालक संघ उपाध्यक्षा व सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.संस्कृत वंदना कुलथे मिरा कायस्थ यांनी सादर केले.अतिथी परिचय व स्वागत खरोटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बाळासाहेब जाधव यांनी केले. "हम ही मातृशक्ती है" हे गटगीत कुलथे चव्हाण खरोटे पाटील यांनी सादर केले.  या गीतास हार्मोनियम साथ मुळे सरांनी केली. व्याख्यान वर आधारित प्रश्नमंजुषा रोकडे बाविस्कर मॅडम यांनी घेतली विजयी महिलांना लगेच बक्षीस दिले. शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा मध्ये जिजामाता, अहिल्याबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, डॉ.वकील, क्रिकेटीयर, व्योमिका सिंग,आई भूमिका सादरीकरण सुंदरतेने केले. तर मार्गदर्शन शेवरे यांनी केले.विशेष मातांचा सन्मान करण्यात आला.  त्यात पोलीस कॉन्स्टेबल घुगे इंगळे तसेच समाज प्रबोधनकार सौ.चव्हाण सौ.दौंड यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपले अनुभव कथन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा तुसे यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून नाविन्यपूर्ण उपक्रमांची वाखणणी केली आभार जयश्री यांनी मानले शाळेच्या मुख्या.सौ. जाधव यांनी प्रतिज्ञा/ संकल्प घेतली सर्व मातांनी प्रतिज्ञा म्हणून संकल्प केला. हळदी कुंकू वाण देऊन कार्यक्रमांची सांगता झाली.सूत्रसंचालन श्रीमती आशा सोनवणे शेवरे यांनी केले.कार्यक्रमांस बालमंदिर सह शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Thursday, January 15, 2026

न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात " मांजा प्रतिबंध" शपथविधी सोहळा, शाळेतील विद्यार्थ्यांनी नोंदवला मोठा सहभाग !







नांदगाव ( प्रतिनिधी)  -  नाशिक मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल , नांदगाव विद्यालयात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचा आनंद लुटताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी घालण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विशेष 'मांजा प्रतिबंध' शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन किंवा चिनी मांजा केवळ पक्ष्यांसाठीच नव्हे, तर मानवी जीवनासाठीही अत्यंत घातक ठरत आहे. या मांजामुळे दरवर्षी अनेक निष्पाप पक्ष्यांचा मृत्यू होतो आणि नागरिकही जखमी होतात. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
            शाळेच्या प्रांगणात उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे,सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी एकत्र जमले होते. "मी पतंग उडवण्यासाठी कधीही नायलॉन किंवा काचयुक्त मांजाचा वापर करणार नाही, तसेच इतरांनाही त्यापासून परावृत्त करेन. मुक्या पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे," अशी सामूहिक शपथ यावेळी उपशिक्षक वासुदेव कवडे यांनी सर्वांनी दिली.
         याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे सांगितले की, "सण हा आनंद साजरा करण्यासाठी असतो, कोणाचा जीव घेण्यासाठी नाही. विद्यार्थ्यांनी 'सृष्टीचा मित्र' बनून सण साजरा करावा." विज्ञान शिक्षकांनी नायलॉन मांजा निसर्गात विघटित होत नसल्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान स्पष्ट केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाली असून, "आम्ही फक्त सुती दोरा (साधी मांजा) वापरूनच पतंग उडवू," असा निश्चय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.,

Tuesday, January 13, 2026

वाखारीे येथे एन.एस.एस. श्रमसंस्कार शिबिरात ‘एकात्म मानवतावाद’ यावर मार्गदर्शन,





वाखारी (ता.नांदगाव) - एकात्म मानवतावाद ही संकल्पना माणसाच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी असून माणूस हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही स्तरांचा समतोल विकास साधतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने एकात्म मानवतावाद साकारतो, असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले.
नांदगाव महाविद्यालयाच्या वतीने वाखारी येथे आयोजित हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात ‘एकात्म मानवतावाद’ या विषयावर ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ही संकल्पना प्रथम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली असून ती केवळ पुस्तकात वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात अनुभवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरातून घडणारा स्वयंसेवक संवेदनशील, जबाबदार व सेवाभावी वृत्तीने समाजात कार्यरत राहिला, तर समाजविकासाला निश्चितच चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेवा हीच साधना, समाज हाच देव आणि माणूस हाच केंद्रबिंदू मानून कार्य करा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
    “मी जिथे जाईन तिथे समरसता नेईन आणि मी जे करीन ते समाजहितासाठी करीन,” असा संकल्प शिबिरार्थींना यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिबिरप्रमुख प्रा. अहिरे यांनी प्रा. सुरेश नारायणे यांचे स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ए. मराठे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक व मान्यवरांनी शिबिराला भेट दिली. दुसऱ्या बौद्धिक सत्रात महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. एम. बी. अटोळे यांनी स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्याध्यापक प्रशांत जयसिंग आहिरे, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. डी. ठाकरे, प्राध्यापकवृंद, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.

नांदगाव नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी राजेश शिंदे तर स्वीकृत नगरसेवक भाजपचे दत्तराज छाजेड यांची निवड,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद मध्ये पहिल्‍याच सर्वसाधारण सभेत नांदगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजेश भागवत शिंदे यांची बिनविरोध निवड आली. तसेच नगरपरिषदेच्‍या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे दत्तराज रमणलाल छाजेड यांची निवड करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात मंगळवारी दि. १३ रोजी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर मदनराव हिरे यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव नगरपरिषदेच्‍या सभाग्रहात पार पडली. या निवडणुक करीता उपनगराध्यक्ष नामनिर्देशन करीता सुचक  म्हणून  शेख सईद रशिद तर अनुमोदम बाळासाहेब गोपाळा शेवरे हे होते. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी विहित वेळेत राजेश शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने व सदरचा अर्ज पडताळणी अंती वैध ठरल्याने उपनगराध्यक्षपदी राजेश शिंदे हे निवडून आल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सागर हिरे यांनी जाहीर केले. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी दत्तराज रमणलाल छाजेड यांची निवड करण्यात आली. या सभेस नगरपरिषदेच्‍या शिवसेना पक्षाच्‍या गट नेत्‍या स्‍वाती अमोल नांवदर व नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्‍य उपस्थित होते. निवडणुकीचे कामकाज मुख्याधिकारी शामकात जाधव यांच्या समवेत प्रशासन अधिकारी हर्षदा राजपूत, नगरपरिषदेचे वरिष्‍ठ लिपीक विजय कायस्थ, अंबादास सानप, बाबासाहेब शिंदे , अरुण निकम, वाघमारे, देवकर, जाधव , सुनिल पवार सर्व खात्याचे प्रमुख, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे यांनी केले.

Monday, January 12, 2026

नांदगाव येथील होरायझन अकॅडमीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी,








नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडमी शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती.पुनम डी मढे होत्या.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या श्रीमती. पुनम डी. मढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरयू आहेर,सोनाली खैरनार मंच वर उपस्थित होत्या शालेय विद्यार्थी यांनी जयंती प्रसंगी मनोगत मांडले. अध्यक्षीय भाषणात शालेय प्राचार्या यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊंचे शिवरायांच्या घडणीतील योगदान तसेच स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठीचे विचार यांचे महत्त्व विशद केले. तसेच युवा पिढी चांगली घडावी म्हणून आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा. तसेच प्रेरणादायी विचारांचे वाचन करण्यात आले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” या स्वामी विवेकानंदांच्या संदेशाचा उपस्थितांनी संकल्प केला.
     या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रात बालविवाह प्रथा मुक्त व्हावी म्हणून बालविवाह प्रतिबंध विषयी प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाचे नियोजन शालिनी गोयल,सूत्रसंचालन प्राप्ती गायकवाड,समृध्दी थोरात यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

न्यू इंग्लिश शाळेत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी,






नांदगाव (प्रतिनिधी)  - नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व महानविचारक स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला " जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची पर्वा " हे गीत काव्यांजली देशमुख व श्रावणी काकड यांनी सादर केले.त्यांना संगीतसाद कल्पना आहिरे यांनी दिली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा धारण केली .   या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
        उपशिक्षिका स्मिता केदारे यांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊंनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर एक स्वराज्य घडविण्याचा विचार या मातीत रुजवला. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केली. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्या स्वतःच न्यायनिवाडा करत असत. माॅंसाहेब जिजाऊ स्त्री शक्तीचे प्रतीक, एक सक्षम मार्गदर्शक होत्या हे सांगितले.
      उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारत सरकारने १९८४ पासून १२ जाने. हा ' राष्ट्रीय युवा दिन ' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संस्कृती ,अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम यांचा जगात प्रसार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. " शिवभावे जीवसेवा " हा या संस्थेच्या मुख्य उद्देश होता. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर 'माणूस घडवणे' होय. स्वामी विवेकानंद यांनी तरूणांना "जेवढा मोठा संघर्ष असेल, तेवढाच विजय भव्य असेल" असा मोलाचा सल्ला दिला.
   उपशिक्षिका सुनिता जाधव यांनी राजमाता जिजाऊंचे आयुष्यात केवळ इतिहास नसून तो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श आहे. छत्रपती शिवरायांना ज्ञान ,चारित्र्य, चातुर्य संघटन व पराक्रम या सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता! 
    पर्यवेक्षक अविनाश शेवाळे म्हणाले की,स्वामी विवेकानंद यांनी तरूणांना " उठा , जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका,". "जीवनात जोखीम पत्करा , जिंकलात तर नेतृत्व करायला , हारलात तर इतरांना मार्ग दाखवाल". असे प्रतिपादन केले.
         हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.

शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची मोठ्या उत्साहाने जयंती साजरी,



नांदगाव (प्रतिनिधी)  - नांदगाव येथील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे दि. १२. जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला शालेय समितीचे प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील, मुख्याध्यापक शाहीद अख्तर,आयाज गोनडे आणि कल्पना शेवरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्ष संगीता सोनवणे यांनी आपल्या भाषणातुन राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिन्ही महान व्यक्तींच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल मार्गदर्शन केले.सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान आणि भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित करण्यात आली.राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रभक्तीची जडणघडण आणि संस्कार यावर प्रकाश टाकण्यात आला.स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे युवकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगण्यात आले.कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी सचिव आशाबाई काकळीज,सरला मोढे, सुमित्रा शिंदे,शोभा भोसले,वाबळे ताई,रुबिना शेख,आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेट वाटप करण्यात आले .

Saturday, January 3, 2026

न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात" बालिका दिन" , सावित्रीबाई फुले जयंती साजरी,






 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने ' बालिका दिन ' उत्साह साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व उपस्थितांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
       विद्यालयातील इ.५ वी च्या विद्यार्थ्यांनी लावण्या देशमुख हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य व ऋणनिर्देश व्यक्त केले.
       उपशिक्षिका देविका चोळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह १३ वर्षाचा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर सावित्रीबाईंना महात्मा ज्योतिबा फुले यांनी घरीच लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांनी श्री शिक्षिका होण्याचा स्वप्न बाळगून प्रशिक्षण पूर्ण केले. त्या काळी स्त्रियांनी शिकणे हे पाप समजले जाई, तरीही त्यांनी हा मार्ग निवडला.
    महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यात काढली. लोक सावित्रीबाई च्या अंगावर चिखल आणि शेण फेकत. त्यांनी १८५३ मध्ये ' बालहत्या प्रतिबंधक गृह ' सुरू केले. त्यांनी त्याकाळी समाजात असणारा स्पृश्य -अस्पृश्य भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
   सावित्रीबाई उत्तम लेखिका व कवयित्री होत्या. ' काव्यफुले ' हा त्यांच्या पहिला काव्यसंग्रह तर ' जा, शिक्षण घ्या': हा कवितासंग्रह होता. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या मनोगतात स्री शिक्षणाचा जिवनपट कसा सुरू झाला हे समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका स्मिता केदारे तर आभार जया गवळी यांनी मानले.


Thursday, January 1, 2026

नांदगावचा नार - पार नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याची मागणी,






नांदगाव ( प्रतिनिधी)  - बहुप्रतिक्षित नार-पार- गिरणा नदी जोड प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे या योजनेचा मार्ग प्रशस्त झाला असला तरी सदर प्रस्तावित प्रकल्पात सतत अवर्षणग्रस्त व अतीतुटीच्या नांदगाव तालुक्याचा समावेश वगळण्यात आला आहे,ही बाब विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविणे ह्या तत्वालाच छेद देणारी आहे.असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी घेतला असून , नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
      या  प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील कामांत नऊ धरणे प्रस्तावित आहेत.या पाण्याने नाशिक जिल्ह्यातील चार तर जळगाव जिल्ह्यातील सहा असे उत्तर महाराष्ट्रातील १० तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत. नार, पार, औरंगा आणि अंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्यातील अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात आणण्यासाठी नार-पार-गिरणा नदी जोड योजनेची मांडलेली संकल्पना प्रदीर्घ काळानंतर प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. या योजनेला जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटनेने ७५ टक्के विश्वासार्हतेसह(१०.७६ टीएमसी) पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र दिलेले आहे.
     या योजनेंतर्गत नार आणि पार नद्यांमधील १०.७६ टीएमसी म्हणजे तब्बल ३०४.६० दशलक्ष घनमीटर पाणी गिरणा नदीत वळविण्यात येणार आहे. यातील काही पाणी स्थानिकांसाठी आरक्षित असेल.तर उर्वरित साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यास मिळणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे साडेसात हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून यातील पहिल्या टप्प्यातील कामांची ४११६ कोटींची निविदा जलसंपदा विभागाने काढली आहे.
    पहिल्या टप्प्यात उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभूवन, मिलन, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा, देवमाळ या ठिकाणी धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. मानखेड व साळभोया येथे दोन साठवण तलावांमध्ये अतिरिक्त पाणी गोळा करून ते विविध उंचीवर उचलले जाईल. आणि नंतर ३७ किलोमीटर लांबीच्या बोगद्यांमधून पर्वतरांग ओलांडून गुरुत्वाकर्षणाने पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत आणले जाणार आहे. नार-पार- गिरणा नदी जोड प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील कळवण, बागलाण,देवळा आणि मालेगांव तालुक्यांतील काही भाग असे चार आणि जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांना मिळणार आहे. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरणांच्या परिसरातील ७,१७४ हेक्टर, असे एकूण ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने अतिशय महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडवून आणणाऱ्या ह्या योजनेत नांदगावचा समावेश करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे भव्य नागरी सत्कार ,




नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) -  नांदगाव - मांडवड मविप्र संस्थे अंतर्गत कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवडच्या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावत पहिल्याच चषकावर आपले नाव कोरले. या संघात वैजयंती गांगुर्डे (संघनायक) ऋतुजा आहेर,श्वेता गांगुर्डे, पूनम गांगुर्डे,अक्षदा गांगुर्डे, सायली आहेर, निकिता मोकाशे, राणी गुजर, नंदिनी पिंगळे, ऋतिका आहेर, वैष्णवी आहेर या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव मुलांच्या संघाने चौथ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला. या निमित्ताने मांडवड गावातील ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही संघांचा भव्य नागरी सत्कार समारंभ मांडवड विद्यालयात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक इंजि. अमित बोरसे पाटील होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक भदाणे साहेब ,छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम छत्रे हायस्कूल मनमाड चे माजी मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे,शाळेचे स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत आहेर,मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल आहेर, मार्गदर्शक रमेश अण्णा बोरसे, माजी सरपंच चंद्रसेन आबा आहेर , नांदगाव नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता सुयोग पाटील, स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव चे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे,जातेगाव विद्यालयाचे प्राचार्य धुळे शनी मंदिर विश्वस्त उदय पाटील,सुरेश शेळके, किरणं काळे, न्यू इंग्लिश स्कूल उपमुख्यध्यापक चव्हाण हे उपस्थित होते. विजेत्या संघातील खेळाडूंनी मविप्र संस्थेकडून ट्रॉफी व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले यामध्ये मविप्र नांदगाव संचालक अमित बोरसे पाटील यांनी वैयक्तिक २१ हजार रुपये तसेच अशोक निकम यांनी अकरा हजार,सुबोध थेटे पांच हजार, गंगाधर थेटे, पिंगळे डॉ.प्रवीण निकम, अण्णासाहेब गडाख आदींनी विजयी संघाला बक्षीस देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक थेटे एस जी यांनी केले. खेळाडूंनी सातत्य ठेवले तर निश्चित चार-पाच वर्षांमध्ये मांडवड शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकतील अशी अपेक्षा प्रवीण व्यवहारे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कुठल्याही खेळातून आपण चांगलं प्राविण्य मिळवलं तर आपणास महाराष्ट्र शासनाच्या वतीने खेळाडू कोठ्यामधून चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी मिळून आपले करिअर आपण घडू शकतो अशी अपेक्षा यावेळी विष्णू निकम यांनी केली .
 यावेळेस नांदगाव पोलीस निरीक्षक भदाणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना खेळाकडे करिअर म्हणून बघावे व पालकांनीही विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन द्यावे असे संबोधित केले. संस्थेचे संचालक बोरसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या चषकामुळे एक मविप्र नांदगाव संचालक म्हणून मला सार्थ अभिमान आहे.यापुढे विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्य व इतर सुख सुविधा संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतील, विद्यार्थ्यांच्या क्रीडा कला या अंगभूत क्षमतांना वाव देण्यासाठी संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपली पात्रता सिद्ध करावी. व गावाचे तालुक्याचे नाव मोठे करावे असे आव्हान केले. यावेळेस व्यासपीठावर संस्थेचे सभासद रामराव मोहिते, मुख्याध्यापक थेटे एस. जी. पर्यवेक्षक महाले आर. एस. शालेय स्कूल कमिटी सदस्य अण्णासाहेब गडाख, यांच्यासह खेळाडूंचे पालक नातेवाईक ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नांदगाव येथील स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा,






नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. मिश्रिलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर व बालमंदिर,  सन २०२५-२६ चा 'वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ' मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कलागुणांचा गौरव करण्यात आला.प्रमुख उपस्थिती व उद्घाटन
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शालेय समितीचे अध्यक्ष विजय परदेशी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे,माजी विद्यार्थी तथा इंजिनिअर सुहास कुलकर्णी आणि भा.ज.पा.चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तराज छाजेड उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव कार्यक्रमात विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ईशस्तवन इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्यद्वारे सादर केले.
 यामध्ये प्रामुख्याने फंक्शनल इंग्लिश मध्ये आराध्या काळे, श्रेया पगार, स्वरा पाटील (ग्रेड १) आणि गुंजिता ठाकरे, आराध्या कोरडे (ग्रेड २) यांचा सन्मान करण्यात आला.
तर   NTS शिष्यवृत्ती परीक्षेत अवनी बजाड, अनमोल सदगीर (इयत्ता ४ थी) आणि मनस्वी सूर्यवंशी, संस्कृती सोर (इयत्ता ३.री यांनी यश संपादन केले. इतर यश संस्कृत ज्ञान परीक्षेत १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तर सकाळ चित्रकला आणि नवनीत चित्रकला स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली. लंगडी व थ्रो बॉल संघाने क्रीडा क्षेत्रात शाळेचे नाव उज्ज्वल केले.
  विशेष प्राविण्य म्हणून रिद्धी अविनाश सोनवणे, वेदास राधिकादेवी निषाद कॉम्प्युटर टॅलेंट आणि जिल्हास्तरीय निवड झालेल्या १९ विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
प्रशासनाचे नियोजनहा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे अधीक्षक भैय्यासाहेब चव्हाण,मुख्याध्यापिका सुनीता जाधव शिक्षक प्रतिनिधी दीपक नारळे, तसेच पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा अश्विनी कुमावत व शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा शेवरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संजीव वाघ यांनी केले.

नांदगाव नगरपरिषदेच्या दालनात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांची विभाग प्रमुखासोबत बैठक,






 नांदगाव (प्रतिनिधी) -  गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्‍यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्‍या नगराध्‍यक्ष दालनात सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्‍या कामकाजा बाबत माहिती घेतली. नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख यांचे कडुन सुरु असलेल्‍या कामाची माहिती घेतली.  तसेच नागरीकांना पुरेसे  पिण्‍याचे पाणी वेळेवर देणेसाठी पाणी वितरणामध्‍ये सुव्‍यवस्‍था आणणे कामी सुचना पाणीपुरवठा विभागास दिल्‍या . स्वच्छ नांदगाव, सुंदर नांदगाव ही संकल्पना शहरातील कचरा साफ सफाई संदर्भात नियोजन करण्यात यावे. भटके कुत्रे तसेच जनावरे यांचा बंदोबस्‍त करणे, उघडया गटारी सफाई सोबत फवारणी करणे, अशा विविध सुचना स्‍वच्‍छता विभाग प्रमुख यांना केल्‍या.
   नांदगाव शहरातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणेत यावे. विविध भागात आवश्‍यकते नुसार मुतारीची गरज असल्‍याने याकामी आवश्‍यक ते नियोजन करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे नागरीकांवर कारवाई करणे इत्‍यादी सुचना नगरपरिषदेया विभाग प्रमुख यांना केल्‍या. बैठकीसाठी नगपरिषदेचे मुख्‍याधिकारी शामकांत जाधव,  सर्व विभाग प्रमुख इत्यादी उपस्थित होते.

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...